Monday 6 September 2021

DIO BULDANA NEWS 6.9.2021

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 390 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 09 पॉझिटिव्ह

  • 15 रुग्णांना मिळाली सुट्टी                                                                                  

बुलडाणा, (जिमाका) दि. 6 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 399 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 390 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 09 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 9 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 272 तर रॅपिड टेस्टमधील 118 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 390 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                      

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  बुलडाणा शहर : चिंचोले चौक 1, खामगाव शहर :2, मेहकर तालुका : दुधा 1, हिवरा 1, नांदुरा शहर :1, लोणार तालुका : मारोती पेठ 1, ब्राह्मण चिकना 1, लोणार शहर :1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 09 रूग्ण आढळले आहे.  तसेच वैद्यकीय प्रोटोकॉल प्रमाणे उपचारांती 15 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.                                                                              

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 698235 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86727 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86727 आहे.  आज रोजी 850 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 698235 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87484 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86727 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 84 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 673 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

**********

                                   गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा

  • जिल्हा प्रशासनाचे आवाहन
  • कोविड 19 संसर्गजन्य परिस्थितीमुळे प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी                                                                                  

बुलडाणा, (जिमाका) दि. 6 : गणेशोत्सव 2021 कोविड 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचे मार्गदर्शक सुचना असलेले शासन परिपत्रक 29 जुन 2021 रोजी जारी करण्यात आले आहे. परिपत्रकानुसार, सार्वजनिक गणपतीसाठी गणेश मंडळाने स्थानिक प्रशासनाची परवानगी घेवूनच गणेश मंडळाची स्थापना करावी. गणेश मंडळाने परवानगी घेताना खाजगी जागेतच गणपती बसविण्यासाठी परवानगी घ्यावी. विनापरवानगी गणेश मंडळाची स्थापना करण्यात येवू नये.

     गणेश उत्सवात  श्रीगणेशाची शाळूची किंवा पर्यावरण पूरक मुर्ती बसविणे, सार्वजनिक मंडळाकरीता 4 फुट व घरगुतीसाठी 2 फुट उंचीच्या मर्यादेत असावी. तसेच विसर्जन घरच्या घरी करावे, विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून कोरोना संसर्गापासून संरक्षण करावे. उत्सवाकरीता देणगी दिल्यास त्याचा स्वीकार करून जाहीरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही, याबाबत खबरदारी घ्यावी. सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्य विषयक उपक्रम राबवावे. गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाची, थर्मल स्कॅनिंगची पर्याप्त व्यवस्था करावी. दर्शन घेवू इच्छिणाऱ्या भाविकांनी सामाजिक अंतर ठेवावे. मास्क, सॅनीटायझरचा वापर करावा.

  श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येवू नये. तसेच आगमन व विसर्जनवेळी 5 लोकांची उपस्थिती ठेवावी. विसर्जनचेळी पारंपारीत पद्धतीने होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमी वेळ थांबावे. तसेच सुरक्षेच्यादृष्टीने लहान मुले व ज्येष्ठ नागरिक यांनी विसर्जनस्थळी जाणे टाळावे. एकत्रित गणेश विसर्जनाची मिरवणूक काढण्यात येवू नये. आरती, भजन, किर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रमाकरिता गर्दी होणार नाही. तसेच ध्वनी प्रदुषणा संदर्भातील नियमांचे व तरतुदींचे काटोकोरपणे पालन करण्यात यावे. आरतीच्या वेळी किंवा  दर्शनाच्या वेळी 5 पेक्षा अधिक व्यक्ती उपस्थित राहणार नाही, याची कटाक्षाने दक्षता घ्यावी. आरतीची वेळ सकाळी 7 ते 9 व सायं 7 ते 9 दरम्यान राहील याची गणेश मंडळाने खबरदारी घ्यावी. आवश्यकतेनुसार दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट याद्वारे उपलब्ध करून देण्यात यावे. गणेश विसर्जन करण्यासाठी गर्दी टाळण्याच्यादृष्टीने शहरी भागात मुख्याधिकारी नगर पालिका यांनी गणेश मुर्तीचे संकलन करण्यासाठी स्थळ निश्चित करून नगर पालिकेचे वाहन प्रभाग निहाय उपलब्ध ठेवावे, तसेच गणेश विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती करून त्या ठिकाणी सर्व सार्वजनिक व घरगुती गणपतीचे विसर्जन करावे. विसर्जन मार्गावर व गणेश मंडळाच्या परिसरात उघड्यावर मांस विक्री होणार नाही. मोकाट जनावरांचा बंदोबस्त होईल, याची  खबरदारी घ्यावी.  

   जिल्ह्यात कोरोना विषाणूचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उत्सव सार्वजनिक न करता घरगुती पद्धतीने साजरा करावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.      

…………….


कालबद्ध कार्यक्रम ठरवून लसीकरण पूर्ण करा

-          पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

  • कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठक
  • गृह विलगीकरणात रूग्णांना ठेवू नका
  • नवीन शासकीय रूग्णालय इमारतीचा तातडीने प्रस्ताव सादर करावा

बुलडाणा, (जिमाका) दि. 6 : कोरोना रूग्णांची जिल्ह्यातील संख्या हळू हळू वाढताना दिसत आहे. आरोग्य संस्था व तज्ज्ञांनी संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. तिसऱ्या लाटेत संसर्ग थोपविण्यासाठी लसीकरण करणे महत्वाचे आहे. उद्दिष्टाच्या अनुषंगाने 60 ते 70 टक्के लसीकरण झाले पाहिजे. यंत्रणांनी कालबद्ध व धडक कार्यक्रम ठरवून पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करून घ्यावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.

   कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठकीचे आयोजन पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले. त्यावेळी आढावा घेताना पालकमंत्री डॉ. शिंगणे बोलत होते.  याप्रसंगी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, अप्पर जिल्हाधिकारी धनजंय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मिनाक्षी बनसोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, सहा आयुक्त श्री. बर्डे आदी उपस्थित होते.

    सध्या सक्रीय असलेल्या रूग्णांना गृह विलगीकरण न देण्याच्या सूचना करीत पालकमंत्री म्हणाले, कोरोना बाधीत रूग्णांना घरी ठेवू नका. त्यांच्यामुळे आणखी संसर्ग वाढतो. त्यांना सक्तीने रूग्णालयात ठेवावे. शासकीय रूग्णालयांतील सुविधांचा दर्जा चांगला ठेवावा. जेणेकरून रूग्ण उपचार घेतील.  तसेच ज्या तालुक्यांमध्ये मागील काही दिवसांपासून एकही रूग्ण निघत नाही. तिथे तपासण्या वाढवाव्यात. त्यासाठी विशेष कार्यक्रम राबवावा. मागील लाटेमध्ये मान्यता दिलेल्या खाजगी कोविड रूग्णांलयांची मान्यता पुन्हा तपासून घ्यावी. त्यासाठी सदर रूग्णालयांमधील सुविधांचा आढावा घ्यावा व पुढे मान्यतांचे नुतनीकरण करावे.

 ते पुढे म्हणाले, कोविड काळात सर्वात महत्वाचा घटक हा प्राणवायू पुरवठा ठरतो. मागील लाटेवेळी 17 मेट्रीक टन उच्चांकी मागणी होती. भविष्यात लाट आल्यास दुप्पट मागणी गृहीत धरून आतापासून नियोजन करून ठेवावे. कार्यान्वीत होणारे प्राणवायू निर्मिती प्रकल्पांची कामे पुर्ण करावे. जिल्ह्यात शासकीय रूग्णालयात असलेले डायलिसीस युनीट जुने झाली आहेत. अनेक ठिकाणी मनुष्यबळाअभावी  किंवा तांत्रिक अडचणीमुळे युनीट बंद आहेत. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले डायलिसीस युनीट खरेदी करावे. त्यापूर्वी जुन्या युनीटची तपासणी करून सद्यस्थिती तपासून घ्यावी. महसूल, ग्रामविकास व गृह विभागाने आपल्या तालुकास्तरीय कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही लावून घ्यावेत. त्याचे नियंत्रण जिल्हास्तरावर ठेवावे. त्यामुळे तालुकास्तरीय यंत्रणांवर जरब बसून नागरिकांची कामे गतीने होतील.

   जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांची बांधकामे झाली आहेत. अशा ठिकाणी तातडीने मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. जिल्हा रूग्णालयाची इमारत जुनी झाली आहे. सदर इमारतीला अनेकवेळा डागडुजी करण्यात आली आहे. ही इमारत पाडून त्याजागी नवीन इमारत बांधकाम करण्याचा प्रस्ताव तातडीने जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सादर करावा. जिल्ह्यात शहरी भागातील शासकीय रूग्णालयांचे फायर ऑडीट पूर्ण झाले आहे. मात्र ग्रामीण भागातील शासकीय रूग्णालयांचे फायर ऑडीट झालेले नाही. त्याचाही प्रस्ताव पाठवून ग्रामीण भागातील शासकीय रूग्णालयांचे फायर ऑडीट पूर्ण करावे. अन्न व औषध प्रशासन विभागाने सणा सुदीचे दिवस लक्षात घेता मिठाई व मिष्टान्नामध्ये भेसळ तपासणीसाठी मोहिम सुरू करावी. अन्न पदार्थांवर बेस्ट बिफोरची अंमलबजावणी होते की नाही, याची पडताळणी करावी. होत नसल्यास कारवाया वाढविण्यात याव्या, असे निर्देशही पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी यावेळी दिले.   बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment