महाडीबीटीवर कॉटन श्रेडरसाठी अर्ज सुरू; बुलढाणा जिल्ह्यास ११२ यंत्रांचा लक्षांक

 


बुलढाणा, दि. 21 (जिमाका) : सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी केंद्र पुरस्कृत 'कापूस उत्पादकता अभियान (कपास क्रांती)' अंतर्गत शेतकऱ्यांना कॉटन श्रेडर (Cotton Shredder) उपलब्ध करून देण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कापूस शेतीत यांत्रिकीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने या नव्या घटकाचा योजनेत प्रथमच समावेश करण्यात आला आहे.

या योजनेला केंद्र शासनाने पुढील पाच वर्षांसाठी मान्यता दिली असून, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान (SMAM) च्या धर्तीवर या घटकाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या योजनेचा लाभ वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था यांना घेता येणार आहे.

बुलढाणा जिल्ह्यास एकूण ११२ कॉटन श्रेडर यंत्रांचा तालुकानिहाय लक्षांक प्राप्त झाला आहे. यामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना यंत्राच्या किमतीच्या ५० टक्के किंवा कमाल ७५ हजार रुपये, तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ४० टक्के किंवा कमाल ६० हजार रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे.

महाडीबीटी पोर्टलवर 'प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य' (First Come, First Serve - FCFS) या तत्त्वावर लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार असल्याने इच्छुक शेतकऱ्यांनी विलंब न करता ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.

कापूस उत्पादनात वाढ, पीक अवशेषांचे प्रभावी व्यवस्थापन आणि आधुनिक यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार असून, जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या