Tuesday 7 September 2021

DIO BULDANA NEWS 7.9.2021

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 819 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 03 पॉझिटिव्ह

  • 15 रुग्णांना मिळाली सुट्टी                                                                                  

बुलडाणा, (जिमाका) दि. 7 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 822 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 819 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 03 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 116 तर रॅपिड टेस्टमधील 703 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 819 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                      

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  बुलडाणा शहर : चिंचोले चौक 3, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 03 रूग्ण आढळले आहे.  तसेच वैद्यकीय प्रोटोकॉल प्रमाणे उपचारांती 15 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.                                                                             

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 699054 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86742 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86742 आहे.  आज रोजी 950 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 698235 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87487 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86742 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 72 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 673 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

**********

                                   

मुसळधार पावसाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा

-         पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

बुलडाणा, (जिमाका) दि. 7 : जिल्ह्यात काल रात्रीपासून अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे. तसेच आज 7 सप्टेंबर रोजी सकाळी मुसळधार पावसाची व्याप्ती वाढली.  या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात नदी नाल्यांना पूर आला असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात व घरात पाणी गेले आहे. परिणामी, त्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे, असे आदेश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिले. बुलडाणा तालुक्यातील पाडळीसह काही गावे बाधीत झाली आहे.  या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली. तसेच त्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत देण्याच्या सूचना दिल्या.  

*****

जल जिवन मिशन अंतर्गत प्रस्तावित कामांना प्रशासकीय मान्यता द्यावी

-          जिल्हाधिकारी एस रामामूर्ती

  • जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समिती बैठक

बुलडाणा, (जिमाका) दि. 7 : जिल्ह्यात प्रादेशिक व स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत आहेत. त्यापैकी बऱ्याच योजना जुन्या असून त्यांना दुरूस्त करण्याची गरज आहे. तसेच जल जीवन मिशन अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजनाही प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. या मिशन अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्याचे काम पुर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी आज दिल्या.  

    जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या दालनात आज जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, मजिप्राचे कार्यकारी अभियंता व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  

   जल जीवन मिशन अंतर्गत कामे प्रस्तावित करताना लोकप्रतिनिधींच्या मागणीची दखल घेण्याच्या सूचना करीत जिल्हाधिकारी म्हणाले, त्यांना विश्वासात घेवून कामे घ्यावी. तसेच जुन्या योजनांची रेट्रोफिटींगची कामे करावी. जिल्हा स्तरावरील योजनांची कामे पुर्ण करून मंजूरीसाठी शासनाकडे पाठविण्यात याव्यात. या मिशन अंतर्गत दरडोई 55 लीटर शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावयाचा आहे. त्यादृष्टीने योजनांचा आराखडा तयार करावा. बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

******

 
                          जिल्हाधिकारी कार्यालयात राजे उमाजी नाईक यांना अभिवादन

बुलडाणा, (जिमाका) दि. 7 : राजे उमाजी नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी  आज राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी धनजंय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनीही  राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस‍ अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

******

 

जिल्ह्यात मुसळधार…!

  • सरासरी 26 मि.मी पावसाची नोंद
  • खामगांव तालुक्यात सर्वात जास्त 55.3 मि.मी पाऊस
  • मेहकर तालुक्याने ओलांडली शंभरी

बुलडाणा, (जिमाका) दि.7 : गत दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात काही भागात दमदार, तर कुठे मध्यम, कुठे तुरळक अशा स्वरूपात वरूण राजा हजेरी लावत आहे. मात्र काल रात्रीपासून सर्वत्र मुसळधार पावसाचे धुमशान जिल्ह्यात दिसून येत आहे. यामुळे नदी नाल्यांना पूर आला असून नदीकाठावरील शेतांमध्ये पाणी घुसले आहे. तर काही नागरिकांच्या घरातही पावसाचे पाणी शिरले आहे. जिल्ह्यातील वान, पुर्णा, नळगंगा, पैनगंगा, विश्वगंगा, ज्ञानगंगा, खडकपूर्णा आदी नद्यांना पूर आला आहे.

  जिल्ह्यात खामगांव तालुक्यात सर्वात जास्त 55.3 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील नोंदीनुसार सरासरी 26 मि.मी पाऊस जिल्ह्यात झाला आहे. तसेच आतापर्यत सर्वसाधारण पर्जन्यमानाशी तुलना केली असता मेहकर तालुक्यात 108.68 टक्के पाऊस झाला आहे. मेहकर तालुक्यने पावसाची शंभरी पार केली असून सिं. राजा तालुका नव्वदीच्या पार आहे.

   जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत नोंदविलेला पाऊस पुढीलप्रमाणे : कंसातील आकडेवारी आजपर्यंत झालेल्या पावसाची.  बुलडाणा : 32.7 मि.मी (602.5), चिखली : 30.8 (593.5), दे.राजा : 12.2 (556), सिं. राजा : 16.1 (745.3), लोणार : 23.7 (738.3), मेहकर : 46.2 (911.5.), खामगांव : 55.3 (565.3), शेगांव : 35.8 (376.5), मलकापूर : 19 (432.2), नांदुरा : 20.2 (445.3), मोताळा : 29.7 (461.7), संग्रामपूर : 7.5 (497.4), जळगांव जामोद : 8.3 (351.1)

  जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 7276.6 मि.मी पावसाची नोंद झाली असून त्याची सरासरी 559.7 मि.मी आहे. आतापर्यंत सर्वात कमी 351.1 मि.मी पावसाची नोंद जळगांव जामोद तालुक्यात झाली आहे. त्याची टक्केवारी 49.66 आहे.

जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील तीन मोठ्या व 7 मध्यम प्रकल्पांत जलसाठा पुढीलप्रमाणे : आजचा पाणीसाठा व कंसात टक्केवारी – नळगंगा : 37.36 दलघमी (53.89), पेनटाकळी : 24.71 दलघमी (41.19), खडकपूर्णा : 78.85 दलघमी (84.45), पलढग : 3.39 दलघमी (45), ज्ञानगंगा : 25.96 दलघमी (76.53), मन : 35.37 दलघमी (96.32), कोराडी : 15.12 दलघमी (100), मस : 8.01 दलघमी (53.26), तोरणा : 4.02 दलघमी (50.95) व उतावळी : 19.79 दलघमी (100).

                                                                प्रकल्पांमधून विसर्ग सुरू

जिल्ह्यात काल रात्री व सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रकल्पांमध्ये जलसाठा वाढला आहे. काही प्रकल्पांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मन प्रकल्पाची जलाशय पाणीपातळी 374.30 मीटर असून जीवंत पाणी साठा 96.32 टक्के आहे. प्रकल्पातून आज दुपारी 4 वाजता 3 दरवाजे 0.10 मीटरने उघडण्यात आले आहे. सद्यस्थितीत नदीपात्रात एकूण 36.00 क्युसेक  पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोराडी प्रकल्पाच्या सांडव्यावरून 05 से.मी ने 3.09 क्युसेक विसर्ग सुरू आहे. खडकपूर्णा प्रकल्पातून 2 दरवाजे 20 से.मी उघडल्यामुळे नदीपात्रात 1456 क्युसेक प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. प्रशासनाने नदीकाठावरील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे.  

*****


कोरोना लसीकरण धडक मोहिमेचा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या उपस्थितीत शुभारंभ

  • साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रातून लसीकरणाद्वारे शुभारंभ

बुलडाणा, (जिमाका) दि.7 : सिं.राजा तालुक्यातील साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात पात्र लाभार्थ्यांच्या जिल्ह्यातील धडक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या मोहिमेत साखरखेर्डा येथे 1000 लाभार्थ्यांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिनाक्षी बनसोड, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे, तालुका वैद्यकीय अधिकारी श्री. सावळे, जि.प माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, जि.प सदस्य दिनकर बापु देशमुख, सरपंच दाऊद कुरेशी, पं.स सभापती श्री. बंगाळे, पंस सदस्य राजुभाऊ गोळे, वैद्यकीय अधिकारी संदीप सुरूशे आदी उपस्थित होते.

*******

 

 

No comments:

Post a Comment