Thursday 28 July 2022

DIO BULDANA NEWS 28.7.2022

 


सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग करावा

*प्रत्येक घरी वीज पोहचविण्याचे लक्ष

*ऊर्जा क्षेत्रातील देशाची दैदिप्यमान प्रगती

बुलडाणा, दि. 28 : केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालय, राज्य शासन आणि ऊर्जा विभागातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत ‘उज्वल भारत, उज्वल भविष्य,  पॉवर @2047’ चा ऊर्जा महोत्सव लोणारच्या तहसील कार्यालयच्या सभागृहात पार पडला.

शिवनी जाटचे सरपंच राजेश गवळी अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून तालुकाच्या प्रभारी तहसीलदार श्रीमती परळीकर, महावितरण अकोला परिमंडाळाचे मुख्य अभियंता अनिल डोये उपस्थित होते.

वीज ही विकासाची जननी आहे. ऊर्जा क्षेत्रात देशाने टाकलेले प्रगती पाऊल बघून प्रत्येक भारतीयांचा ऊर आनंदाने भरून निघेल असे नेत्रदीपक आयोजन  करण्यात आलेले होते.

          प्रभारी तहसीलदार श्रीमती परळीकर यांनी अमृत महोत्सवी वर्षाच्या उपस्थितांना शुभेच्छा देत ऊर्जा महोत्सवाकरिता या जागतिक स्तरावर नावारूपास आलेल्या शहरात नियोजनबद्ध आयोजन करून लोणारवासीयांना ग्राहकांचे हक्क, विविध योजनांची माहिती, देशाची ऊर्जा क्षेत्रातील प्रगती याबाबत माहिती दिली त्याबद्दल आभार मानले.

सक्षम भारत घडविण्यासाठी २०४७चे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून असलेली आव्हाने  समर्थपणे पेलण्याची ताकद आपल्याकडे आहे. येत्या काही वर्षांत सरकारच्या प्रभावी नियोजनाचे सकारात्मक परिणाम दिसून येतील, अशी ग्वाही देत शेतकऱ्यानी जास्तीत जास्त सोलर ऊर्जेचा वापर वाढवावा, असे आवाहन अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता यांनी  केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा योजनेचे लाभार्थी श्री. गवळी यांनी अखंडित वीज पुरवठ्यामुळे उत्पन्नात भर पडून जमिनीचा मोबदला वाढला असल्याचे सांगितले.

देशाने ऊर्जा क्षेत्रामध्ये केलेल्या कामगिरीवर चित्रफितीच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला. यावेळी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थीना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. लाभार्थीनी विजेमुळे त्यांच्या जीवन आणि उत्पन्नात पडलेली भर याबाबत मनोगत व्यक्त केले.

महावितरणचे अधीक्षक अभियंता तथा नोडल अधिकारी संजय आकोडे यांनी प्रास्ताविक केले. विकास बांबल यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला पावर फायनान्स कॉर्पोरेशनचे उपमुख्य व्यवस्थापक तरुणकांत गुप्ता, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री बद्रीनाथ जायभाये, श्री अजितपालसिंग दिनोरे, श्री प्रशांत गायकवाड उपस्थित होते.

यावेळी वीज ग्राहकांसाठी असलेले कायदे, ग्राहकांचे हक्क आदीबाबत जनजागृती महावितरणचे गणेश बंगाळे आणि चमूने लघु नाटिकेद्वारे केली. तसेच शाहीर गणेश कदम यांनी लोककलापथकाद्वारे महावितरणच्या विविध योजना समजून सांगितल्या. मनीष कदम यांनी आभार मानले.

देशाने ऊर्जा क्षेत्रात केलेल्या कामगिरीवर प्रकाश टाकण्यासाठी ऊर्जा महोत्सवाचे आयोजन दि. 25 ते 30 जुलै या कालावधीत करण्यात येत आहे. देश ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याकडे वाटचाल करीत आहे. सीओपी-21मध्ये अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांद्वारे वीज उत्पादनाचे 2030 पर्यंत एकूण उत्पादन क्षमतेपैकी 40 टक्के ऊर्जा निर्माण करण्याचे उद्दिष्ट होते. परंतू हे लक्ष नियोजित वेळेच्या ९ वर्षाअगोदरच गाठले आहे. भारत ऊर्जा निर्यात करणारा देश ठरला आहे. मागणीपेक्षा विजेचे उत्पादन अधिक असल्याने २०१५ मध्ये सरासरी १२.५ तास वीज उपलब्ध होती, ती आज देशात सरासरी २२.५ तास उपलब्ध झाली आहे. लदाख ते कन्याकुमारी आणि कच्छ ते म्यानमार पर्यंत जोडणारे एकात्मिक ग्रीड निर्माण करण्यात आले.

00000

शिक्षणाचा अधिकारातील चौथ्या टप्प्याची प्रवेश प्रक्रिया सुरु

* दि. 30 जुलै 2022 पर्यंत करावे लागणार प्रवेश

बुलडाणा, दि. 28 : बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सन 2022-23 या वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया सद्यास्थितीत सुरु आहे. निवड यादीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून चौथ्या टप्प्यातील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून प्रवेश दि. 30 जुलै 2022 पर्यंत करावे लागणार आहे.

प्रतिक्षा यादीतील चौथ्या टप्प्यातील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. या टप्प्यात दि. 30 जुलै 2022 पर्यंत विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करता येतील. चौथ्या टप्प्यातील प्रतिक्षा यादीतील बालकांच्या पालकांनी त्यांच्या लॉगीनमधून ॲलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून, विहित मुदतीत तालुकास्तरावरील कागदपत्रे पडताळणी समिती केंद्रावर सादर करून प्रवेश निश्चित करुन घ्यावे. जिल्ह्यातील सर्व शाळा, पालक आणि तालुकास्तरावतील संबंधित यंत्रणांनी नोंद घेवून, अधिकाधिक बालकांना प्रक्रियेत सहभागी करावे, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी किशोर पगारे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment