Wednesday 2 December 2020

DIO BULDANA NEWS 2.12.2020

 रक्तदान करण्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 2 : रक्तदान शिबिरे प्रामुख्याने कॉलेजेस, आयटी व अन्य उद्योग क्षेत्रामध्ये घेऊन रक्त जमा केले जात असते. परंतु आता कॉलेजेस बंद असल्याने व बऱ्याचशा सेवा क्षेत्राचे वर्क फ्रॉम होम पद्धतीनुसार काम सुरू असल्याने  मोठी रक्तदान शिबिरे घेता येत नाहीत. तसेच कोविडमुळे  जास्त रक्तदाते रक्तदानास इच्छुक नसतात, तथापि छोटे छोटे कॅम्प घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या माध्यमातून रक्ताची गरज भागवली जात आहे. तरी जनतेने रक्तदानासाठी पुढे यावे व रक्तदान करावे, असे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.

    लोकांनी सरकारच्या आवाहनाला नेहमी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे निश्चितच जनता रक्तदानासाठी पुढे येवून रक्तदान करणार आहे. जनतेच्या प्रतिसादामुळे रक्ताची कमतरता भासणार नाही. तरी नागरिकांनी रक्तदान करावे व इतरांचे जीवन सुंदर बनवावे, असे आवाहनही पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.

                                                                        ************

कोरोना अलर्ट : प्राप्त 596 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 28 पॉझिटिव्ह

•       32 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि.2 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 624 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 596 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 28 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 22 व रॅपीड टेस्टमधील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 485 तर रॅपिड टेस्टमधील 111 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 596 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : चिखली शहर : 1, खामगांव शहर : 3, खामगांव तालुका : टेंभुर्णा 1, बुलडाणा शहर : 6, बुलडाणा तालुका : भादोला 1, मेहकर शहर : 1, मेहकर तालुका : इसोली 1,  दे. राजा तालुका : दे. मही 1, सिं. राजा शहर : 5, सि. राजा तालुका : जळ पिंपळगांव 1, भारखेड बारा 1, शेंदुर्जन 1, सावखेड तेजन 1, नांदुरा शहर : 4 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 28 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान स्त्री रूग्णालय, बुलडाणा येथे बेलाड ता. मलकापूर येथील 78 वर्षीय पुरूष व मलकापूर येथील 52 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 32 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : अपंग विद्यालय 14, आयुर्वेद महाविद्यालय 5, जळगांव जामोद : 1, नांदुरा : 1,  दे. राजा : 1, सिं. राजा : 4, खामगांव : 6.

 तसेच आजपर्यंत 76597 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 10834 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 10834 आहे. 

  तसेच 1053 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 76597 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 11389 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 10834 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 419 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 136  कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी दिली आहे.

******

तूर पिकावरील किडींचे व्यवस्थापन करावे

कृषि विभागाचे आवाहन

शेंगा पोखरणारी हिरवी अळी, पिसारी पतंग, शेंगमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता

बुलडाणा, (जिमाका) दि. 2 : विदर्भातील किटकशास्त्रज्ञांनी व कृषि विभागातील अधिकाऱ्यांनी तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावरील व निरीक्षणाच्या अनुषंगाने सध्या तूर पिक फुलोरा अवस्थेत आहे. त्यावर  शेंगा पोखरणाऱ्या  अळ्यांची अंडी व पहिली अळी व्यवस्था दिसून येत आहे. हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार रात्रीच्या वेळी तापमान 2-3 अंश सेल्सीअसने घटण्याची शक्यता आहे. हे हवामान तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक आहे. त्यामुळे तूर पिकाला शेंगा पोखरणाऱ्या अळीपासून नुकसान होण्याची शक्यता आहे.

   शेंगा पोखरणाऱ्या किडीची मादी पतंग सरासरी 600 ते 800 अंडी तूरीची कोवळी पाने, देठ अथवा कळ्या, फुले तसेच शेंगांवर वेगवेगळी घालत असते. अंड्यातून निघालेल्या अळ्या तुरीच्या कळ्या आणि फुले खाऊन नुकसान करतात.  पुर्ण वाढ झालेली अळी 30 ते 40 मि.मी लांब असते.  अळी पोपटी रंगाची असून पाठीवर तुटक करड्या रेषा असतात. मोठ्या अळ्या शेंगांना छिद्र करून आतील दाणे पोखरून खतात.

      तूर पिकावर येणारी दुसरी महत्वाची किड पिसारी पतंग आहे. या पतंगाची अळी  12.5 मि.मी लांब हिरवट तपकीरी रंगाची असतो. तिच्या अंगावर केसांची दाट लव असते. पुर्ण वाढ झालेली अळी प्रथम शेंगेचा पृष्ठभाग खरडून खाते व नंतर शेंगेला शेंगेच्या बाहेर राहून खाते. शेंगमाशी ही आकाराने फारच लहान 1.5 मि.मी लांब असते. माशीचा रंग हिरवट असतो. अळी बारीक, गुळगुळीत व पांढऱ्या रंगाची असून तिला पाय नसतात. तिचा तोंडाकडील भाग निमुळता असतो. ह्या किडीचे मादी माशी शेंगेच्या आत आपली अंडी टाकते. अंड्यातून निघालेली अळी शेंगाच्या आत राहून शेंगातील दाणे अर्धवट कुरतडून खाते व त्यामुळे दाण्याची मुकणी होते.  शेंगा पोखरणारी अळी 3 प्रति झाड किंवा पिसारी पतंगाची अळी 1 ते 3 प्रति झाड किंवा 5 ते 10 टक्के शेंगांचे नुकसान आढळल्यास व्यवस्थापनाचे उपाय शेतकरी बंधूनी करावे.

 प्रति हेक्टरी 20 पक्षीथांबे पिकात उभारावीत. त्यामुळे पक्षी किडींच्या अळ्या खावून फसत्‍ करतात.  पहिली फवारणीमध्ये निंबोळी अर्क 5 टक्के किंवा अझाडिरेक्टीन  300 पीपीएम 50 मि.ली किंवा अझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 25 मि.ली किंवा एचएनपीव्हीएच (1410 पीओबी / मिली) 500 एल ई / हेक्टर किंवा बॅसिलस थुरीजीएंसिस 15 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा थायोडीकार्ब 75 टक्के डब्ल्युपी 20 ओम प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी. दुसऱ्या फवारणीत क्लोरेनट्रॅनीलिप्रोल 18.5 टक्के एस.सी प्रवाही 3 मिली किंवा इंडॉक्झीकार्ब 15.8 टक्के ईसी 6.6 मिली किंवा लॅमडा सायहेलेथ्रीन 5 टक्के प्रवाही 10 मिली किंवा फ्ल्युडामाईड 20 टक्के डब्ल्युजी 5 ग्रॅम किंवा इमामेक्टीन बॅन्झोएट 5 टक्के एसजी 4.4 ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रॅनीलीप्रोल 9.30 अधिक लॅमडा सायहेलेथ्रीन 4.60 झेडसी 4 मिली प्रति  प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 किटकनाशकांची फवारणी करताना शिफारशी मात्रेतच फवारणी करावी. अन्यथा फुलगळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकाच किटकनाशकांचा वापर सतत करू नये. किटकनाशकांची आलटून पालटून फवाणी करावी. फवारणी करताना सुरक्षा किटचा वापर करूनच फवारणी करावी. अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्यास तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलवावे. त्यामुळे झाडावरील अळ्या पोत्यावर पडतील त्या गोळा करून नष्ट कराव्यात, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.

 

No comments:

Post a Comment