इंडिया स्किल्स कॉम्पिटिशन २०२६-२७ साठी नोंदणी सुरू; जिल्ह्यातील पात्र युवकांना सहभागाचे आवाहन

 


 

बुलढाणा, दि. 17 (जिमाका) : देशातील तरुणांच्या व्यावसायिक व तांत्रिक कौशल्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून देणाऱ्या इंडिया स्किल्स कॉम्पिटिशन २०२६-२७ साठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र युवक-युवतींनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त  ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे.

जागतिक स्तरावर दर दोन वर्षांनी आयोजित करण्यात येणारी वर्ल्डस्किल्स स्पर्धा ही कौशल्य क्षेत्रातील ऑलिम्पिक म्हणून ओळखली जाते. २३ वर्षांखालील तरुणांना विविध कौशल्यांमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी या स्पर्धेत मिळते. भारतातील प्रतिभावान युवक-युवतींसाठी आयोजित करण्यात येणारी इंडिया स्किल्स कॉम्पिटिशन ही देशातील सर्वात प्रतिष्ठेची कौशल्य स्पर्धा मानली जाते.

या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांची राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात येते. त्यानंतर निवड झालेल्या स्पर्धकांना जागतिक स्तरावरील वर्ल्डस्किल्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते.

इंडिया स्किल्स कॉम्पिटिशन २०२६-२७ अंतर्गत प्रथम जिल्हास्तरीय, त्यानंतर विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धांमधून निवड झालेल्या उमेदवारांची नावे राष्ट्रीय स्पर्धेसाठी नामांकनाकरिता पाठविण्यात येतील. स्पर्धेसाठी वयोमर्यादा हा एकमेव पात्रता निकष निश्चित करण्यात आला आहे. एकूण ५६ कौशल्य क्षेत्रांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००३ किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे.

याशिवाय Cyber Security, Industry 4.0, Mechatronics आणि Robot Systems Integration या टीम स्किल्ससाठीही उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००३ किंवा त्यानंतरचा असणे बंधनकारक आहे. तर Autonomous Mobile Robotics, Concrete Construction Work आणि Landscape Gardening या टीम स्किल्ससाठी उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००६ किंवा त्यानंतरचा असावा.

इच्छुक उमेदवारांनी https://www.skillindiadigital.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन नोंदणी करावी. जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र युवक-युवतींनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपल्या कौशल्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळवावे, असे आवाहन सहायक आयुक्त  ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या

गटई कामगारांसाठी पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना; २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन