अमृत भारत स्टेशन योजनेतून नांदुरा रेल्वे स्थानकाचा कायापालट; १०.६३ कोटींच्या पुनर्विकासानंतर लवकरच राष्ट्राला समर्पित

 






बुलढाणा, दि. 14 (जिमाका) : भारतीय रेल्वेच्या 'अमृत भारत स्टेशन योजने'अंतर्गत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील नांदुरा रेल्वे स्थानकाचा १०.६३ कोटी रुपये खर्चून आधुनिक सुविधांसह सर्वांगीण पुनर्विकास करण्यात आला असून, हे स्थानक लवकरच राष्ट्राला समर्पित करण्यात येणार आहे.

हावडा–नागपूर–मुंबई या महत्त्वाच्या रेल्वे मार्गावरील नांदुरा हे बुलढाणा जिल्ह्याचे प्रमुख रेल्वे प्रवेशद्वार असून, दररोज सुमारे ४,५४५ प्रवासी आणि ३६ गाड्यांची ये-जा या स्थानकावरून होते. प्रवासी वाहतुकीबरोबरच कृषी आणि औद्योगिक क्षेत्रासाठीही हे स्थानक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत स्थानकाचे आधुनिक स्थानक इमारत, प्रशस्त आरक्षण कार्यालय, चार आरक्षण कक्ष, वातानुकूलित प्रतीक्षा कक्ष, पुरुष, महिला व दिव्यांगांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे, नवीन प्रवेशद्वार, वाहनतळ, संरक्षक भिंत, आधुनिक प्रकाशयोजना, व्हिट्रिफाइड फरशी, पिण्याच्या पाण्याची सुविधा, टिकाऊ फर्निचर तसेच दृष्टीहीनांसाठी मार्गदर्शक पट्टे अशा विविध सुविधांनी सुसज्ज करण्यात आले आहे.

याशिवाय फलाट क्रमांक १ वर १६० मीटर आणि फलाट क्रमांक २ वर २२४ मीटर लांबीचे नवीन छप्पर उभारण्यात आले आहे. दिव्यांगांसाठी अडथळामुक्त प्रवेश, कमी उंचीचे आरक्षण कक्ष, विशेष प्रसाधनगृहे, राखीव पार्किंग आणि आधुनिक दिशादर्शक फलक यामुळे स्थानक अधिक सुलभ व प्रवासी-केंद्रित बनले आहे.

नांदुरा हे बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख कृषी बाजारपेठ असून येथून गहू, सोयाबीन, कांदा आणि कापूस यांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली जाते. तसेच तेल गिरण्या, डाळ प्रक्रिया उद्योग आणि प्रसिद्ध नांदुरा खव्याच्या वाहतुकीसाठीही हे स्थानक महत्त्वाचे आहे.

पर्यटनाच्या दृष्टीनेही नांदुरा परिसराला विशेष महत्त्व आहे. १०५ फूट उंच हनुमान मूर्ती, अंबादेवीगड, ज्ञानगंगा नदी परिसर, तसेच शेगाव, ज्ञानगंगा अभयारण्य आणि लोणार विवर यांसारखी पर्यटनस्थळे या स्थानकामुळे अधिक सुलभ होणार आहेत.

या पुनर्विकासामुळे प्रवाशांच्या सोयी-सुविधांमध्ये वाढ, स्वच्छता व सुरक्षिततेत सुधारणा, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी अधिक सुलभता, वाहनतळाची सुविधा आणि स्थानिक व्यापार व पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

महाराष्ट्रातील अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत निवडलेल्या १५ स्थानकांपैकी सावदा, धुळे, देवळाली, मूर्तिजापूर आणि लासलगाव ही स्थानके यापूर्वी राष्ट्राला समर्पित करण्यात आली असून, आता नांदुरा स्थानकाचाही त्यात समावेश होत आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

गटई कामगारांसाठी पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना; २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

तलाव मासेमारी ठेक्यासाठी निविदा आमंत्रित