Thursday 21 July 2022

DIO BULDANA NEWS 21.7.2022

 



हर घर तिरंगा उपक्रमात नागरिकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा

-जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती

बुलडाणा, दि. 21 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सुमारे पाच लाख घरांवर झेंडा उभारण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. सर्वांना झेंडे उपलब्ध व्हावेत, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी यात सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी केले.

          स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र आणि राज्यस्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. याबाबतची माहिती आज जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, अधीक्षक शामला खोत आदी उपस्थित होते.

          जिल्हाधिकारी म्हणाले, नागरिकांमध्ये स्वातंत्र्याचा उत्साह निर्माण करून त्यांच्यात देशभावना निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. प्रामुख्याने स्वातंत्र्य चळवळीशी संबंध आलेले स्वातंत्र्यसैनिक, माजी-आजी सैनिक यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासोबतच स्वातंत्र्य चळवळीशी निगडीत हुतात्मा स्मारकांचे सुशोभिकरण हाती घेण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांबाबतची माहिती प्रदर्शनातून देण्यात येणार आहे. यासोबतच दि. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता सर्व नागरिक ज्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी उभे राहून राष्ट्रगीत म्हणतील.   या उपक्रमात ग्रामसभेची विशेष सभा, वारसास्थळांच्या पदयात्रा, लोकोत्सव, संविधान स्तंभ उभारणे, आजी-माजी सैनिकांच्या समस्यांसाठी विशेष शिबीर, अमृत सरोवर घेण्यात येतील.

          हर घर तिरंगा उपक्रम राबविताना नागरिकांना ध्वजसंहितेचे पालन करावे लागणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना याची माहिती व्हावी, यासाठी ध्वज विक्रीच्या ठिकाणी माहिती देण्यात येणार आहे नागरिकांना ध्वज उपलब्ध व्हावेत, यासाठी खादी ग्रामोद्योग आणि बचत गटांशी संपर्क साधून त्यांना ध्वज निर्मितीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ध्वज उपलब्ध व्हावेत, यासाठी स्वस्त धान्य दुकानातूनही विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे, नागरिकांनी यात सक्रीय सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

00000

मतदारयादीतील तपशील आधारशी जोडण्यासाठी माहिती संग्रहास सुरूवात

*1 ऑगस्टपासून कार्यक्रमाला सुरूवात होणार

*विशेष शिबीरांच्या माध्यमातून आधार संकलन

*आधार संलग्न करण्यासाठी ऑनलाईन सुविधा

बुलडाणा, दि. 21 : निवडणूक मतदारयादीतील मतदारांच्या तपशिलाशी आधारची माहिती संग्रहित करण्याचा कार्यक्रम व्यापक स्वरूपात दि. 1 ऑगस्ट 2022 पासून करण्यात येणार आहे. मतदारांनी आधार क्रमांक सादर करणे ही बाब ऐच्छिक राहणार आहे. त्यामुळे आधार क्रमांक लिंक केले नसल्यास मतदारयादीतून नाव वगळल्या जाणार नसल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी गौरी सावंत यांनी दिली आहे

मतदारांची ओळख प्रस्थापित करणे आणि मतदारयादीतील नोंदींचे प्रमाणीकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदारसंघात एकाच व्यक्तीची नावनोंदणी ओळखणे यासाठी मतदार ओळखपत्रासोबत आधार क्रमांक लिंक केल्या जाणार आहे.

या कार्यक्रमाची अंमलबजावणी दि. 1 ऑगस्ट 2022 पासून व्यापक प्रमाणात करण्यात येणार आहे. मतदार नोंदणी अधिकारी यांना मतदारयादीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून विहित स्वरुपात आणि रीतीने आधार क्रमांक मिळविण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे.

मतदारांना त्यांच्या आधार क्रमांक भरण्सासाठी नमुना अर्ज क्र. 6 ब तयार करण्यात आला आहे. अर्ज क्र. 6 ब भारत निवडणूक आयोगाच्या आणि मुख्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मतदारांना ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र. 6 ब, ERO Net, GARUDA, NVSP, VHA या माध्यमांवर देखील उपलब्ध असेल.  तसेच अर्ज क्र. 6 ब च्या छापील प्रती देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्याची सुविधा पोर्टल, ॲपच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्याच्या दोन पद्धती असतील. स्व-प्रमाणीकरणाच्या माध्यमातून भारत निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या पोर्टल, ॲपच्या माध्यमातून मतदार ऑनलाईन पद्धतीने अर्ज क्र. 6 भरुन आधार क्रमांक नोंदवू शकतील. तसेच स्व-प्रमाणीकरणाशिवाय ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरुन त्यामध्ये दर्शविलेल्या 11 पर्यायी कागदपत्रांपैकी मनरेगा जॉब कार्ड, बँक, पोस्ट ऑफीस कार्यालयाकडून निर्गमित केलेले फोटोसहीत पासबुक, आरोग्य विमा, स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्‍स, पॅन कार्ड, एनपीआर अंतर्गत आरजीआय मार्फत वितरीत केलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसहित पेंशन कागदपत्रे, केंद्र आणि राज्य शासन कर्मचाऱ्यांचे छायाचित्रासह ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागाकडील ओळखपत्र यापैकी एक दस्ताऐवज सादर करता येईल.

या कार्यक्रमाची औपचारिकपणे सुरुवात दि. 1 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. दि. 4 सप्टेंबर 2022 रोजी याबाबत पहिले विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतरच्या विशेष शिबिराचे वेळापत्रक स्वतंत्ररित्या कळविण्यात येणार आहे. आधार कार्ड संकलनासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यातर्फे घरोघरी भेटी देवून आधार कार्ड संकलन करण्यात येणार आहे. मतदारयादीतील 100 टक्के मतदारांशी संपर्क करुन त्यांचे कडून दि. 31 मार्च 2023 पुर्वी नमुना अर्ज क्र. 6 ब मध्ये आधार क्रमांक उपलब्ध होईल, अशा रितीने कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. आधार क्रमांक मिळवण्याचा उद्देश मतदारयादीतील त्याच्या नोंदींचे प्रमाणीकरण करणे आणि भविष्यात त्यांना अधिक चांगली निवडणूक सेवा प्रदान करण्यासाठी करण्यात येणार आहे.

मतदारांनी मतदार ओळखपत्रासोबत आधार क्रमांक संलग्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी एस. रामामुर्ती आणि उप जिल्हा निवडणूक अधिकारी गौरी सावंत  यांनी केले आहे.

00000

दिव्यांग व्यक्तीकडून राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

*28 ऑगस्ट 2022पर्यंत अर्ज सादर करावेत

बुलडाणा, दि. 21 : केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातर्फे दिव्यांग व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतात. यातील 2021 आणि 2022 या वर्षासाठी नामांकन व अर्ज मागविण्यात आले आहे. दि. 28 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.

इच्छुक व्यक्तींनी अर्ज, नामांकन awards.gov.in या संकेतस्थळावर भरावे लागणार आहे. दि. 28 ऑगस्ट 2022 पूर्वी राष्ट्रीय पुरस्कार 2021 आणि 2022 करीता प्राप्त सर्व अर्ज, नामांकने विचारात घेतल्या जातील. दोन्ही वर्षाकरिता स्वतंत्ररित्या अर्ज, नामांकने ऑनलाईन पोर्टलवर पासवर्ड संरक्षित करून सादर करावेत. पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विशिष्ट नमुन्यातील अर्जामधील सर्व मुद्यांची माहिती उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्याचा सविस्तर वर्णनासह भरावी. समक्ष अथवा पोस्टाने सादर केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

पात्रता निकष आणि इतर सविस्तर तपशिल disabilityaffairs.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. दिव्यांगा व्यक्तींच्या सक्षमीकरणाच्या अनुषंगाने राष्ट्रीय पुरस्कारासाठीच्या मार्गदर्शक सुचनानुसार विचारात घेण्यात येतील.

जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींनी अर्ज भरावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी केले आहे.

00000

दिव्यांग, विद्यार्थी, व्यक्तींनी बँक खाते आधार संलग्न करावेत

बुलडाणा, दि. 21 : शासनाकडून मिळणारे वैयक्तिक लाभाच्या योजनांचे अनुदान मिळण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेतील खाते आधार संलग्न करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

शासनाच्या निर्देशानुसार सन 2022-2023 या वर्षापासून वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ मिळविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व दिव्यांग, मागासवर्गीय विद्यार्थी, व्यक्तींना त्यांचे राष्ट्रीयकृत बँकेतील खाते आधार कार्डशी संलग्न करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती, दिव्यांग कल्याणाच्या योजना, मागासवर्गीय कल्याणाच्या योजनांच्या अनुदानासाठी खाते आधार संलग्न करावे लागणार आहे. बँक खाते आधार संलग्न असल्यास शासनाकडून मंजूर झालेले अनुदान त्यांच्या बँक खात्या डीबीटी द्वारे वर्ग करता येईल, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी कळविले आहे.

00000

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदारयादी प्रसिद्ध

*हरकती, सूचना नोंदविण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 21 : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली मतदार यादी दि. 20 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीवर हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील उपकलम 1 कलम 58-1-अ नुसार बुलडाणा जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका 2022च्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित दि. 31 मे 2022 रोजी तयार केली मतदार अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आली आहे. दि. 20 जुलै 2022 रोजी सदर मतदार यादी हरकती व सूचना मागविण्यासाठी प्रसिद्ध करण्याबाबत आयोगाने आदेशित केले आहे.

त्यानुसार दि. 31 मे 2022 रोजी तयार केलेली मतदार यादी राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार हरकती आणि सूचना मागविण्यासाठी दि. 20 जुलै 2022 रोजी तहसील कार्यालय, बुलडाणा येथे प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदार यादी प्रसिद्धीचा कार्यक्रम नुसार दि. 31 मे 2022 रोजी मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक, दि. 20 जुलै 2022 रोजी राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरून जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीकरीता तयार केलेली मतदार यादी हरकती व सूचना मागविण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दि. 25 जुलै 2022 पर्यंत मतदारयादी संदर्भात हरकती सूचना दाखल करता येईल. दि. 29 जुलै 2022 रोजी निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या छापील मतदारयाद्या अधिनियमाच्या कलम 13 खाली अधिप्रमाणीत करण्यात येईल. दि. 29 जुलै 2022 रोजीच निवडणूक विभाग आणि निर्वाचक गणाच्या छापील मतदार याद्या माहितीसाठी ठेवण्यात आल्या आहेत, याबाबतची सूचना प्रसिद्ध करण्यात येतील. दि. 8 ऑगस्ट 2022 रोजी मतदान केंद्राची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे बुलडाणा तहसिलदार यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment