Friday 22 July 2022

DIO BULDANA NEWS 22.7.2022

                 डाक विभागाची राष्ट्रीय पातळीवरील पत्रलेखन मोहिम

*विद्यार्थी, युवकांनी सहभाग घ्यावा

          बुलडाणा, दि. 22 : डाक विभागातर्फे तरुण पिढीला जोडण्यासाठी आणि मुलांमध्ये पत्र लेखनाचा छंद जोपासण्यासाठी ढाई आखर हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यातून राष्ट्राशी संबंधित महत्त्वाच्या मुद्यांवर तरुण पिढीचे विचार मांडण्यात येतात. यावर्षी ‘ढाई आखर’ राष्ट्रीय पातळीवरील पत्रलेखन मोहिम दि. 1 जुलै 2022 ते दि. 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत आयोजित केली आहे. ‘व्हिजन फॉर इंडिया 2047’ या विषयावर विद्यार्थ्यांना कल्पना मांडव्या लागणार आहे.

          सन 2022-23 च्या ‘ढाई आखर’ पत्रलेखन मोहिमेच्या दोन श्रेणी आहेत. पत्र हे आंतरदेशीय पत्रावर जास्तीत जास्त 500 शब्द अथवा ए-4 आकाराच्या कागदावर जास्तीत जास्त एक हजार शब्दांमध्ये हाताने लिहून लिफाफा, आंतरदेशीय पत्र हे मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, महाराष्ट्र 400 001 यांना संबोधित असावे. तसेच त्यावर मी प्रमाणित करतो की, मी दि. 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी किंवा वरील आहे असे नमूद करावे. महाराष्ट्र सर्कल पातळीवर पहिले पारितोषिक 25 हजार रूपये, द्वितीय पारितोषिक 10 हजार रूपये, तृतीय पारितोषिक 5 हजार रूपये देण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील विद्यार्थी तसेच तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन डाक अधीक्षक गणेश अंभोरे यांनी केले आहे.

00000

भारतीय डाक विभागाची दिन दयाल फिलॅटेली शिष्यवृत्ती योजना

* 31 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज सादर करावे

          बुलडाणा, दि. 22 : भारतीय डाक विभागातर्फे दरवर्षी शालेय विद्यार्थ्यामध्ये फिलॅटेली मार्फत फिलॅटेलीक स्टॅम्पची माहिती तसेच स्टॅम्प संग्रहाबद्दल आवड निर्माण व्हावी, यासाठी दिन दयाल शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. यावर्षीच्या दिन दयाल शिष्यवृत्ती योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी  दि. 1 ते 31 ऑगस्ट 2022 या कालावधीत अर्ज सादर करावे लागणार आहे. 

या योजनेचा मूळ हेतू हा विद्यार्थ्यांमध्ये डाक विभागाप्रती आवड निर्माण व्हावी हा आहे. या योजनेतून फिलॅटेली छंद म्हणून जोपासणाऱ्या भारतातील 920 विद्यार्थ्यांना सहा हजार रूपये प्रती वर्षप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज सादर करावे, असे आवाहन डाक अधिक्षक गणेश अंभोरे यांनी केले आहे.

00000

‘उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य’ कार्यक्रमाचे मंगळवारी आयोजन

बुलडाणा, दि. 22 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी बुलडाणा मंडळ कार्यालय अंतर्गत ‘उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 26 जुलै रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन आणि दि. २८ जुलै रोजी दुपारी 12 वाजता लोणार येथील तहसील कार्यालयात हा कार्यक्रम पार पडणार आहे. 

कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय ग्राम विकास समिती अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव उपस्थित राहणार आहेत. यावेळी खासदार रक्षा खडसे, आमदार डॉ. रणजित पाटील, अॅड. किरण सरनाईक, वसंत खंडेलवाल, डॉ. राजेंद्र शिंगणे, डॉ. संजय कुटे, डॉ. संजय रायमुलकर, अॅड. आकाश फुंडकर, राजेश एकडे, संजय गायकवाड, श्वेता महाले, महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी उपस्थित राहणार आहेत. तरी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचे उमुख्य व्यवस्थापक तरूणकांत गुप्ता, महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये, अधीक्षक अभियंता संजय अकोडे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment