Monday 12 June 2023

DIO BULDANA NEWS 11.06.2023

 












विकासकामातून शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याची आवश्यकता

-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
बुलडाणा, दि. ११ : केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध विकासकामे राबविताना यामधून शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याची आवश्यकता आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या पिकांना भाव मिळावा, त्यातून उद्योग निर्माण व्हावे, तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
खामगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर शेळद ते नांदुरा या रस्त्याच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, आमदार प्रवीण पोटे, वसंत खंडेलवाल, आकाश फुंडकर, राजेश एकडे, प्रकाश भारसाकडे व चैनसुख संचेती उपस्थित होते.
श्री. गडकरी म्हणाले, मुबलक पाणी उपलब्ध असलेल्या भागाचे भविष्य उज्वल असते. ज्यांच्याकडे पाणीसाठा नाही, ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यातील पाणीसाठ्यासाठी जिगाव प्रकल्पाला 5 हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहे. यातून जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र 50 टक्क्याहून अधिक वाढविण्यात येणार आहे त्यासोबतच पाण्याचा खारेपणा कमी करण्यासाठी खारपाणपट्ट्यात 900 प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या ठिकाणावरील खारेपाणी गोड्या पाण्याखाली आणण्यात येणार आहे. हा प्रकल्प ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येईल. तसेच खारपाणपट्ट्यात झिंगा उत्पादनाला वाव असल्याने यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येईल.  खारपाणपट्ट्यात असलेल्या खडकपूर्णा धरणामध्ये झिंगा उत्पादनासाठी प्रयत्न करण्यात येतील. शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी पाण्याचा अभाव, कापूस उत्पादन आणि अधिक खर्चात असलेली शेती ही कारणे असल्याने याबाबतही उपाययोजना गरजेच्या आहे. शेतकऱ्यांना समृद्ध जीवन जगण्यासाठी पाणी, रोजगार, शाळा, स्वच्छता, मालाला भाव,  मैदान, हॉस्पिटल अशा सुविधा निर्माण झाल्यास समृद्ध जीवन जगतील. शेतीचा शाश्वत विकास करताना तलाव, नदी, नाल्यांचे खोलीकरण करण्यासोबत वाहत्या पाण्याला थांबविणे आणि थांबलेले पाणी जमिनीत मुरवण्यासाठी प्रयत्न झाल्यास पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.
रेल्वे, रस्ते विकासाचे जाळे विणण्यास मदत करतात. जालना आणि सिंधी येथील ड्रायपोर्टमुळे शेतकऱ्यांना आपल्या मालाची निर्यात करणे शक्य झाले आहे. जनतेच्या पैशातून विकासकामे करण्यात येतात. ही विकासकामे चांगल्या दर्जाचीच व्हावीत. निकृष्ट दर्जाची कामे ही जनतेशी बेइमानी करणारे आहे. राष्ट्रीय महामार्गावरील कामांमध्ये अनेक वेळा व्यत्यय आला. मात्र ही कामे तीन भागात पूर्ण करण्यासाठी करण्यात आली. याकामांबद्दल लोकप्रतिनिधींचा समाधानकारक अभिप्राय ही कामे चांगली झाली असल्याची पावती आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
श्री. गडकरी यांनी जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेल्या मलकापूर-बुलडाणा रस्ता विकासासाठी १२०० कोटी, बाळापूर -शेगाव रस्त्यासाठी ३५० कोटी, शेगाव-संग्रामपूर रस्त्यासाठी ३०० , संग्रामपूर ते सीमेपर्यंत रस्त्यासाठी 385 कोटी रुपये या नवीन विकासकामांची घोषणा यावेळी केली.
००००००

No comments:

Post a Comment