पुरस्कार अर्जासाठी १५ जुलैपर्यंत मुदतवाढ; इच्छुक व्यक्ती व संस्थांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
बुलढाणा,
दि. ८ (जिमाका) : इतर मागास बहुजन
कल्याण विभागामार्फत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना
दिल्या जाणाऱ्या चार राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी अर्ज सादर करण्यास १५ जुलै २०२६ पर्यंत
मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र इच्छुक व्यक्ती व संस्थांनी विहित नमुन्यात प्रस्ताव
सादर करण्याचे आवाहन सहाय्यक संचालक दिपाली पाडवी यांनी केले आहे.
या पुरस्कारांमध्ये महात्मा बसवेश्वर
सामाजिक समता-शिवा पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार आणि क्रांतीवीर राजे
उमाजी नाईक पुरस्कार यांचा समावेश आहे. समाजाचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकास घडवून
आणण्यासाठी कलात्मक समाजप्रबोधन, साहित्य, समाजसेवा तसेच जनजागृतीच्या क्षेत्रात उल्लेखनीय
योगदान देणारे कलावंत, साहित्यिक, समाजप्रबोधनकार, समाजसेवक आणि सामाजिक संस्थांचा
या पुरस्कारांद्वारे गौरव करण्यात येणार आहे.
विशेषतः विमुक्त जाती व भटक्या जमाती
समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, संघटनात्मक, आध्यात्मिक प्रबोधन आणि आर्थिक
उन्नतीसाठी कार्य करणारे नामवंत समाजसेवक, कलावंत, समाज संघटक, आध्यात्मिक प्रबोधनकार,
साहित्यिक तसेच सामाजिक संस्था या पुरस्कारांसाठी पात्र राहतील.
पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या पुरुष
उमेदवारांचे किमान वय ४५ वर्षे, तर महिला उमेदवारांचे किमान वय ४० वर्षे असणे आवश्यक
आहे. सामाजिक संस्थांनी संबंधित क्षेत्रात किमान १० वर्षे कार्य केलेले असणे हा निकष
लागू राहील.
इच्छुक व्यक्ती व संस्थांनी आपला प्रस्ताव
विहित नमुन्यात तीन प्रतींमध्ये तयार करून १५ जुलै २०२६ पर्यंत सहाय्यक संचालक, इतर
मागास बहुजन कल्याण कार्यालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, त्रिशरण
चौक, चिखली रोड, बुलढाणा येथे सादर करावा, असे आवाहन सहाय्यक संचालक दिपाली पाडवी यांनी
केले आहे.
0000
Comments
Post a Comment