शेगावात बालकामगार विरोधात कारवाई; तीन बाल व किशोरवयीन कामगारांची मुक्तता
बुलढाणा, दि. 29 (जिमाका): बालकामगार
व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६ (सुधारणा २०१६) अंतर्गत जिल्हाधिकारी
यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत कृतीदलाने शेगाव येथे धाड टाकून दोन आस्थापनांमधून तीन
बाल व किशोरवयीन कामगारांची मुक्तता केली. संबंधित आस्थापनाधारकांविरुद्ध शेगाव शहर
पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बालकामगार या अनिष्ट प्रथेचे
उच्चाटन करण्याच्या उद्देशाने २८ जुलै रोजी शेगाव शहरात विशेष धाडसत्र राबविण्यात आले.
तपासणीदरम्यान खामगाव रोडवरील इंडियन मोटर गॅरेज येथे एक बालकामगार काम करताना आढळून
आले. तसेच महाराष्ट्र स्प्रिंग पार्ट अँड वेल्डिंग वर्क्स या आस्थापनामध्ये दोन किशोरवयीन
कामगार कार्यरत असल्याचे निदर्शनास आले. कृतीदलाने तातडीने तिन्ही बाल व किशोरवयीन
कामगारांची मुक्तता करून संबंधित मालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली.
कामगार विभागाने सांगितले की,
बालकामगार किंवा किशोरवयीन कामगारांना बेकायदेशीररीत्या कामावर ठेवणे हा कायद्याने
दंडनीय गुन्हा आहे. अशा प्रकरणांची माहिती कोणताही नागरिक, पोलीस अधिकारी किंवा सरकारी
कामगार अधिकारी संबंधित यंत्रणेकडे देऊ शकतो. अधिनियमाच्या कलम १४ नुसार दोषी आस्थापनाधारकांवर
दंडात्मक कारवाईची तरतूद आहे.
बालकामगारमुक्त समाज घडविण्यासाठी
नागरिकांनी पुढाकार घेऊन बालकामगारांविषयीची माहिती प्रशासनाला द्यावी आणि कोणत्याही
परिस्थितीत बालकामगारांना रोजगार देऊ नये, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी, बुलढाणा
यांनी केले आहे. ही कारवाई कामगार उपआयुक्त चंद्रकांत राऊत (अमरावती) व सहाय्यक कामगार
आयुक्त राहुल काळे (अकोला) यांच्या मार्गदर्शनाखाली, कामगार अधिकारी शैलेश देशमुख यांच्या
नेतृत्वात करण्यात आली. या मोहिमेत दुकाने निरीक्षक, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी,
कामगार विभागाचे कर्मचारी तसेच शेगाव शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने सक्रिय सहभाग घेतला.
0000

Comments
Post a Comment