मलकापूरात बाल कामगारांविरोधात कारवाई; तीन बालकामगारांची मुक्तता, दोन आस्थापनांवर गुन्हे
बुलढाणा, दि. 16 (जिमाका)
: बालकामगार
व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६ (सुधारणा २०१६) अंतर्गत जिल्हाधिकारी,
बुलढाणा यांच्या नियंत्रणाखालील कृतीदलाने मलकापूर शहरात धाड टाकून दोन आस्थापनांमधून
तीन बालकामगारांची मुक्तता केली. संबंधित आस्थापना चालकांविरुद्ध मलकापूर शहर पोलीस
ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून या कारवाईमुळे बालकामगार ठेवणाऱ्यांमध्ये खळबळ
उडाली आहे.
बालकामगार या अनिष्ट प्रथेचे उच्चाटन करण्याच्या उद्देशाने १५ जुलै
रोजी मलकापूर येथे विशेष धाडसत्राचे आयोजन करण्यात आले होते. तपासणीदरम्यान फकीरपुरा,
पारपेठ येथील शहादत खान शौकत खान यांच्या मल्टी ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिस, शिवाजीनगर,
मुक्ताईनगर रोड या आस्थापनात एक बालकामगार काम करत असल्याचे निदर्शनास आले. तसेच मोमीनपुरा,
पारपेठ येथील सोहिल खान मेहबूब खान यांच्या ख्वाजा गरीब नवाज गॅरेज, मुक्ताईनगर रोड
या आस्थापनात दोन बालकामगार काम करत असल्याचे आढळून आले.
कृतीदलाने तातडीने तिन्ही बालकामगारांची मुक्तता करून त्यांना आवश्यक
संरक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली. तसेच संबंधित आस्थापना धारकांविरुद्ध बालकामगार व
किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियमांतर्गत मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे
दाखल करण्यात आले.
कामगार विभागाने नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, कोणत्याही आस्थापनात
बालकामगार किंवा किशोरवयीन कामगारांकडून बेकायदेशीररीत्या काम करून घेतले जात असल्याचे
आढळल्यास पोलीस अधिकारी किंवा सरकारी कामगार अधिकारी तक्रार नोंदवू शकतो. या कायद्याचे
उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अधिनियमाच्या कलम १४ नुसार कठोर दंडात्मक कारवाईची तरतूद
आहे. त्यामुळे बालकामगार या सामाजिक अनिष्ट प्रथेचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी नागरिकांनी
सहकार्य करावे आणि कोणत्याही बालकाला कामावर ठेवू नये, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी
यांनी केले आहे.
ही कारवाई कामगार उपआयुक्त चंद्रकांत राऊत (अमरावती) यांच्या निर्देशानुसार
व कामगार अधिकारी शैलेश देशमुख (बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दुकाने
निरीक्षक योगेश गोटे (मलकापूर) यांच्या पथकाने कारवाईचे नेतृत्व केले. यामध्ये दुकाने
निरीक्षक राजेश वणारे (खामगाव), सतीश देशमुख (मेहकर), महिला व बालविकास विभागाचे निलेश
चौथनकर, अशोक डोळस, तसेच मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी शेख मतीन शेख मुकीम
आणि कैलास शिवाजी सोनोने यांनी सहभाग घेतला.
0000
Comments
Post a Comment