Tuesday 20 September 2022

DIO BULDANA NEWS 17.9.2022

 


प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

बुलडाणा, दि. १७ : प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात विनम्र अभिवादन करण्यात आले.
निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तहसीलदार रुपेश खंडारे, नायब तहसीलदार श्री. पवार, श्री. भंगाळे, श्यामला खोत, श्री. मोतेकर, जिल्हा उद्योग केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक सुनील पाटील, नाझर संजय वानखेडे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
000



सेवा पंधरवड्यात जनसामान्यांना सेवा देण्यावर भर द्यावा 
-जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती
बुलढाणा, दि. 17 : जिल्ह्यात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा राबविण्यात येत आहे. या पंधरवड्यात राज्य शासनाच्या सर्वसामान्यांसाठी असलेल्या सेवा देण्यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी केले. 
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज सेवा पंधरवड्याचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, बुलडाणाचे तहसीलदार रुपेश खंडारे, श्यामला खोत, नायब तहसीलदार श्री. पवार, श्री. भंगाळे, श्री. मोतेकर, जिल्हा उद्योग केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक सुनील पाटील उपस्थित होते. 
जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती म्हणाले, राज्य शासनाने विविध यंत्रणांकडे 10 सप्टेंबर पूर्वी केलेल्या अर्जांचा निपटारा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये नागरिकांच्या प्रलंबित अर्जांचा स्थानिक पातळीवर निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम आखण्यात आली आहे. नागरिकांनी आपले सरकार, नागरी सेवा केंद्र व इतर वेबपोर्टलवर केलेल्या प्रलंबित अर्जाचा जलद गतीने निपटारा यंत्रणांनी करावयाचा आहे.
राज्य शासनाने अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना नवीन शासन निर्णयानुसार मदत निधीचे वितरण, पंतप्रधान किसान सन्मान निधीचा प्रलंबित पात्र लाभार्थ्यांना लाभ, फेरफार नोंदणीचा निपटारा, शिधापत्रिकांची वितरण, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मालमत्ता हस्तांतरण नोंद, नव्याने नळ जोडणी, मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणी पत्र, प्रलंबित घरगुती वीज जोडणीस मंजुरी, मालमत्ता हस्तांतरणानंतर विद्युत जोडणीमध्ये नवीन मालमत्ताधारकाचे नाव, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अंतर्गत सिंचन विहिरी करिता अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी, अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वन हक्क पट्टे मंजूर करणे, दिव्यांगांना प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र या विविध विभागाच्या चौदा सेवांचा समावेश करण्यात आला आहे. या कामी गती देण्याचे आवाहन आहे जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले. 
सेवा पंधरवड्यात या सेवांव्यतिरिक्त नागरिकांना गरजेच्या असलेल्या इतरही सेवा द्याव्यात. या निमित्ताने गतिमान प्रशासनाची प्रतिमा निर्माण होण्यास मदत होईल. नागरिकांच्या अर्जांचा स्थानिक पातळीवर निपटारा करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 
०००

No comments:

Post a Comment