महासारथी पोर्टलवर नोंदणी करून महाआयडी तयार करण्याचे आवाहन
बुलढाणा, दि. 7 (जिमाका): महाराष्ट्र शासनाने नागरिकांना विविध शासकीय
सेवा व योजनांचा लाभ अधिक सुलभ, जलद आणि एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी महासारथी
हे एकात्मिक डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर आधार प्रमाणीकरणाद्वारे नोंदणी
केल्यानंतर प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र महाआयडी (MahaID) क्रमांक प्रदान करण्यात येणार
आहे.
भविष्यात राज्य शासनाच्या विविध सेवा व योजनांचा लाभ घेण्यासाठी हा
एकच महाआयडी क्रमांक वापरता येणार असून, नागरिकांना त्यांच्या पात्रतेनुसार उपलब्ध
असलेल्या विविध शासकीय योजना व सेवांची माहितीही या पोर्टलवर एकाच ठिकाणी पाहता येणार
आहे.
महाआयडी तयार करण्यासाठी नागरिकांनी महासारथी पोर्टलला भेट देऊन आधार
प्रमाणीकरणाद्वारे नोंदणी करावी. त्यानंतर आवश्यक वैयक्तिक माहिती भरून महाआयडी क्रमांक
तयार करावा. लॉगिन करून माहितीची पडताळणी तसेच आवश्यक असल्यास अद्ययावत करावी. त्यानंतर
पात्रतेनुसार उपलब्ध शासकीय योजना व सेवांची माहिती पोर्टलवरून मिळू शकते.
महासारथी पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी नागरिकांनी
https://mahasarathi.maharashtra.gov.in/home/landing या संकेतस्थळाला भेट द्यावी.
तसेच नोंदणी प्रक्रियेबाबत मार्गदर्शनासाठी https://youtu.be/iYolQHaFMAI या व्हिडिओचा
उपयोग करावा. जास्तीत जास्त नागरिकांनी महासारथी पोर्टलवर नोंदणी करून महाआयडी तयार
करावा आणि शासनाच्या विविध सेवा व योजनांचा लाभ घेण्यासाठी त्याचा उपयोग करावा, असे
आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.
0000

Comments
Post a Comment