Wednesday 28 September 2022

DIO BULDANA NEWS 28.09.2022

 चिखली शहरातील वाहतुकीवर निर्बंध

*पर्यायी वाहतूक मार्गाचे नियोजन

बुलडाणा, दि. 28 : जिल्ह्यातील चिखली शहरातील वाढलेल्या वाहतुकीमुळे येथील वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहे. यासाठी पर्यायी वाहतूक मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी आदेश पारित केले आहे.

चिखली शहरातील वाढलेली लोकसंख्या, तसेच वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे आणि इतर ठिकाणाहून चिखली शहरात निर्माण होणारी नागरिकांची गर्दी व वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळे किरकोळ व गंभीर स्वरुपाचे अपघात घडत असल्यामुळे नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण झालेला आहे.

चिखली शहरातील जाफ्राबाद रोड, सिद्धसायंस चौक ते शिवाजी पार्क, खामगाव चौफुली मार्गालगत वाढलेली नागरी वस्ती, शाळा, महाविद्यालये, दवाखाना व शासकीय कार्यालये तसेच सतत होणारे अपघात यामुळे नमुद मार्गावरील वाहतुक कमी करुन नागरीकांच्या सुरशिक्षते करीता मेहकर फाटा ते राऊतवाडी, शेलुद हायवे सुरु करण्यात आलेला आहे. शहरात जाणारी, येणारी मालवाहू जड व हलकी वाहने शिवाजी चौक बाजारपेठ, बाबू लॉज चौक, डीपी रोड व गावामध्ये गर्दीच्या वेळी वाहने आणतात. त्यामुळे नमूद मार्गावर वाहनांची वर्दळ होऊन किरकोळ व गंभीर स्वरुपाचे अपघात होतात.

चिखली येथील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जड वाहतुकीच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात आली आहे. त्‍यानुसार चिखली शहरात सर्व जड व हलकी मालवाहू वाहनांना दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत शहरामध्ये वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात आली आहे. बाबू लॉज चौक ते महाराणा प्रताप पुतळ्यापर्यंत सर्व वाहनांना व रस्त्यावर हातगाडीसाठी रस्त्याचे मध्ये बसणारे व हातगाडी ठेवणारे यांना मधोमध विक्रीस प्रतिबंध राहील. हातगाडी, भाजी विक्रेते, हातगड्यांसाठी प्रतिबंध राहील. त्यांना पर्यायी जागा तात्पुरत्या स्वरूपात पारधी मठ येथे नगर परिषद व पोलीस प्रशासन उपलब्ध करून देणार आहे.

जयस्तंभ चौक ते बसवेश्वर चौक दोन्ही बाजूने दुचाकी आणि चारचाकी वाहन किंवा हातगाडी पार्किंगसाठी मनाई राहील. बस स्टँड पासून दोन्ही बाजूस 200 मिटर अंतरापर्यंत अवैध प्रवासी वाहनाना प्रतिबंध राहणार आहे. ॲटो स्टॉपसाठी चिखली बसस्टॅंडलगत असलेल्या मोकळ्या जागेत पार्किंग क्षेत्र करण्यात येणार आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अन्नधान्याची वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना विश्रामगृह चौक, भंगार गल्ली, जयस्तंभ चौक, कृषी उत्पन्न बाजार समितीचा मार्ग मोकळा राहील. गिट्टी, बोल्डर, रेती, मरुम, वाहतूक करणाऱ्या वाहनांना शहराचे बाहेरील रस्त्याने सकाळी 6 ते सकाळी 10 वाजता तसेच सायंकाळी 6 वाजल्यानंतर आत प्रवेश राहील.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुचाकी आणि चारचाकी वाहनांना 200 मीटर परिसरात प्रतिबंध राहील. चिखली शहरात प्रवेश बंदनंतर वाहतूक करणाऱ्या जडवाहनांना एनएच 146 वर रोडचे बाजूने किंवा एमआयडीसी तसेच मेहकर फाट्याच्या बाहेर किंवा शेलुदच्या मागे थांबता येईल. यापुढे शहरात थांबता येणार नाही. चिखली शहरातील अंतर्गत रस्त्यावर सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत यापुढे शहरात थांबता येणार नाही. चिखली शहरातील अंतर्गत रस्त्यावर सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कोणतेही जड व हलके वाहन उभे किंवा वाहतूक करता येणार नाही.

सर्व प्रकारची हलकी मालवाहू वाहनांना सकाळी 6 ते 10 ते सायंकाळी 4 ते 7 वाजल्यानंतर चिखली शहरात वाहतुकीस परवानगी राहील. तसेच शहरातील रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने उभे करण्यास मनाई राहील. चिखली शहरात ज्या वाहनांना मालाची चढउतार करण्याची आवश्यकता नाही अशा सर्व प्रकारच्या जड वाहनांना 24 तास प्रवेश बंदी राहील. त्यांना फक्त हाय वे रोडचा वापर करता येईल.

सदर अधिसुचनेमधील वेळेचे बंधन सर्व जड व हलके वाहनांना रविवारी व शासकीय सुट्टीचे दिवशी लागू राहणार नाही. रमजान ईद, गणपती उत्सव, नवदुर्गा उत्सव, दिपावली व इतर महत्वाच्या सणावेळी अधिसुचना लागू राहील. सर्व प्रकारच्या वाहनांना मोटार वाहन अधिनियम अनुसार वाजवी क्षमतेपेक्षा जास्त अधिभार वाहून नेता येणार नाही. सदर अधिसुचना ही अत्यावश्यक सेवेतील ॲम्बुलन्स, फायर ब्रिगेड, पोलिस, गॅस सिलेंडर ट्रक, पेट्रोल, डिझेल टँकर आदी वाहनांना शहरात येण्यास व जाण्यास बंदी राहणार नाही. ही अधिसुचना चिखली शहरातील सर्व ट्रक ट्रांसपोर्ट व बाहेरील येणाऱ्या मालवाहू ट्रक आदी वाहनाना बंधनकारक राहील.

चिखली नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी दिशा निर्देशक बोर्ड तातडीने लावावेत. नगरपरिषद व पोलीस विभागाने अधिकृत ॲपेधारक, अधिकृत ऑटोधारक, अधिकृत जिपधारकांना रहदारी, वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा ठिकाणी स्टँडकरीता जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नोंदणीकृत हॉकर्स, फेरीवाले यांना पर्यायी जागा चिखली नगरपरिषदेने उपलब्ध करुन द्यावी. औषधी, बी-बियाणे, खते व इतर जिवनावश्यक वस्तूंच्या मालवाहू वाहनाना विशिष्ट वेळेत प्रवेश देण्यात येणार आहे.

0000000000

आज शौर्य दिनाचे आयोजन

बुलडाणा, दि. 28 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे गुरूवार, दि. 29 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 103.30 वाजता शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने चिखली रस्त्यावरील सैनिक मुलांचे वसतिगृह येथे माजी सैनिकांचा सन्मान करण्यात येणार आहे.

भारतीय सैन्य दलाने दि. 29 सप्टेंबर 2016 रोजी पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राइक द्वारे अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय सैन्याची ही अभिमानास्पद कामगिरी जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी माजी सैनिकांची सन्मान करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व आजी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, युद्ध विधवा, वीर माता, पिता व अवलंबितांना यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान यांनी केले आहे.

0000000000




निर्यातवाढ होण्यासाठी प्रत्येक घटकाने प्रयत्नशील राहावे

-जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती

*निर्यात कार्यशाळा उत्साहात संपन्न

बुलडाणा, दि. 28 : देशाच्या प्रगतीमध्ये निर्यातीला महत्व आहे. देश पातळीवर निर्यातीसाठी प्रयत्न होत असताना जिल्ह्यास्तरावरही निर्यातवाढीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. निर्यातीसाठी पायाभुत सोयीसुविधा आणि शासकीय मदत देण्यात येईल. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने निर्यातीसाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी केले.

गुंतवणुक वृद्धी, व्यवसाय सुलभीकरण, निर्यात व एक जिल्हा एक उत्पादन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा हॉटेल नर्मदा हॉलीडेज येथे पार पडली. यावेळी वाशिमचे जिल्हा सत्र न्यायाधीश योगेश कोईनकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, भारतीय स्टेट बँकेचे महाप्रबंधक संजय श्रीवास्तव, उपमहाप्रबंधक पंकजकुमार बरनवाल, क्षेत्रीय प्रबंधक विशोक कुमार, निर्यात सल्लागार सुनिल कोईनकर, सिडबीचे प्रबंधक श्री. नायक, अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त श्री. केदार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनिल पाटील उपस्थित होते.

श्री. श्रीवास्तव यांनी निर्यातविषयक बँकेची भुमिका याबाबत मार्गदर्शन केले. श्री. नायक यांनी सिडबीच्या योजनांची माहिती दिली. श्री. विशोककुमार यांनी निर्यातदारांना बँकाकडून मिळणाऱ्या विविध योजना, सवलतीबाबत मार्गदर्शन केले. योगेश कोईनकर यांनी निर्यातदारांनी निर्यात करताना करारनाम्यांचा अभ्यास करण्याबाबत सांगितले. तसेच उद्योगात येणाऱ्या कायदेविषयक अडचणी आणि त्यावरील उपयुक्त कायदे, उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.

दुपारच्या सत्रात सुनील कोईनकर यांनी निर्यातीमधील फायदे सांगून जिल्ह्यातील उद्योजकांना निर्यात वाढीसाठी सर्वतोपरी  मदत करण्याचे आश्वासन दिले. श्री. डाबरे तसेच प्रवीण वानखेडे यांनी कृषी व अन्न प्रक्रिया प्रकल्प निर्यातवाढीसाठी उपयुक्त असल्याने शेतकरी उत्पादक कंपनी व उद्योजक यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन केले. अन्न प्रक्रिया उद्योग करताना आवश्यक परवाने ऑनलाईन पद्धतीने काढण्यासंदर्भातील तरतुदीबाबत मार्गदर्शन केले. निर्यात करताना येणारे संभाव्य धोके आणि त्यावरील उपाययोजनांबाबत चैतन्य ॲग्री प्रोडक्टस यांनी माहिती दिली.

एक जिल्हा एक उत्पादन योजना, तसेच जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, पॉलीसी, सन 17-18 व 18-19 साठी निर्यात पुरस्कार नामांकने दाखल करणे, मैत्री पोर्टल बाबत माहिती श्री पाटील यांनी दिली.

कार्यशाळेसाठी देशपांडे ब्रदर्स ॲन्ड कंपनी देऊळगाव राजा यांनी होमीओपॅथी उत्पादने, इलेक्ट्रीकल वाहन उत्पादन कंपनी बुलढाणा यांनी ई-व्हेईकल सादरीकरण केले, चैतन्य ग्रुप ऑफ इंडस्ट्रिज, मलकापूर यांनी उच्च दर्जाचे न्यूट्रास्युटिकल्स आणि फार्मास्युटिकल्स कच्चा माल  उत्पादने, युनानी हेल्थकेअर ॲन्ड आयुर्वेदिक प्रोडक्टस यांनी 250 उत्पादनाचे सादरीकरण केले. भारतीय स्टेट बँकेने त्यांच्याकडील राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या मार्गदर्शनासाठी स्टॉल लावला.

कार्यशाळेस ऑनलाईन पद्धतीने डीजीएफटी, व्यवसाय सुलभीकरणावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेसाठी हिंदुस्थान युनिलिव्हर खामगाव, बेन्झोकेम इंडस्ट्रीज मलकापूर, औद्योगिक संघटना, निर्यातदार, शेतकरी उत्पादक कंपनी, उद्योजक तसेच शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी कर्मवारी उपस्थित हाते. कार्यक्रमासाठी बँक अधिकारी, मिटकॉन, एमसीइडी यांनी सहकार्य केले. श्री. पाटील यांनी प्रास्तविक आणि कार्यक्रमाचे ध्येयधोरणे सांगितली. जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक नामदेव पाटील आभार मानले.

00000




 जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती अधिकारी दिन साजरा

बुलडाणा, दि. 28 : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात आज माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी माहितीच्या अधिकाराबाबत उपस्थितांना माहिती दिली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, तहसिदार प्रिया सुळे यांनी प्रास्ताविकातून माहितीचा अधिकार कायद्याबाबत माहिती दिली. यावेळी श्री. गोगटे यांनीही माहितीचा अधिकार आणि कार्यालयीन कामकाजाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला उपजिल्हा निवडणूक अधिकारी गौरी सावंत, नायब तहसीलदार संजय बनगाळे, सुनिल आहेर आदी उपस्थित होते.

000000

 


जिल्ह्यात राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान

बुलडाणा, दि. 28 : प्रशासन लोकाभिमुख करणे, त्यात निर्णय क्षमता आणणे आणि सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करणे, यासाठी राज्य, तालुका, जिल्हा, विभागीय स्तरावर व महानगरपालिका स्तरावर राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान राबविण्यात येते. हे अभियान जिल्हास्तरावर राबविण्यात यावे, अशा सूचना प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हास्तरीय विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अभियान राबविण्यासंदर्भात माहिती देण्यात आली. जिल्ह्यात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ, लोकाभिमुखता व निर्णयशिलता आणण्याकरीता तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान ग्राम, तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर घेण्यात येणार असल्याने विभागप्रमुखांनी आपल्या अधिनस्त कार्यालयातही हे अभियान राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

या अभियानासाठी तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे पारितो‍षिक देण्यात येत आहे. याशिवाय थेट राज्यस्तराकडेही प्रस्ताव सादर करता येऊ शकणार आहे. त्यामुळे आपल्या विभागांचे प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन श्री. माचेवाड यांनी केले.

00000

No comments:

Post a Comment