Thursday 14 July 2022

                                                        डाक विभागामार्फत अपघात विमा योजना

बुलडाणा, (जिमाका) दि. 14 : डाक विभागच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकच्या सहाय्याने टाटा अपघात सुरक्षा विमा योजना जून 2022 पासून सुरु झालेली आहे. अपघात विम्याचा 399 रूपये हप्ता भरून यात सहभागी होता येईल. या योजनेसाठी विमाधारकाची वयोमर्यादा 18 ते 65 वर्षे आहे.

विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसाला 10 लाख रुपयांचे संरक्षण मिळणार आहे. अपघातात कायमस्वरुपी संपूर्ण अपंगत्व आल्यास 10 लाख रुपयांचे संरक्षण, अपघातात कायमस्वरुपी अंशत: अपंगत्व आल्यास 10 लाख रुपयाचे संरक्षण, अपघतामुळे पक्षघात झाल्यास 10 लाख रुपयांचे संरक्षण, वैद्यकीय खर्चासाठी आंतररुग्ण खर्च 60 हजार रुपये तर बाह्यरुग्णासाठी 30 हजार रुपये मिळतील. विमाधारकाचा मृत्यू झाल्यास 10 लाख रुपये व्यतिरिक्त 2 अपत्यांसाठी प्रत्येकी 50 हजार रुपयांप्रमाणे 1 लाख रूपयांपर्यंत शैक्षणिक लाभ मिळतील. अपघातानंतर रुग्णालयात दाखल असताना दररोज रुपये 1 हजार रूपयांप्रमाणे 10 दिवसांपर्यंत रुम चार्जेस मिळतील. तसेच अपघात झाल्यानंतर कुटुंबाचा दवाखान्यापर्यंत येणेसाठी वाहतूक खर्च जास्तीत जास्त 25 हजार रूपयांपर्यंत देण्यात येतील. अपघातात विमाधारकाचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कारासाठी 5 हजार रुपये मिळतील. सदर विमा हा जिल्ह्यातील सर्व ग्रामीण, तसेच शहरी डाक कार्यालयात उपलब्ध आहे, असे बुलडाणा विभागाचे अधीक्षक डाकघर गणेश अंभोरे यांनी कळविले आहे.  

*******

क्रॉपसॅप अंतर्गत एक दिवसीय प्रशिक्षण

बुलडाणा, (जिमाका) दि. 14 : क्रॉपसॅप अंतर्गत उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी एक दिवसीय प्रशिक्षण पार पडले.

प्रशिक्षणाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून बुलडाणा येथील कृषी संशोधन केंद्राचे डॉ. सी. पी जायभाये, कृषी विज्ञान केंद्राचे श्री. देशपांडे उपस्थित होते. या एकदिवसीय प्रशिक्षणात सोयाबीन, कापूस, मका या प्रमुख पिकांचे लागवड तंत्रज्ञान, एकात्मिक खते व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थान, एकात्मिक कीड व्यवस्थापन, गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन, मक्यावरील लष्करी अळीचे व्यवस्थापन, पाऊस आणि हवामान स्थिती इत्यादी बाबींवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. क्रॉपसॅपच्या वतीने निरीक्षणे, शेतीशाळा, महाडीबीटीअंतर्गत फळबाग शेतीशाळाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

चिखली तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे यांनी प्रास्ताविक केले. कृषी पर्यवेक्षक विष्णू डुकरे यांनी सूत्रसंचालन केले.

**********

शिष्यवृत्तीची परीक्षा आता 31 जुलै रोजी होणार

बुलडाणा, (जिमाका) दि. 14 : राज्यात निर्माण झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परिक्षा दि. 20 जुलै 2022 ऐवजी दि. 31 जुलै 2022 रोजी घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवीची पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि आठवीची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही दि. 20 जुलै 2022 रोजी राज्यात एकाच वेळी घेण्यात येणार होती. मात्र अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीची स्थिती आणि बहुतांश ठिकाणी भुस्खलनामुळे वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या दळणवळणास येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन, तसेच विद्यार्थीहित आणि त्यांची सुरक्षा लक्षात घेता ही परीक्षा रविवार, दि. 31 जुलै 2022 रोजी घेण्यात येणार आहे. परिक्षेसाठी यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र दि. 31 जुलै 2022 रोजीच्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी कळविले आहे.

 

सैयद रोशन सैयद कादिर यानी

बैतूल जिल्हा न्यायालयात उपस्थित राहावे

बुलडाणा, (जिमाका) दि. 14: नांदुरा येथील तेलीपुरातील सैयद रोशन पिता सैयद कादिर यानी बैतूल जिल्हा न्यायाधीश यांच्या न्यायालयात उपस्थित राहावे, यासाठी जाहिर सूचना प्रकटन करण्यात आले आहे.

गौवंश अधिनियम अंतर्गत, वाहन राजसात प्रकरणात बैतूल येथील जिल्हा मॅजिस्ट्रेट न्यायालय येथे उपस्थित राहण्यासाठीची जाहिर सूचना अपर जिल्हादंडधिकारी यांनी प्रकाशित केली आहे.

******

स्वराज्य महोत्सवात माजी सैनिकांनी सहभागी होण्याचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 14 : आझादी का अमृत महोत्सवांतर्गत स्वराज्य महोत्सवात माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवा, युध्द विधवा, विरपिता, अवलंबित, विविध माजी सैनिक संघटना आणि संस्थेचे अध्यक्ष आणि पदधिकारी यांनी स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात आणि देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी मनात राहावी आणि त्यांचे संस्मरण व्हावे यासाठी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महात्सव साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले आहे.

राज्यात दि. 9 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत स्वराज्य महोत्सव साजरा करण्यात येत आहे. दि. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता एकाच वेळी राष्ट्रगीत गायन होईल. माजी सैनिकांनी नागरिकांना ते ज्याठिकाणी असतील त्याठिकाणी उभे राहून राष्ट्रगीत गायन करावे, यासाठी आवाहन करावे. जिल्ह्यात जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावर विविध प्रकारचे कार्यक्रम, उपक्रमाचे आयोजन करण्यात यावे. जिल्हास्तरावर ध्वजारोहन, सायक्लोथॉन, मॅरेथॉन, ऐतिहासिक ठिकाणी पदयात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच तालुकास्तरावर ध्वजारोहन, वृक्षारोपन, सांस्कृतिक कार्यक्रम ग्रामस्तरावर ग्रामसभेचे आयोजन, हर घर झेंडा उपक्रम, रांगोळी, घराला तोरण, घरावर तिरंगा फडकवावा, राष्ट्रध्वजाचे महत्त्व, मान-सन्मान, सकाळी राष्ट्रध्वज फडकविणे व सायंकाळी सूर्यास्त होण्यापूर्वी राष्ट्रध्वज उतरविणे, ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा अवमान हाणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी, याबाबत नागरिकांना प्रोत्साहित करावे. तसेच आजादी का अमृत महोत्सव, गौरवशाली पर्वानिमित्त स्वराज्य महोत्सव साजरा करण्यासाठी माजी सैनिकांनी सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान यांनी कळविले आहे.  

*****


No comments:

Post a Comment