Monday 25 July 2022

DIO BULDANA NEWS 25.7.2022

                                             प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या

लाभासाठी 31 जुलैपर्यंत केवायसी करावी

*कृषि विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 25 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभाचा तिसरा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. ई-केवायसीशिवाय तिसरा हप्ता वितरीत करण्यात येणार नसल्याने या योजनेतील लाभार्थ्यांनी दि. 31 जुलै 2022 पर्यंत ई-केवायसी करावी, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबियांना दोन हजार रूपये प्रती हप्ता याप्रमाणे तीन हप्त्यात सहा हजार रूपये प्रती वर्षी लाभ थेट बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. आतापर्यंत या योजनेतून राज्यातील 109.97 लाख लाभार्थ्यांना 20 हजार 187.04 कोटी रूपयांचा लाभ देण्यात आला आहे.

केंद्र शासनाने शेतकऱ्यांना सहजरित्या लाभ अदा करता यावा, यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांनी त्यांचे ई-केवायसी पडताळणी दि. 31 जुलै, 2022 पुर्वी पुर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. ही ई-केवासी पडताळणी दि. 31 जुलै, 2022 पर्यंत पुर्ण केलेल्या लाभार्थ्यांनाच पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता वितरीत करण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थ्यास स्वतः पीएम किसान पोर्टलवर pmkisan.gov.in या लिंक आधारे किंवा सामाईक सुविधा केंद्रामार्फत ई-केवायसी पडताळणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहेत. या दोनपैकी स्वत:च्या सोईनुसार एका सुविधेच्या आधारे लाभार्थ्यास त्याची ई-केवायसी पडताळणी करता येणार आहे.

पीएम किसान पोर्टलवरील pmkisan.gov.in या लिंकद्वारे ई-केवासी करताना लाभार्थ्यांस त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न केलेल्या मोबाईलवर येणाऱ्या ओटीपीआधारे स्वत:चे ई-केवायसी पडताळणी करता येणार आहे. यासाठी कोणतीही फी आकारणी केली जाणार नाही. तसेच सामाईक सुविधा केंद्रामध्ये जाऊन लाभार्थी बायोमेट्रिक पद्धतीद्वारे ई-केवायसी पडताळणी करू शकतील. यासाठी सामाईक सुविधा केंद्राकडून 15 रूपये प्रती लाभार्थी शुल्क आकारणी करतील.

राज्यात दि. 22 जुलै 2022 अखेर एकूण 61.33 लाख लाभार्थ्यांचे ई-केवायसी पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरीत लाभार्थ्यांनी स्वत: अथवा सामाईक सुविधा केंद्राच्या माध्यमातून त्यांची ई-केवायसी पडताळणी दि­ 31 जुलै 2022 पुर्वी पुर्ण करावे, असे आवाहन कृषि गणना उपआयुक्त विनयकुमार आवटे यांनी केले आहे.

00000

अग्निपथ योजनेंतर्गत जिल्ह्यातील युवकांसाठी

औरंगाबाद येथे अग्निपथ योजनेंतर्गत सैन्य भरती

*युवकांनी 30 जुलैपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 25 : अग्निपथ योजनेंतर्गत जिल्ह्यातील युवकांसाठी सैन्य भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही सैन्य भरती औरंगाबाद येथे दि. 13 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2022 पर्यंत होणार आहे. यासाठी दि. 30 जुलै 2022 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अग्निपथ योजनेंतर्गत औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रिडांगणावर पुरूषांकरिता ही भरती होणार आहे. यात अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर क्लार्क, स्टोअर किपर, टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समन दहावी पास, अग्निवीर ट्रेड्समन आठवी पास या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे. यासाठी युवकांना joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे.

जिल्ह्यातील युवकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

00000

रक्षाबंधनासाठी पोस्टाची विशेष व्यवस्था

बुलडाणा, दि. 25 : यावर्षीच्या रक्षाबांधनानिमित्त पोस्ट ऑफीसमार्फत राखी पाठविण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

यावर्षी पोस्ट ऑफिस मार्फत देश-विदेशात राखी पाठवण्याची विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. राखी पाठविण्यासाठी पाकिटावर राखी टपाल’ नमूद करून अचूक पिन कोड लिहावा, नागरिकांनी आपल्या नजिकच्या पोस्ट ऑफिसमार्फत राखी, भेटवस्तू पाठविण्याच्या सोयीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाक अधीक्षक गणेश अंभोरे यांनी केले आहे.

00000

जिल्ह्यातील 12 ग्रामपंचायतींची शुक्रवारी आरक्षण सोडत

*आरक्षण कार्यक्रम जाहिर

बुलडाणा, दि. 25 : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 12 ग्रामपंचायतींच्या आरक्षणाची सोडत शुक्रवार, दि. 29 जुलै रोजी काढण्यात येणार आहे. यासाठीचा आरक्षण कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.

राज्य निवडणूक आयोग यांचे कार्यालयाचे सुधारणा आदेश ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक (सदस्य संख्या, प्रभाग रचना व आरक्षण) सुधारणा आदेश - 2022 आणि राज्य निवडणूक आयोग यांच्या पत्रानुसार बुलडाणा तालुक्यातील चिखला, दत्तापूर, ढालसावंगी, गिरडा, दहिद खुर्द, इरला, मौढाळा, रुईखेड, मायंबा, सव, सावळा, उमाळा, येळगांव या 12 ग्रामपंचायतीच्या मुदत संपत आहे. या ग्रामपंचायतीसाठी आयोगाने दिलेल्या आदेशानुसार आरक्षण सोडत दि. 29 जुलै 2022 रोजी विशेष ग्रामसभा बोलावून तहसिलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रारुप प्रभाग रचनेवार आरक्षणाची सोडत ही नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला आरक्षणानुसार आयोगाचे निर्देशानुसार कार्यक्रमानुसार काढण्यात येईल.

आरक्षण कार्यक्रमानुसार दि. 26 जुलै 2022 पर्यंत आरक्षणाची सोडत काढण्याकरिता विशेष सभेची सुचना देणे, दि. 29 जुलै 2022 रोजीपर्यंत विशेष ग्रामसभा बोलावून तहसिलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली प्रारुप प्रभाग रचनेवार आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. यात नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, महिला आणि सर्वसाधारण महिलानुसार आरक्षण काढण्यात येणार आहे. दि. 1 ऑगस्ट 2022  सोडतीनंतर प्रभागानिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्दी करणे, दि. 1 ऑगस्ट 2022 ते दि. 3 ऑगस्ट 2022 प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी राहणार आहे. दि. 10 ऑगस्ट 2022 रोजी उपविभागीय अधिकारी यांनी प्राप्त हरकती विचारात घेऊन अभिप्राय देणे, दि. 12 ऑगस्ट 2022 रोजी उपविभागीय अधिकारी यांचे अभिप्राय विचारात घेऊन अंतिम अधिसूचनेस (नमुना-अ) जिल्हाधिकारी यांनी मान्यता देणे, दि. 17 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला (नमुना-अ) व्यापक प्रसिद्धी देण्यात येणार आहे, असे बुलडाणाचे तहसिलदार रुपेश खंडारे यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment