मिशन लक्ष्यवेध योजनेअंतर्गत क्रीडा मार्गदर्शकांच्या मुलाखती ७ जुलैला
बुलढाणा,दि.02 (जिमाका) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'मिशन
लक्ष्यवेध' योजनेअंतर्गत बुलढाणा येथे जिल्हास्तरीय क्रीडा निपुणता केंद्र स्थापन करण्यात
येणार आहे. या केंद्रासाठी वेटलिफ्टिंग व मैदानी (अॅथलेटिक्स) क्रीडा प्रकारांसाठी
क्रीडा मार्गदर्शकांच्या निवडीसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा क्रीडा संकुल, जांभरून रोड, बुलढाणा येथे प्रस्तावित
निवासी क्रीडा निपुणता केंद्रामध्ये निवड झालेल्या खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण, क्रीडा
साहित्य, अल्पोपहार तसेच क्रीडा विज्ञानाशी संबंधित विविध सुविधा शासनाच्या मान्यतेनुसार
उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या केंद्रासाठी खेळाडू निवड चाचणी आयोजित करण्यात येणार
असून त्यासाठी पात्र प्रशिक्षकांची निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
इच्छुक व पात्र क्रीडा मार्गदर्शकांनी आवश्यक कागदपत्रांसह
दि. ७ जुलै २०२६ रोजी दुपारी १ वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा
क्रीडा संकुल, जांभरून रोड, बुलढाणा येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात
आले आहे.
क्रीडा मार्गदर्शक पदासाठी उमेदवार किमान मान्यताप्राप्त
विद्यापीठाचा पदवीधर असणे आवश्यक असून बी.पी.एड., एम.पी.एड. किंवा क्रीडा विज्ञानातील
पदवीधारकांना प्राधान्य दिले जाणार आहे. संबंधित क्रीडा प्रकारातील एनएसएनआयएस
(NSNIS) डिप्लोमा इन कोचिंग किंवा समतुल्य प्रशिक्षण पात्रता अनिवार्य आहे. तसेच राज्यस्तरावरील
किमान एक वर्षाचा प्रशिक्षणाचा अनुभव, वय २१ ते ४५ वर्षे, मराठी भाषेचे ज्ञान, मूलभूत
संगणक कौशल्ये आणि शासन मान्यताप्राप्त वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय पदक विजेत्या खेळाडूंना तसेच गुणवंत खेळाडूंना प्रशिक्षण
देण्याचा अनुभव असलेल्या प्रशिक्षकांना प्राधान्य दिले जाणार आहे.
जिल्ह्यातील पात्र व अनुभवी क्रीडा प्रशिक्षकांनी या संधीचा
लाभ घेऊन नियोजित वेळेत मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा कार्यालयाने
केले आहे.
000000
Comments
Post a Comment