Thursday 1 June 2023

DIO BULDANA NEWS 01.06.2023

 पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना

बुलडाणा, दि. 1 : पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना मृगबहार सन 2023 मध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरु, लिंबू, सिताफळ आणि द्राक्ष या आठ फळपिकांसाठी 26 जिल्ह्यांमध्ये फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार राबविण्यात येत आहे.

पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना कर्जदार, तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी ऐच्छिक आहे. योजनेत सहभागी होण्याबाबत अथवा न होण्याबाबत घोषणपत्र ज्या बँकेमध्ये पिक कर्ज खाते,  किसान क्रेडिट कार्ड खाते आहे त्या ठिकाणी जमा करणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर बँकेला देणे आवश्यक आहे. जेणेकरुन बँक विमा हप्ता परस्पर कपात करणार नाही. तसेच कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज घेतलेल्या अधिसूचित फळ पिकांकरिता विहीत नमुन्यातील घोषणापत्र संबंधित बँकेत सादर करणे आवश्यक राहिल. जे कर्जदार शेतकरी विहीत मुदतीत सहभागी न होण्यासाठी बॅंकांना कळविणार नाहीत, असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत, असे गृहित धरण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचा विमा हप्ता विहीत पद्धतीने कर्ज खात्यातून वजा करण्यात येणार आहे.

अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी मृग आणि आंबिया बहार मिळून जास्तीत जास्त चार हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. त्यापेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल.

सदर योजना मृगबहार सन 2022 मध्ये तीन विमा कंपन्यांमार्फत राज्यात राबविण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यासाठी भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड, टोल फ्री क्रमांक 18004195004, दूरध्वनी क्रमांक 022-61710912, ई-मेल - pikvima@aicofindia.com वर संपर्क करता येणार आहे.

मृगबहार सन 2023 मध्ये फळपीक निहाय योजनेमध्ये शेतकऱ्यांनी कर्जदार आणि बिगर कर्जदार योजनेतील सहभागाचा अर्ज सादर करणे, विमा हप्त्याची रक्कम कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामधून प्राथमिक सहकारी संस्था, बँक, आपले सरकार सेवा केंद्र, विमा प्रतिनिधी यांनी कपात करणे, यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत संत्रा, द्राक्ष, पेरु, लिंबूसाठी दि. 14 जून 2023, मोसंबी, चिकू साठी दि. 30 जून 2023, डाळिंबासाठी दि. 14 जुलै 2023, सिताफळासाठी दि. 31 जुलै 2023 पर्यंत आहे.

मृगबहार सन 2023 या वर्षासाठी अधिसूचित फळ पिके, समाविष्ट हवामान धोके आणि विमा संरक्षण कालावधी निश्चित करण्यात आला आहे. निर्धारीत केलेले हवामान धोके लागू झाल्यास विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई विमा कंपनीमार्फत देय होणार आहे. मृग बहारातील अधिसूचित फळपिकांची विमा नोंदणी करण्याकरीता राष्ट्रीय पिक विमा पोर्टल pmfby.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी.

शेतकऱ्यांनी अधिसूचित फळपिकांच्या हवामान धोक्यांची तसेच त्यांना भरावयाच्या विमा हप्त्याची माहिती करुन घेऊन विहीत मुदतीमध्ये नजिकच्या ई-सेवा केंद्र किंवा बँक, वित्तीय संस्था यांच्याशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा. मृगबहारातील अधिसूचित फळपिकांचे हवामान धोके, विमा संरक्षित रक्कम, विमा संरक्षण कालावधी, विमा हप्ता इत्यादी बाबतीत सविस्तर माहिती शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच ई - सेवा केंद्र आणि बँकस्तरावर माहिती उपलब्ध करुन देण्याच्या सूचना कृषि विभागाने सहभागी विमा कंपन्यांना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी सबंधित विमा कंपनीचे जिल्हा, तालुका कार्यालय किंवा कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

000000

No comments:

Post a Comment