बुलढाण्यासह विदर्भात पुढील आठवडाभर पावसाची शक्यता; नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी
बुलढाणा दि.7 (जिमाका): भारत मौसम विज्ञान विभाग, प्रादेशिक मौसम केंद्र,
नागपूर यांनी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात दि. ७ व ८ जुलै रोजी
सर्वसाधारणपणे ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. दि. ९ जुलै
रोजी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून त्यानंतर दि. १० ते १३ जुलैदरम्यान हलक्या ते
मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत कमाल तापमान ३०
ते ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची
शक्यता आहे.
याचबरोबर
विदर्भातील अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ तसेच नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर
आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्येही पुढील काही दिवस हलका ते मध्यम पाऊस, काही ठिकाणी मेघगर्जनेसह
पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. काही जिल्ह्यांमध्ये
सुरुवातीच्या दोन दिवसांत जोरदार पावसाचीही शक्यता असल्याचे अंदाजात नमूद करण्यात आले
आहे.
संभाव्य पावसाच्या पार्श्वभूमीवर
नागरिकांनी हवामान विभागाच्या अद्ययावत सूचनांचे पालन करावे. मेघगर्जना व वीजांचा कडकडाट
होत असताना उघड्या जागेत थांबणे टाळावे, तसेच आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय
घ्यावा. शेतकऱ्यांनीही हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजनपूर्वक करावीत,
असे आवाहन करण्यात आले आहे.
000000
Comments
Post a Comment