Wednesday 22 September 2021

DIO BULDANA NEWS 22.9.2021

 

कोरोना अलर्ट : जिल्ह्यात 18 सक्रीय रूग्ण; आजचे पॉझीटीव्ह ‘शून्य’

• 07 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा, (जिमाका) दि. 22 : जिल्ह्यात कोरोना विषाणूने पुर्णपणे माघार घेतल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात आज पाचव्यांदा नवीन संसर्गीत रूग्णाने शून्य गाठला आहे. जिल्हावासियांसाठी ही दिलासादायक बाब आहे. मात्र तरीही जिल्ह्यात उपचार घेत असलेले 18 सक्रीय रूग्ण आहे. त्यामुळे जिल्हावासियांनी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ धुणे किंवा सॅनीटाईज करणे व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे या त्रि सुत्रींचा अवलंब करावा. तसेच पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

   प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 991 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आज एकही पॉझीटीव्ह रूग्ण आढळून आला नाही. सर्वच 991 अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 219 तर रॅपिड टेस्टमधील 772 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 991 अहवाल निगेटीव्ह आहेत.

तसेच आज 07 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे आजपर्यंत 712761 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86859 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86859 आहे. आज रोजी 772 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 712761 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87550 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86859 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 18 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 673 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे

******

जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमच मुख कर्करोगावर यशस्वी शस्त्रक्रिया

बुलडाणा, (जिमाका) दि. 22 : जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमच मुख कर्करोगावर यशस्वी शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. चिखली तालुक्यातील हातनी येथील 65 वर्षीय रुग्णावर मुख कर्क रोगा संदर्भात ‘टोटल मॅक्सीलॉक्टमी’ शस्त्रक्रिया   प्रथमच यशस्वीरित्या करण्यात आली. अशा प्रकारची शस्त्रक्रिया प्रथमच सामान्य रुग्णालयात झाली आहे. ही शस्त्रक्रिया जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शना नुसार मुख व मानेचे कर्क रोग डॉ राम पाटील, पुणे यांनी ही मुख कर्क रोगाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.

  शस्त्रक्रियेसाठी तब्बल 2 तास 40 मिनिट एवढा कालावधी लागला. शस्त्रक्रियेसाठी व्यवस्था अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भुसारी, डॉ. प्रशांत पाटील (कान नाक घसा तज्ज्ञ)  डॉ सुशील चव्हाण,(नाक कान घसा  तज्ज्ञ ) यांनी उपस्थित राहून केली.  तसेच फिजीशियन डॉ वासेकर, भुलतज्ज्ञ  डॉ उंबरकर,  डॉ मनिषा रेड्डी, मुख व दंत रोग तज्ज्ञ  डॉ अनुजा पाटिल, डॉ सोनाली मुंडे, डॉ मेटकर, तंबाखु नियंत्रण कार्यक्रम जिल्हा समन्वयक डॉ लता भोसले आणि स्वतः   जातीने जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. तडस बुलडाणा जिल्ह्यातील प्रथमच होऊ घातलेल्या शस्त्र क्रियेदम्यान संपूर्ण उपस्थिती राहून मार्गदर्शन केले. जिल्हा रुग्णालयातील दंत विभागाचे डॉ. मेटकर आणि डॉ सोनाली मुंडे यांनी रुग्णाची प्राथमिक तपासणी रोग निदान व शस्त्रक्रियेपर्यंत सर्व बाबतीत पुढाकार घेऊन मोलाचे सहकार्य केले. रुग्णासाठी कृत्रिम टाळू बनविण्यासाठी तंत्रज्ञ ज्ञानेश्वर पवार यांनी  महत्व पूर्ण कार्य केले. रुग्णालयातील नर्सिंग सिस्टर जोशी, जाधव, पाटील, मोगल व कर्मचारी श्री.  इंगळे यांनी सहकार्य केले.

     तसेच स्वतः रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांनी धैर्य ठेऊन मोलाचे सहकार्य केले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम ओपीडी 33 येथील समुपदेशक लक्ष्मण सरकटे व सामाजिक कार्यकर्ता अर्चना आरख यांनी रुग्णाला तंबाखू मुक्त होण्यासाठी पाठपुरावा केला. टाळूचा  कर्करोग बिडी किंवा सिगारेट च्या व्यसनामुळे होतो. मुख व मानेचे कर्करोग तज्ज्ञ डॉ राम पाटील हे जिल्ह्याचे भूमिपुत्र असून वरवंड  ता. जि. बुलडाणा येथील मूळ रहिवाशी आहेत. डॉ राम पाटील यांनी आत्तापर्यंत मुख व मानेचे कर्क रोगाचे 2100 च्या अधिक शस्त्रक्रिया यशस्वी पद्धतीने पार पडल्या आहेत. सध्या डॉ. पाटील पुणे येथील केयर  कुब हॉस्पिटलमध्ये कर्क रोग विभागाचे प्रमुख आहेत. तसेच  पुणे येथील सह्याद्री ग्रूप ऑफ हॉस्पिटल,  एम्स हॉस्पिटल व  इतर अनेक नामांकीत हॉस्पिटलमध्ये  कार्यरत आहेत.

   त्यांचे आजोबा स्व. भिमराव धंदर यांचे स्मरणार्थ ते जिल्ह्यातील रूग्णांची सेवा व्हावी, या उदात्त हेतूने  बुलडाणा  जिल्हा सामान्य रुग्णालयात महिन्याच्या दुसऱ्या सोमवारला ओपीडी 34 ला 10 ते 1 पर्यंत उपलब्ध असतात. "बुलडाणा कॅन्सर सोसायटी"  या उपक्रमाच्या अंतर्गत 24 तास हेल्पलाईन नंबर 8530311333 यावर गरजू रुग्ण व नातेवाईक यांनी निदान व पुढील उपचारासाठी  संपर्क साधून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. तडस यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने केले आहे.

*****

आदिवासीबहुल भागात नेहरू युवा केंद्राने कार्यक्रम घ्यावेत

-          जिल्हाधिकारी एस रामामूर्ती

बुलडाणा, (जिमाका) दि. 22 : जिल्ह्यातील आदिवासीबहूल भागात युवकांच्या कल्याणाचे व युवकांमध्ये जाणीव जागृतीचे कार्यक्रम घ्यावेत. युवकांचा समावेश करून नेहरु युवा केंद्राच्या माध्यमातून कार्यक्रम घेण्यात यावेत.  सकारात्मक कार्यासाठी जास्तीत जास्त युवकांना जोडण्याचे कार्य नेहरु युवा केंद्राने करावे अशा सूचना जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी आज दिल्या.

   भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालया अंतर्गत असलेल्या नेहरु युवा केंद्र बुलडाणाच्या जिल्हा कार्यक्रम सल्लागार समितीची सभा आज 22 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. या सभेला जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सुनिल पाटील, जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रशांत कोठे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.ज्ञानोबा कांदे, भारत स्काऊट जिल्हा संघटक सुभाष आठवले, प्रा. प्रभाकर वारे, जिल्हा अग्रणी बँकेचे विजय गवळी, जि.प. आरोग्य विभाग प्रतिनिधी जी.पी. देवकर, क्रीडा अधिकारी आर.आर.धारपवार, लेखा व कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत, राष्ट्रीय सेवा कर्मी नितिन महाले, गणेश सुर्यवंशी   आदी उपस्थित होते.

  या सभेत  वर्ष 2021-22 चा कार्यक्रम कृतिआराखडा वर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र यांनी सांगितले, नेहरु युवा केंद्र संगठन नवि दिल्ली यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार वर्ष 2020-21 चा कार्यक्रम कृति आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये अजादी का अमृत महोत्सवा निमित्त फीट इंडीया फ्रीडम रन 2.0, महात्मा गांधी यांच्या 150 जयंती उत्सव स्वच्छता अभियान व श्रमदार कार्यक्रम, युवा संमेलन, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिवस व सप्ताह अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन कोविड -19 च्या नियमांचे पालन करुन करण्यात येणार आहे.  तसेच सर्व कार्यक्रमामध्ये जिल्हा प्रशासन, जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, राष्ट्रीय सेवा योजना, जिल्हा उद्योग केंद्र अशा विविध विभागाचे सहकार्य अपेक्षीत असल्याचे सांगितले. शेवटी उपस्थितांचे जिल्हा युवा अधिकारी श्री डागर यांनी आभार  मानले.

****

No comments:

Post a Comment