Thursday 29 September 2022

DIO BULDANA NEWS 29.09.2022

  ऊसावरील घोणस अळीचे व्यवस्थापन करावे

*कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

बुलडाणा, दि. 29 : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ऊसावर घोणस अळीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. पिक आणि मनुष्यांना या घोणस अळीचा अपाय होत असल्याने शेतकऱ्यांनी घोणस अळीचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन केले आहे.

काही दिवसांपासून विविध माध्यमामार्फत ऊसावर स्लग कैटरपिलर किंवा काटेरी अळी व ग्रामीण भाषेमध्ये घोणस अळीचा प्रादूर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. अळीचा दंश झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना वैद्यकीय उपचार घ्यावे लागलेअ आहेत. त्यामुळे अळीबद्दल भीती दिसून येते आहे, तसेच गैरसमज निर्माण झाले आहेत.

अळीची ओळख ही या अळीला स्लग कैटरपिलर, काटेरी अळी, डंक अळी असेही म्हणतात. ही एक पंतगवर्गीय कीड आहे. ती स्लग कैटरपिलर पतंग कुटुंबातील आहे. या अळ्यांना त्यांच्या चिकटून राहण्याच्या स्वभावामुळे आणि संथ हालचाली व लक्षणामुळे स्लग अळी असे म्हणतात. या अळीचे पतंग त्यांच्या भक्षकांसाठी मऊ आणि पौष्टिक खाद्य असतात. पतंग फार वेगाने फिरत नाहीत आणि उडूही शकत नाहीत. ते पक्ष्यांचे आणि इतर भक्षकांचे सहज होणारे आणि मुख्य खाद्य आहेत. या जातीच्या अळ्यांनी स्वतःचा भक्षकांपासून बचाव करण्यासाठी शरीरामध्ये भडक रंग आणि काटे विकसित केले आहेत. या त्यांच्या शरीराच्या गर्द आणि प्रखर तेजस्वी रंगाद्वारे आणि काटे किंवा केसांद्वारे त्यांच्या भक्षकांना डंख मारण्याची चेतावणी देतात. हे अळ्यांना त्यांच्या भक्षकांपासून वाचवते. अशा काट्याच्या खाली विष ग्रंथी असतात. ही एक स्वःसंरक्षणाची रणनीती आहे. या गटातील सर्व अळ्यांच्या शरीरावर काटे किंवा केस नसतात. या किडीला अकाली स्पर्श झाल्यास काही प्रमाणात त्रासही होऊ शकतो परंतु या किडीचे पतंग अपायकारक नाहीत. ही कीड भारत, श्रीलंका, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया यासारख्या देशांमध्ये आढळूनयेते.

ही अळी बहुभक्षी प्रकारातील कीड आहे. विशेषतः एरंडी, आंबा, केळी, डाळींब, लिंबूवर्गीय फळे, इतर फळझाडे, देशी बदाम, ओक, चहा, कॉफी, शोभेच्या वनस्पती, तणे आणि इतरही वनस्पती वर आढळून येते. ही अळी पिकाचे फारसे नुकसान करत नाही. परंतु काही वेळा अळीचा प्रादुर्भाव पिकाच्या काही ठराविक भागापुरताच मोठ्या प्रमाणात दिसून येतो. प्रादूर्भाव जास्त झाल्यास अळ्या फक्त पानांच्या शिरा सोडून बाकी भाग अधाशीपणे खातात. त्यामुळे झाडाला फक्त पानांच्या शिराच शिल्लक राहून मोठे नुकसान होते.

या अळ्यांच्या शरीरावर असलेल्या काट्यांमुळे आणि केसांमुळे सहज लक्षात येतात.  त्याचा उद्देश त्यांच्या भक्षकांना परावृत्त करणे आहे. अळी लोकांच्या मागे जात नाहीत. परंतु तुम्ही त्यांना स्पर्श केल्यास किंवा चूकून संपर्कात येऊन शरीर घासले गेल्यास त्याठिकाणी काट्यांचा दंश होऊन अपाय होऊ शकतो आणि लक्षणे उद्भवतात. काट्यांमध्ये असलेले विष शरीरात प्रवेश करते. स्पर्श झालेल्या ठिकाणी अळीचे केस अथवा काटे शरीरात तसेच राहतात, दंश हा मधमाशीच्या डंखासारखा त्रासदायक असतो. विष हे सौम्य स्वरूपाचे असते. परंतु वेदना होणे, पुरळ येणे, जळजळ होणे, खाज सुटणे, सूज येणे आणि फोड येणे या सारखी लक्षणे दिसू शकतात. सहसा ही लक्षणे तात्पुरत्या स्वरुपाची असतात आणि एका दिवसात निघून जातात किंवा कमी होतात. परंतु जर ती तीव्र स्वरूपाची किंवा जास्त वेळाकरीता कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घ्यावेत. काही लोकांना अशा अळीच्या संपर्कात आल्यास त्यांना असलेल्या अॅलर्जीमुळे जास्त त्रास होऊ शकतो. ज्या लोकांना अस्थमा, अॅलर्जी सारख्या समस्या असतील अशा लोकांनी सावधगिरी बाळगावी. अपाय होऊन जास्त त्रास झाल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत.

ताबडतोब करावयाचे उपाय म्हणून प्रभावित भागावर चिकट टेप हलक्या हाताने लावून काढावा. त्याने शरीरात गेलेले अळीचे केस किंवा काटे सहज निघण्यास मदत होईल. लक्षणे सौम्य स्वरूपाची असतील तर अपाय झालेल्या ठिकाणी बर्फ लावल्यास किंवा बेकिंग सोडा आणि पाण्याची पेस्ट लावल्यास त्रास कमी होतो.

 

अळीचे नियंत्रण करताना कोणतेही स्पर्शजन्य किटकनाशक फवारावे. यामध्ये क्विनॉलफॉस, क्लोरोपायरीफॉस, इमामेक्टीन बेंझोएट, फ्लूबेंडामाईडसारखे कीटकनाशक शिफारस नसले तरी चांगले नियंत्रण करतात. तसेच बरेच नैसर्गिक मित्र कीटकांद्वारे ही या किडीचे नियंत्रण नैसर्गिकरित्याच होते. त्यामुळे केसाळ किंवा काटेरी अळ्यापासून स्वसंरक्षणाची सावधगिरी बाळगावी. अळीमुळे दंश झाल्यास घाबरून न जाता योग्य उपाय अथवा उपचार करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

महसुलच्या साडेसतरा लाख ऑनलाईन प्रमाणपत्रांचे वाटप

*लोकसेवा हक्काची प्रभावी अंमलबजावणी

*नागरिकांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 29 : महाराष्ट्र लोकसेवा हक्काची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. यात जिल्ह्यामध्ये महसूल विभागाच्या 18 सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहे. यात 17 लाख 45 हजार 588 ऑनलाईन प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्यांतर्गात 40 शासकीय कार्यालयातील 486 प्रकारच्या सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर 2015 पासून ऑगस्ट 2022 पर्यंत महसूल विभागात सेवांचे 18 लाख 40 हजार 729 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी 17 लाख 45 हजार 588 ऑनलाईन प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले आहे.  यातील सर्व सेवा विहित कालावधीत पुरविण्यात आल्या आहेत.

नागरिकांना ऑनलाईन सेवा पुरविण्याकरीता ग्रामपंचायत, तालुकास्तरावर आपले सरकार सेवा केंद्र, तसेच सेतू सुविधा केंद्र देण्यात आले आहेत. नागरिक या केंद्राचा उपयोग करुन हव्या असलेल्या सेवांकरीता पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करुन शकतील. तसेच aaplesarkar.mahaonline.gov.in या वेबसाईट वरुन देखील नागरिक स्वत: अर्ज करुन शकतील.

नागरिकांच्या सुविधेसाठी सदर प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी म्हणून AAPLE SARKAR हे मोबाईल अप्लीकेशन तयार केले आहे. हे अप्लीकेशन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. त्‍याचा उपयोग करुन आवश्यक असलेल्या सेवांकरीता नागरीक अर्ज सादर करुन शकतील. त्याचप्रमाणे RTS MAHARASHTRA हे ॲप उपलब्ध झाले आहे. सदर ॲप वापरास सोपे आहे. तरुणांसह सर्वस्तरातील नागरिक सदर ॲपच्या माध्यमातून विहित कालमर्यादेत गतिमान सेवा मिळवू शकतील.

जिल्ह्यात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. या कालावधीत शासकीय विभागातील प्रलंबित अर्ज, तक्रारी, निवेदने निकाली काढण्यात येणार आहे. नागरिकांनी अर्ज ऑनलाईन सादर करावेत, शासकीय यंत्रणेशी संपर्क साधून तक्रारींचे निराकरण करून घ्यावे, तसेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क 2015 अंतर्गत सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

सेवानिवृत्तांचा सोमवारी संवाद मेळावा

बुलडाणा, दि. 29 : शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या निवृत्ती वेतनधारक, कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांचा संवाद मेळावा सोमवार, दि. 3 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हा कोषागार कार्यालयातील प्रशिक्षण सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे.

जिल्हा कोषागार कार्यालयातील मेळाव्यासाठी निवृत्ती वेतनधारकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी ऋषिकेश वाघमारे यांनी केले आहे.

0000000 





समाज कल्याण कार्यालयात ज्येष्ठ नागरीकांचा मेळावा

बुलडाणा, दि. 29 : समाज कल्याण कार्यालयात सेवा पंधरवाडा विशेष मोहीमेंतर्गत ज्येष्ठ नागरीकांचा मेळावा आणि चर्चासत्र पार पडले.

मेळाव्याला प्रकाश पिंपरकर अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून मधुसुदन कुलकर्णी,  मधुकर पाटील, भरत जाधव, डॉ खर्चे, भरत जाधव, सर्जेराव चव्हाण, सिद्धार्थ जाधव उपस्थित होते. यावेळी मिलींद जाधव, प्रकाश भालेराव, राजेंद्र बाहेकर, साहेबराव भोरटे, कडुबा साळवे, सुधाकर जाधव यांनी विचार व्यक्त केले.

          यावेळी  ज्येष्ठ नागरीकांसाठी कार्य करणाऱ्या जनस्थान संस्थेच्या प्रकल्प प्रमुख मिनाक्षी कोळी यांनी हेल्पलाईन क्रमांक 14567 बाबत माहिती दिली. या मदत क्रमांकाची ज्येष्ठ नागरीकांना होणारी मदत आणि संस्थेच्या स्वयंसेवकांकडून होणारी मदत, तसेच ज्येष्ठ नागरीकांसाठी मानसिक आधार, कौटुंबिक अडचणी आणि समस्यांसंदर्भात सदैव मदतीसाठी  तत्पर असल्याचे सांगितले. प्रा. गायकवाड यांनी ज्येष्ठ नागरीकांच्या सामाजिक, कौटुंबिक, मानसिक समस्या व त्यावरील उपायासंदर्भात मार्गदर्शन केले.

प्रदीप धर्माधिकारी यांनी प्रास्ताविक केले. सतिश बाहेकर यांनी सूत्रसंचालन केले. श्रीमती ठोंबरे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी  योगेश पर्वतकर, प्रा. संदिप मोठे यांनी पुढाकार घेतला. हिवरा आश्रम, ता. मेहकर येथे दि. 1 ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरीक दिन स्वामी विवेकानंद संस्थान येथे साजरा करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

00000

हमी दरात खरेदीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी

*पणन विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 29 : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत राज्य शासनाच्या वतीने हमी दरात मका, ज्वारी व बाजरी खरेदी करण्यात येणार आहे. यावर्षीच्या हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दि. 15 ऑक्टोबर 2022 पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी फेडरेशनच्या सब एजंट संस्थांकडे हमी दराचा लाभ घेण्यासाठी यावर्षीच्‍या हंगामा सातबारा उतारा, पिकपेरा, बँक पासबुकची प्रत, आधारकार्ड सादर करावे लागणार आहे. तसेच खाते सुरु असल्याची खात्री करुन शेतकऱ्यांनी नोंदणी करावी लागणार आहे.

जिल्ह्यामध्ये मका, ज्वारी व बाजरी नोंदणीसाठी 14 केंद्रांना जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली आहे. यात तालुका शेगाव सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादित, बुलडाणा, मेहकर, लोणार, देऊळगाव राजा, संग्रामपूर, शेगांव, मलकापूर, जळगाव जामोद व खामगाव, तसेच संत गजाजनन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी, मोताळा, सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी, नारायणखेड, ता. देऊळगावराजा, केंद्र- सिंदखेडराजा, नांदुरा ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी, नांदुरा, केंद्र-वाडी, या केंद्रांना मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांनी हमीदराचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रथम नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जिल्हा पणन अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment