जिल्हास्तरीय सुब्रतो कप फुटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न; शारदा ज्ञानपीठचे दुहेरी विजेतेपद

 




 

बुलढाणा, दि. 20 (जिमाका) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६५ वी जिल्हास्तरीय सुब्रतो कप फुटबॉल स्पर्धा १७ ते १९ जुलै २०२६ या कालावधीत सहकार विद्या मंदिर, चिखली रोड, बुलढाणा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांच्या १५ संघांनी सहभाग नोंदवून उत्कृष्ट क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन केले.

 

स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे, बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा कोमलजी झंवर, तालुका क्रीडा अधिकारी प्रशांत मडले, सहकार विद्या मंदिराचे प्राचार्य सामी, जिल्हा फुटबॉल संघटनेचे सदस्य मुकेश बाफना, क्रीडा शिक्षक, पंच, खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांसह उपस्थित क्रीडा शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

 

स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलांच्या गटात शारदा ज्ञानपीठ, बुलढाणा यांनी प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळविले. सहकार विद्या मंदिर, बुलढाणा उपविजेता ठरला, तर उर्दू हायस्कूल, बुलढाणा यांनी तृतीय क्रमांक मिळविला. १७ वर्षांखालील मुलांच्या गटातही शारदा ज्ञानपीठने आपले वर्चस्व कायम राखत विजेतेपद पटकावले. सहकार विद्या मंदिरने द्वितीय, तर ए. पी. जे. अब्दुल कलाम स्कूल, धाड यांनी तृतीय क्रमांक मिळविला. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात सेंट जोसेफ स्कूल, बुलढाणा यांनी प्रथम क्रमांक मिळविला, तर शारदा ज्ञानपीठ, बुलढाणा उपविजेता ठरला.

 

विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक आणि पदके प्रदान करून गौरविण्यात आले. प्रत्येक सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही विशेष पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे पंच म्हणून रमीज चौधरी, राहुल ओशलकर, निसार सय्यद, जावेद खान, प्रेम सोनवणे, अर्जुन दांडगे, साई टाके आणि प्रतीक किलबिले यांनी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य क्रीडा मार्गदर्शक डॉ. जीवन मोहोड यांनी, तर मनोज श्रीवास यांनी आभार मानले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या