Friday 23 September 2022

DIO BULDANA NEWS 23.09.2022

 



खामगाव येथे बुधवारपासून महिलांसाठी आरोग्य शिबीर

* माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान

बुलडाणा, दि. 23 : महिलांच्या आरोग्य समस्या सोडविण्यासाठी महिला, माता, गरोदर स्त्रियांसाठी बुधवार, दि. 28 सप्टेंबर 2022 पासून खामगाव येथे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबीर घेण्यात येणार आहे. यात केवळ महिलांशी संबंधित आजारांची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून होणार असून औषधोपचारासह शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहे.

माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी दिली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे,  सहायक शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, स्त्री रुग्णालयाचे डॉ. साहिल वासेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. यास्मीन चौधरी आदी उपस्थित होते.

या अभियानात महिलांच्या आजारासह दंत शिबिरही या दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. स्त्री रूग्णालयात बाह्य रूग्ण तपासणी सुरू करण्यात येणार आहे. खामगाव येथे दि. 28 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2022 दरम्यान महिलांसाठी शिबीर घेण्यात येणार आहे. यात दि. 28 सप्टेंबर रोजी आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. दि. 29 आणि 30 सप्टेंबर 2022 रोजी शस्त्रक्रिया करण्यात येतील. दि. 1 ऑक्टोबर 2022 रोजी शस्त्रक्रिया झालेल्या महिलांची शस्त्रक्रिया पश्चात तपासणी करण्यात येईल. महिलांसोबत मुलांसाठीही आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे. त्यानंतर वैयक्तिक समुपदेशन करण्यात येणार आहे.

महिलांसाठी आवश्यक असणाऱ्या आरोग्य तपासणी, सीटी स्कॅन, सोनोग्राफी, एक्सरे, मेमोग्राफी, लसीकरण, रक्तगट तपासणी आदी सुविधा या अभियानाच्या कालावधीत देण्यात येणार आहे. तपासणी दरम्यान अतिजोखमीच्या मातांची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत करण्यात येणार आहे.

00000

गुंतवणूक वृद्धीबाबत मंगळवारी जिल्हास्तरीय कार्यशाळा

बुलडाणा, दि. 23 : गुंतवणूक वृद्धी, व्यवसाय सुलभीकरण, निर्यात व एक जिल्हा, एक उत्पादनाबाबत जिल्हास्तरीय कार्यशाळा मंगळवार, दि. 27 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आली आहे. उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदिप कांबळे आणि जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे.

सहकार विद्यामंदिरासमोरील नर्मदा हॉलीडेज येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेसाठी निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संघटना, औद्योगिक समूह, प्रगतीशील शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमाचे जिल्हास्तरीय अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समिती सदस्य, निर्यातविषयक कामकाज करणारे घटक, वित्तीय संस्था यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

कार्यशाळेला जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संतोष डाबरे, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त श्री. केदार, भारतीय स्टेट बँकेचे महाव्यवस्थापक संजय श्रीवास्तव, विभागीय व्यवस्थापक पकंजकुमार बर्नवाल, विशोक कुमार, इश्वद बायोटेकचे संजय वायल, मैत्रीचे एल. आर. कटारे, बेस्ट इंटरनॅशनल सर्व्हीसेसचे सुनील कोईनकर मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यक्रमात केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी जिल्ह्यातून निर्यातवृद्धी होणेविषयी मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी निर्यातदारांसमवेत चर्चासत्र होणार आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनील पाटील यांनी केले आहे.

00000

धाड, चिखली येथे रोगनिदान शिबीर

बुलडाणा, दि. 23 : नागरिकांच्या सोयीसाठी धाड आणि चिखली येथे रोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

धाड येथील ग्रामीण रुग्णालयात दि. 24 सप्टेंबर 2022 आणि चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात दि. 26 सप्टेंबर 2022 रोजी सर्व रोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरीकांनी या शिबीरामध्ये उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.

000000

निरुपयोगी साहित्याचा लिलाव

बुलडाणा, दि. 23 : देऊळगाव राजा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विविध व्यवसायाचे प्रशिक्षणासाठी वापरुन पुर्णपणे निकामी झालेल्या तसेच कालबाह्य निरुपयोगी मशिनरीचा लिलाव किंवा निविदा पद्धती करण्यात येणार आहे. इच्छुकांनी यासाठी निविदा सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर मशिनरी, साहित्य कार्यालयीन वेळेत दि. 29 सप्टेंबर 2022 पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संस्थेत पाहण्यासाठी  ठेवण्यात आले आहे. सदरील साहित्य खरेदीसाठी इच्छुकांनी आपल्या निविदा दि. 29 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत कार्यालयात स्व:हस्ते किंवा पोस्टाद्वारे सादर करावी. सदर साहित्याची निविदा, लिलाव त्याच दिवशी दुपारी 2 वाजता सर्वासमक्ष उघडण्यात येईल.

0000000

 

No comments:

Post a Comment