Monday 28 December 2020

DIO BULDANA NEWS 28.12.2020

 कोरोना अलर्ट : प्राप्त 397 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 54 पॉझिटिव्ह

•       77 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि.28 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 451 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 397 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 54 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 42 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 12 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 330 तर रॅपिड टेस्टमधील 67 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 397 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मोताळा तालुका : पिं. देवी 11, काबरखेड 1,  दे. राजा शहर : 9, चिखली शहर : 4, चिखली तालुका : वळती 1, मेरा खु 2, देऊळगांव घुबे 1, ढासाळा 1,  खामगांव तालुका: पिं. राजा 1, गारडगांव 1,  आवार 1, खामगांव शहर : 4, शेगांव शहर : 3, संग्रामपूर तालुका : खिरोडा 1,  शेगांव तालुका : भोनगांव 1, बुलडाणा शहर : 8, जळगांव जामोद शहर : 2, मूळ पत्ता पारध ता. भोकरदन जि. जालना 1   संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 54 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान चिखली रोड, बुलडाणा येथील 63 वर्षीय महिला रूग्णाचा  मृत्यू झाला आहे.  

      तसेच आज 77 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  खामगांव : 16,  दे. राजा : 14, सिं. राजा : 5, बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 3, अपंग विद्यालय 27, शेगांव : 6, मलकापूर : 1, चिखली : 3, मेहकर : 2.      

  तसेच आजपर्यंत 87525 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 12017 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 12017 आहे. 

  तसेच 1204 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 87525 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 12436 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 12017 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 269 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 150 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी दिली आहे.

                                                            ******

शासकीय खरेदीसाठी तूरीची नोंदणी सुरू

  • 6000 रूपये प्रति क्विंटल हमी भाव
  • जिल्ह्यात 9 खरेदी केंद्रांना मान्यता

  बुलडाणा,(जिमाका) दि.28 : हंगाम 2020-21 मध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत नाफेडच्या वतीने शासकीय तूर खरेदी करण्यात येणार आहे. तूरीला 6 हजार रूपये प्रति क्विंटल हमी भाव असून या भावाला तूरीची खरेदी होणार आहे. तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू झालेली आहे. तूर खरेदीसाठी जिल्ह्यात 9 खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे.

    त्यामध्ये बुलडाणा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्या, दे. राजा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्या, लोणार तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्या, मेहकर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्या, शेगांव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्या, संग्रामपूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्या, संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी, मोताळा, सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी सुलतानपूर केंद्र साखरखेर्डा ता. सिं. राजा आणि माँ जिजाऊ फार्मर प्रोड्युसर कंपनी दे. राजाचे केंद्र सिं. राजा यांचा समावेश आहे. या खरेदी केंद्रांवर तूरीची खरेदी होणार आहे. त्यासाठी शेतकरी नोंदणी सुरू झालेली आहे. तरी इच्छूक शेतकऱ्यांनी संबंधीत खरेदी केंद्रांवर जावून तूर खरेदीकरीता नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पी. एस शिंगणे यांनी केले आहे.

                                                                        ही कागदपत्रे आवश्यक

तूर नोंदणीकरीता शेतकऱ्यांना आधार कार्ड, सात बारा ऑनलाईन पिकपेरासह दाखला, बँक पासबुकची आधार लिंक केलेली छायांकित प्रत, मोबाईल क्रमांक आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे.

************

मलकापूर उपविभागात ग्रामपंचायत निवडणूकीची आदर्श आचारसंहीता लागू

  • उमेदवारांना प्रचारवेळी वाहन ताफ्यात एकाच वाहनाची परवानगी
  • मतदान केंद्रांपासून आत कोणताही मंडप, कार्यालय उभारण्यास बंदी
  • जागा मालकाच्या लेखी संमतीशिवाय पोस्टर्स, बॅनर लावू नये

  बुलडाणा,(जिमाका) दि.28 : मलकापूर उपविभागात मलकापूर, नांदुरा व मोताळा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने 18 जानेवारी 2021 पर्यंत आदर्श आचार संहीता लागू करण्यात आली आहे. आचार संहीतेचा भंग होवू नये या दृष्टीकोनातून फौजदारी प्रक्रिया संहीता 1973 चे कलम 144 उपविभागात लागू करण्यात आले आहे.  त्यानुसार मलकापूर उपविभागात निवडणूक असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीचे कालावधीत उमेदवारांना प्रचाराचेवेळी त्यांचे वाहन ताफ्यात एकापेक्षा जास्त वाहन वापरता येणार नाही. तसेच निवडणूकीचे प्रचारासाठी वापरायचे वाहनांची परवानगी संपूर्ण ग्राम पंचायत क्षेत्रासाठी संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून घेणे आवश्यक आहे.

    प्रचार कार्यासाठी संबंधीत निवडणूक अधिकारी यांच्याकडे नोंदणी न करण्यात आलेले कोणतेही वाहन प्रचार कार्यासाठी वापरता येणार नाही. तसेच उपविभागात ग्रामपंचायत मतदान केंद्र, धार्मिक स्थळे, दवाखाने आणि शैक्षणिक संस्था यापासून 200 मीटरच्या आत कोणताही मंडप तथा कार्यालय उभारण्यास बंदी असणार आहे. तसेच जेथे एकाच मतदान केंद्राच्या ठिकाणी किंवा त्याच्या जागेत एकापेक्षा जास्त मतदान केंद्र असतील तेथे अशा मतदान केंद्रांच्या गटासाठी त्या जागेच्या 100 मीटरचे अंतरापलीकडे उमेदवाराचा केवळ एकच मंडपाला परवानगी आहे.  उमेदवाराला ज्या ठिकाणी मंडप उभारावयाचा आहे त्या ठिकाणी 3 x 4.5 फुटाचा एक बॅनर वापरता येणार आहे. ज्या उमेदवाराला असे मंडप उभारावयाचे असतील अशा प्रत्येक उमेदवाराने ज्या मतदान केंद्रावर मंडप उभारावयाचे आहेत, त्या मतदान केंद्राचे नाव, अनुक्रमांक याबाबतची लेखी माहिती संबंधीत निवडणूक अधिकऱ्यांना आगाऊ कळवावी. असे मंडप उभारताना स्थानिक प्राधिकरणाकडून लेखी परवानगी घेतली पाहिजे. मतदारांना मतदान यादीतील अनुक्रमांक देण्याच्या एकमेव प्रयोजनाकरीताच केवळ या मंडपाचा वापर करण्यात आला पाहिजे. अशा मंडपामध्ये कोणत्याही परिस्थितीत गर्दी करण्यास मुभा असणार नाही. मतदान केंद्रातून मत देऊन बाहेर पडलेल्या व्यक्तीस मंडपात येण्याची मुभा असणार नाही. मंडप सांभाळणाऱ्या व्यक्तींनी मतदान केंद्राकडे जाणाऱ्या मतदारांच्या मार्गात कोणताही अडथळा निर्माण करण्यास किंवा त्यांना दुसऱ्या उमेदवारांच्या मंडपात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

    उपविभागात निवडणूकीत सर्व राजकीय पक्ष, संघ, संस्थाने उमेदवार, प्रतिनिधी यांनी सार्वजनिक जागा, शासकीय व निमशासकीय कार्यालयाचे इमारत व जागेवरील लावलेली  भिंतीपत्रके, फलक, पोस्टर्स, बॅनर्स कट आऊट त्वरित काढून टाकावीत. तसेच खाजगी जागा, इमारतीवरील संबंधीत जागा मालकाचे लेखी संमतीशिवाय लावलेली भिंतीपत्रके, फलक, पोस्टर्स, बॅनर्स, कट आऊट त्वरित काढून टाकावीत. उपविभागात मतदानाचे दिवशी मतदान केंद्र व परीसरात जमाव करण्यास, मतदारांना घाबरविण्यास, बळजबरीने मतदान करण्यास किंवा मतदान न करण्यास प्रवृत्त करणे, उमेदवाराच्या निवडणूक चिन्हाचे प्रदर्शन करणे, मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर करणे, वाहनांचा प्रवेश, मतदान केंद्रामध्ये अनधिकृत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

    उपविभागात ग्रामपंचायत निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी, तहसिल कार्यालय येथून होणार असल्याने व तहसिल कार्यालयात मतमोजणी केंद्र व सुरक्षा कक्ष प्रस्तावित असल्याने तहसिल कार्यालयाच्या आवारात केवळ 4 व्यक्तींना परवानगी असणार आहे. तसेच मिरवणूकीने येत असल्यास निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयापासून 100 मीटरचे आत मिरवणूक थांबविणे बंधनकारक असणार आहे.  तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कक्षात कोविड 19 च्या मार्गदर्शक सुचनेनुसार 4 पेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेशास बंदी असणार आहे. तथापी हा आदेश मतदानाशी संबंधीत अधिकारी, सर्व पोलीस अधिकारी, सुरक्षा पथकातील कर्मचारी, निवडणूक निरीक्षक यांना लागू असणार नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात येणार आहे, असे मलकापूरचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी मनोज देशमुख यांनी कळविले आहे.    

******

घिर्णी येथील बालविवाह रोखण्यात जिल्हा बाल संरक्षण कक्षाला यश

  बुलडाणा,(जिमाका) दि.28 :मलकापूर तालुक्यातील घिर्णी येथील 16 वर्षाच्या बालिकेचा बालविवाह 7 जानेवारी 2020 रोजी होत आहे. अशी माहिती 17 डिसेंबर 2020 रोजी चाईल्ड लाईन यांच्यामार्फत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्षास प्राप्त झाली. त्यानंतर लगेच जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी व कर्मचारी, चाईल्ड लाईनचे समन्वयक, समुपदेशक यांनी मुलीच्या वयाचे पुरावे मिळवून मुलीचा होणारा विवाह हा बालविवाह आहे की नाही याची शहानिशा केली. खात्री पटल्यानंतर संबंधीत यंत्रणेशी  संपर्क केला आणि मुलीला तिच्या आई वडिलासह बाल कल्याण समिती, बुलडाणा यांच्यासमोर हजर करण्यात आले.

    मुलीसह कुटूंबाला माहिती देऊन हा बालविवाह रद्द केल्याबाबतचा जबाब लिहून घेण्यात आला. तसेच असा विवाह पार पाडल्यास काय कार्यवही होऊ शकते याची माहिती मुलीच्या कुटूंबाला देण्यात आली. अशाप्रकारे बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या समक्ष बाल विवाह रद्द करण्यात आला.  ही कारवाई जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.  जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय तथा जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्यावतीने जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी बालविवाह प्रतिबंधक मोहिम राबवित आहे. जिल्ह्यात कुठेही, शहरात, गावात जर बालविवाह होत असेल, तर तात्काळ चाईल्ड लाईन यांना किंवा टोल फ्री क्रमांक 1098 वर संपर्क करावा. तसेच संबंधीत यंत्रणेस व कार्यालस संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे यांनी केले आहे.

                                                                                                **********

 

No comments:

Post a Comment