Tuesday 28 September 2021

DIO BULDANA NEWS 28.9.2021

 

कोरोना अलर्ट : जिल्ह्यात 15 सक्रीय रूग्ण; आजचे पॉझीटीव्ह ‘शून्य’

• 02 रूग्णांना मिळाली सुट्टी       

बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : कोरोना विषाणूचा प्रकोप आता हळू हळू दूर व्हायला लागला आहे. रूग्णवाढीचा वेग कमालीचा मंदावला असून विषाणूने सपशेल माघार घेतल्याचे दिसून येत आहे. पॉझीटीव्ह रूग्णसंख्येने जिल्हावासियांना आज सातव्यांदा शून्याचा अनुभव दिला आहे. मात्र तरीही जिल्ह्यात उपचार घेत असलेले 15 सक्रीय रूग्ण आहे. त्यामुळे जिल्हावासियांनी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ धुणे किंवा सॅनीटाईज करणे व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे या त्रि सुत्रींचा अवलंब करावा. तसेच पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

   प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 438 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आज एकही पॉझीटीव्ह रूग्ण आढळून आला नाही. सर्वच 438 अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 19 तर रॅपिड टेस्टमधील 419 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 438 अहवाल निगेटीव्ह आहेत.

   तसेच आज 02 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे आजपर्यंत 717255 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86876 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86876 आहे. आज रोजी 562 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 717255 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87564 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86876 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 15 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 673 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 

*********

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा

-  पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : जिल्ह्यात  काल व आज अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे. काल रात्री जिल्ह्याच्या काही भागात अतिवृष्टी नोंदविल्या गेली. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात नदी नाल्यांना पूर आला असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात व घरात पाणी गेले आहे. तसेच काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे.  परिणामी, त्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे, असे आदेश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहे. त्याचप्रमाणे नद्यांना आलेल्या पुरामुळे चिखली – खामगांव रस्त्यावर पेठ जवळ पैनगंगा नदीच्या  पुलावरून पाणी वाहत आहे. नांद्राकोळी पुलावरून पाणी असल्यामुळे रायपूर – बुलडाणा वाहतूकही बंद आहे, अशा परिस्थितीत नागरिकांनी पुलावरून पाणी वाहत असताना जीव धोक्यात घालून पुलावरून प्रवास करू नये. आपले वाहन पुलावरील पाण्यातून काढू नये, असे आवाहनही पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी केले आहे.

   जिल्ह्यातील पैनगंगासह अन्य नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे नदी काठावरील काही गावे बाधीत झाली आहे.  या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली. तसेच त्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत देण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत घेतलेल्या नोंदीनुसार बुलडाणा 88.8 मिली, रायपूर 95.5, पाडळी 89.5, धाड 75.5, साखळी 112.8, देऊळघाट 112, चिखली तालुक्यातील चांधई 65.3, नांदुरा तालुक्यातील निमगांव 67.3, मोताळा तालुक्यातील धा.बढे 70.8 मिली अशाप्रकारे अतिवृष्टी झाली आहे.

 तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पिक विमा काढला असल्यास तातडीने पिक विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक, ॲप, संबंधित बँक शाखा, नजीकच्या कृषी विभागाचे कार्यालयाला नुकसानीची माहिती द्यावी. जेणेकरून पिक विमा कंपनी शेतकऱ्यांचे नुकसानची माहिती घेवून पंचनामे करतील व शेतकऱ्यांना मदत देतील. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीने नुकसानीची माहिती पिक विमा कंपनीला द्यावी, असे आवाहनही पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.  

  काही नागरिकांच्या घरांचीही पडझड आली आहे. त्यामुळे संसार उघड्यावर आले आहे. अशा बाधित नागरिकांना तातडीने मदत करावी. तसेच काही शेतकऱ्यांच्या जनावरे सुद्धा वीज पडून किंवा पुरात वाहून मृत पावली आहे. बाधित शेतकऱ्यांनाही मदत द्यावी लागणार आहे. तरी यंत्रणांनी पंचनामे पूर्ण करावे, असे आदेशही पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहे.

**********

                                          जिल्ह्यात संततधार…!

  • सरासरी 36.2 मि.मी पावसाची नोंद
  • बुलडाणा तालुक्यात सर्वात जास्त 89.7 मि.मी पाऊस
  • मेहकर, दे. राजा, सिं.राजा, लोणार तालुक्यांनी ओलांडली शंभरी
  • 9 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद

बुलडाणा, (जिमाका) दि.28 : गत दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात काही भागात मुसळधार, तर कुठे दमदार, कुठे मध्यम अशा स्वरूपात वरूण राजा हजेरी लावत आहे. मात्र काल रात्रीपासून सर्वत्र मुसळधार पावसाचे धुमशान जिल्ह्यात दिसून येत आहे. यामुळे नदी नाल्यांना पूर आला असून नदीकाठावरील धरणांमधून विसर्ग करण्यात येत आहे. जिल्ह्यातील वान, पुर्णा, नळगंगा, पैनगंगा, विश्वगंगा, ज्ञानगंगा, खडकपूर्णा आदी नद्यांना पूर आला आहे.

  जिल्ह्यात बुलडाणा तालुक्यात सर्वात जास्त 89.7 मि.मी पावसाची म्हणजेच अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील नोंदीनुसार सरासरी 36.2 मि.मी पाऊस जिल्ह्यात झाला आहे. तसेच आतापर्यंत सर्वसाधारण पर्जन्यमानाशी तुलना केली असता मेहकर तालुक्यात 128.79 टक्के पाऊस झाला आहे. मेहकर पाठोपाठ   सिं. राजा 111.45, दे. राजा 103.70, लोणार तालुक्यात आतापर्यंत 107.11 टक्के पाउस झाला आहे.

   जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत नोंदविलेला पाऊस पुढीलप्रमाणे : कंसातील आकडेवारी आजपर्यंत झालेल्या पावसाची.  बुलडाणा : 89.7 मि.मी (880.5), चिखली : 29.3 (761.9), दे.राजा : 45 (730.7), सिं. राजा : 16.2 (893.7), लोणार : 15.1 (934.6), मेहकर : 26.4 (1080.2.), खामगांव : 36.4 (697.5), शेगांव : 33.3 (524.4), मलकापूर : 28.8 (567.4), नांदुरा : 48.1 (608.9), मोताळा : 48.6 (642.9), संग्रामपूर : 24.7 (638.1), जळगांव जामोद : 28.4 (487.5)

  जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 9448.3 मि.मी पावसाची नोंद झाली असून त्याची सरासरी 726.8 मि.मी आहे. आतापर्यंत सर्वात कमी 487.5 मि.मी पावसाची नोंद जळगांव जामोद तालुक्यात झाली आहे. त्याची टक्केवारी 68.95 आहे. तसेच जिल्ह्यात 9 महसूल मंडळात अ‍तिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.  बुलडाणा तालुक्यातील बुलडाणा मंडळात 88.8, रायपूर 95.5, पाडळी 89.5, धाड 75.5, साखळी 112.8, देऊळघाट 112, चांधई ता. चिखली 65.3, निमगांव ता. नांदुरा 67.3, धा. बढे ता. मोताळा 70.8 मिली या अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील तीन मोठ्या व 7 मध्यम प्रकल्पांत जलसाठा पुढीलप्रमाणे : आजचा पाणीसाठा व कंसात टक्केवारी – नळगंगा : 55.01 दलघमी (79.35), पेनटाकळी : 45.50 दलघमी (75.85), खडकपूर्णा : 84.39 दलघमी (90.36), पलढग : 7.51 दलघमी (100), ज्ञानगंगा : 33.93 दलघमी (100), मन : 36.37 दलघमी (98.77), कोराडी : 15.12 दलघमी (100), मस : 10.18 दलघमी (67.74), तोरणा : 7.66 दलघमी (97.12) व उतावळी : 19.79 दलघमी (100).

                                                                प्रकल्पांमधून विसर्ग सुरू

जिल्ह्यात काल रात्री व सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रकल्पांमध्ये जलसाठा वाढला आहे. काही प्रकल्पांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मन प्रकल्पाची जलाशय पाणीपातळी 374.50 मीटर असून जीवंत पाणी साठा 98.77 टक्के आहे. प्रकल्पातून आज दुपारी 4.50 वाजता 5 दरवाजे 0.20 मीटरने उघडण्यात आले आहे. सद्यस्थितीत नदीपात्रात एकूण 120.00 क्युसेक  पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोराडी प्रकल्पाच्या सांडव्यावरून 25 से.मी ने 34.65 क्युसेक विसर्ग सुरू आहे. खडकपूर्णा प्रकल्पातून 19 दरवाजे 50 से.मी उघडल्यामुळे नदीपात्रात 37940.7 क्युसेक प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  ज्ञानगंगा प्रकल्पाच्या सांडव्यावरून 112.67 क्युसेक विसर्ग सुरू आहे. तसेच पलढग प्रकल्पाच्या सांडव्यावरून 20 से. मी उंचीवरून 47.29 क्युमेक विसर्ग सुरू आहे.  प्रशासनाने नदीकाठावरील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच पेनटाकळी प्रकल्पातून पुर नियंत्रणासाठी सायं 4.45 वा दोन वक्रद्वार 25 से.मी उघडून नदीपात्रात 181.167 क्युमेक विसर्ग  करण्यात येत आहे.

*************

                                प्रकल्पांमधून विसर्ग सुरू ; नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

बुलडाणा, (जिमाका) दि.28 : जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाटबंधारे प्रकल्प तुडूंब भरले आहे. त्यामधील काही मध्यम प्रकल्पांचा सांडवा प्रवाहीत झाला आहे, तर काही प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आले आहे. पुर नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या या कार्यवाहीमुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मोठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पात आज दुपारी 4 वा 96.55 टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या 19 दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आले आहे. नदीपात्रात 71 हजार 846 क्युसेक पाण्याचा विसर्ग प्रती सेकंद सुरू आहे.  

  तसेच पलढग प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्यामुळे सांडवा प्रवाहीत झाला आहे. त्यामुळे विश्वगंगा नदीकाठावरील तारापूर, कोथळी, सुलतानपूर, वरूड, शेंबा बु, डोलखेड ता. मोताळा,  निमखेड, लासूरा, पिंपळखुटा खु, पिंपळखुटा बु, वरखेड ता. मलकापूर, तांदुळवाडी, बुर्टी, वडनेर, सानपुडी, डिघी, चांदुर बिस्वा ता. नांदुरा गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नळगंगा धरण 80 टक्के भरले असल्यामुळे नळगंगा नदी काठावरील भोरटेक, पिंपळपाटी, शेलापूर, घुसर ता. मोताळा, दाताळा, निंबारी, वाकोडी, कुंड खु, कुंड बु, तांदुलवाडी, म्हैसवाडी, नरवेल, तालसवाडा ता. मलकापूर या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे.   

********************


अंगणवाडी ताई सुदृढ झाली तर संपूर्ण गाव सुदृढ होईल

- खासदार प्रतापराव जाधव

  • राष्ट्रीय पोषण अभियान -क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो, औरंगाबादचा उपक्रम

बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : शासनाच्या पोषण आहाराविषयी अधिकार व आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. पोषण आहार व्यवस्थित मिळाला तर बालके सुदृढ होण्यास मदत होईल. अंगणवाडी ताई सुदृढ झाली, तर संपूर्ण गाव सुदृढ होईल असे प्रतिपादन खासदार प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रमात केले. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणा-या क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो, औरंगाबाद जिल्हा प्रशासन, बुलडाणा आणि एकात्मिक बालविकास प्रकल्प, लोणार यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पोषण अभियान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन श्री मंगल कार्यालय, लोणार येथे आज 28 सप्टेंबर 2021  रोजी करण्यात आले.

  खासदार प्रतापराव जाधव यांनी मुख्य कार्यक्रमाचे उदघाटन दिपप्रज्वलन करून आणि रानभाजी व पोषण आहाराच्या प्रदर्शनाचे उदघाटन फित कापून केले. यावेळी महिला व बाल कल्याण सभापती ज्योतीताई पडघान, लोणारच्या माजी नगराध्यक्षा रंजनाताई मापारी, पंचायत समिती उपसभापती मदनराव सुटे, जिल्हा परिषद सदस्य गोदावरीताई कोकाटे, नंदुभाऊ मापारी, पांडुरंग सरकटे, क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो औरंगाबादचे प्रबंधक संतोष देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी  अरविंद रामरामे, तहसिलदार श्री. नदाफ, पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर, टिटवीचे सरपंच भगवान कोकाटे, तालुका आरोग्य अधिकारी डी. एस. बलशेटवार, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी अश्विनी ठाकरे, पत्रकार  शेख समद शेख अहमद,  नंदकुमार डव्हळे, उमेश कुटे, विट्ठल घायाळ,  संतोष पुंड आदी उपस्थित होते.

   यावेळी महिला व बाल विकास सभापती ज्योती पडघान, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अरविंद रामरामे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी अश्विनी ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरोचे प्रबंधक संतोष देशमुख यांनी तर संचालन व आभार प्रदर्शन नंदिनी चव्हाण यांनी केले. यावेळी आयोजित पोषण आहार, रानभाजी बनविणे, रांगोळी, सुदृढ़ बालक आदि विविध स्पर्धांच्या विजेत्यांना क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो तर्फे Poshan Abhiyaan-सही पोषण देश रोशन छापलेले पारितोषिक वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाहीर डी आर इंगळे आणि संच यांच्या शाहिरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शेवटी पोषण आहार शपथ घेण्यात आली. यावेळी सही पोषण-देश रोषण नारे देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्विततेकरिता क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो, औरंगाबाद चे सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी  प्रदीप पवार,  प्रिती पवार, राहुल मोहोड आणि प्रभात कुमार व संपूर्ण ICDS विभागाने प्रयत्न केले.

---------------


No comments:

Post a Comment