Friday 11 December 2020

DIO BULDANA NEWS 11.12.2020

 


कोविडच्या आगामी लसीकरणासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी

- पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

* कोविड संसर्ग नियंत्रण बैठक

* लसीकरणासाठी पायाभूत सुविधा अद्ययावत कराव्या.

  बुलडाणा,(जिमाका) दि.11 : पुढील काळात कोविड 19 या साथरोगावर लस येण्याची शक्यता आहे. कोविडचे लसीकरण मोहिम ही आतापर्यंतच्या लसीकरण मोहिमांमधील सर्वात मोठी मोहीम असणार आहे. या मोहिमेसाठी आरोग्य यंत्रणेसह अन्य संबधीत यंत्रणांनी आपली सज्जता ठेवावी, अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.  

   जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री यांच्या दालनात कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठक आयोजित करण्यात आली.  त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते.  

    या मोहिमेसाठी पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण करण्याचे सूचीत करीत पालकमंत्री म्हणाले, लसीकरण हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. लसीकरण मोहिमेत निवडणूकीच्या धर्तीवर काम करावे लागणार आहे. त्यासाठी मनुष्यबळही लागणार आहे. तरी मनुष्यबळाची उपलब्धता असावी. आतापासून त्याची तयारी करावी. तसेच लस साठवणूकीसाठी शित साखळी प्रभावी असावी. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय किंवा जिथे लसीकरण करण्यात येणार आहे, अशा ठिकाणी शित करणाची व्यवस्था असावी. त्यासाठी आवश्यक असलेली खरेदीची प्रक्रिया राबविण्यात यावी.  या कामात दिरंगाई होणार नाही, याची काळजी घ्यावी. लसीकरण करतेवेळी नियमानुसार तीन बुथची व्यवस्था असावी. तसेच लसीकरण झाल्यानंतर काही ॲलर्जी, आरोग्याचे प्रश्न निर्माण झाल्यास निरीक्षण कक्ष असावे.

  ते पुढे म्हणाले, लसीकरण मोहिमेत नियमानुसार प्राधान्यक्रम ठरवावेत. प्रधान्यक्रमानुसार कुणीही लसीपासून वंचित राहता कामा नये.  लसीकरणासाठी यंत्रणा सज्ज असल्याची खात्री करून प्रशिक्षीत मनुष्यबळ असावे. लसीकरण मोहिमेत काही साईड इफेक्ट झाल्यास त्यासाठी किट असते. या किटमध्ये औषधे असल्याची खात्री करून घ्यावी. लसीच्या सर्व बाबींचा अभ्यास करून आरोग्य यंत्रणेने तयार रहावे.

  मोहिमेदरम्यान एका दिवसाला 8000 नागरिकांना लस देण्याची व्यवस्था आहे. लसीकरणाकरीता यंत्रणा पुर्णपणे सज्ज असून पायाभूत सुविधा अद्ययावत ठेवण्यात करण्यात येत आहे. तसेच लस आल्यानंतर प्रशिक्षण पुर्ण करून आठ दिवसात लसीकरण सुरू करण्यात येईल, अशी माहिती यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. याप्रसंगी पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी प्रयोगशाळा चाचणी अहवाल, माझे कुटूंब माझी जबाबदारी अभियान आदींचाही आढावा घेतला. बैठकीला संबंधीत यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

                                                                                    **************

नोंदणी केलेल्या संपूर्ण शेतकऱ्यांचे भरड धान्य खरेदी करावे

-          पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

  • भरड धान्य खरेदी बैठक
  • मलकापूर येथील कापूस खरेदी सुरू करावी

  बुलडाणा,(जिमाका) दि.11 :  शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत जिल्ह्यात भरडधान्य खरेदी करण्यात येत आहे. यामध्ये मका, ज्वारी आदींच समावेश आहे. मक्‌याचे उत्पादन घाटाखालील तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर झाले आहे. नोंदणी केलेल्या पुर्ण शेतकऱ्यांचा ज्या धान्यासाठी नोंदणी केलेली आहे, ते धान्य खरेदी करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.

   जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री यांच्या दालनात भरड धान्य खरेदीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली .  त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. बैठकीला आमदार संजय गायकवाड, आमदार राजेश एकडे, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा मार्केंटींग अधिकारी श्री. शिंगणे, जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. बनसोडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश बेल्लाळे,  निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते.   

   उद्दिष्टानुसार मका खरेदी करताना मुदत संपल्यास  मुदतवाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, मका उत्पादक शेतकऱ्यांना मुदत संपल्यास त्यानुसार आधी माहिती द्यावी. कुणीही नोंदणीकृत शेतकरी खरेदीपासून वंचित राहू नये. या खरेदीमध्ये शेतकऱ्यांचाच माल खरेदी करावा. त्यासाठी शेतकरी असल्याची खात्री करून घ्यावी. खाजगी व्यापाऱ्यांचा माल खरेदी करू नये. मक्यासाठी गोदामे कमी पडत असल्यास खाजगी गोदामे घ्यावीत. तसेच नियमानुसार खाजगी गोदामे आवश्यकता वाटल्यास अधिग्रहीत करावी. शेतकऱ्यांचा संपूर्ण माल खरेदी करावा.  खरेदी केलेल्या मालाचे चुकारे लवकरात लवकर देण्यासाठी प्रयत्न करावे. त्यासाठी शेतकऱ्यांची बँक खाते क्रमांक योग्य असल्याची खात्री करावी.  तसेच नवीन खरेदी केंद्रासाठी प्रस्ताव आले असल्यास त्या प्रस्तावांची छाननी करून नियमानुसार असलेल्या प्रस्तावांना मान्यता द्यावी.

     ते पुढे म्हणाले, मलकापूर येथील सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र बंद आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी मलकापूर येथील कापूस खरेदी सोमवारपासून कुठल्याही परिस्थितीत सुरू करावी. कापूस खरेदी करताना सर्व ठिकाणी सारखी नियमावली असावी. कापसाचे ग्रेडींग जिनींगमध्येच करावे. कापसाचे मॉईश्चर बघताना संवेदनशीलता ठेवावी. जिनींग व्यवस्थापकांनी कापूस खरेदीसाठी पूर्वतयारी करावी. कापूस खरेदीसाठी गोदाम किंवा साठवणूक जागेची व्यवस्था करावी.  बैठकीला सीसीआयचे अधिकारी, ग्रेडर, संबंधित यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

                                                            ************

नळ योजना नसलेल्या गावांसाठी मिशनमध्ये योजना प्रस्तावित करावी

- पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

* जल जिवन मिशनची आढावा बैठक

बुलडाणा, (जिमाका) दि. 11 : शासनाने प्रत्येक गाव, वाडी व वस्त्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविण्यासाठी जल जिवन मिशनची अंमलबजावणी सुरू केली आहे. प्रत्येक घराला दरडोई दररोज 55 लीटर पाणी प्रत्येक कुटूंबाला पुरविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार या मिशनमध्ये नवीन नळयोजना प्रस्तावीत कराव्यात. मिशनमधील आराखड्यात समाविष्ट करण्यात आलेल्या योजनांची कामे दर्जेदारपणे पूर्ण करावीत. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत ज्या गावांसाठी नळयोजनाच नाही, अशा गावांना जल जीवन मिशनमध्ये नळयोजना प्रस्तावित करावी, अशा सूचना पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.

   स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात जलजीवन मिशन आढावा बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेताना पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पंचायत राज समितीचे अध्यक्ष तथा आमदार डॉ. संजय रायमूलकर, आमदार राजेश एकडे, आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते. तसेच सभागृहात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश इंगळे, महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.

       या आराखड्यातंर्गत समाविष्ट गावांमध्ये आवश्यकतेनुसार पाणी पुरवठ्याची कामे करण्याच्या सूचना करीत पालकमंत्री महणाले, गावांमधील योजनांची पुनरावृत्ती टाळावीत. योजनेसाठी पाण्याचा कायमस्वरूपी स्त्रोत बघावा. पाण्याअभावी काही दिवसानंतर योजना बंद पडतात. परिणामी शासनाचा खर्च वाया जातो. त्यामुळे अंतर जास्त असले, तरी पाण्याचा कायमस्वरूपी स्त्रोत घ्यावा. प्रादेशिक ऐवजी स्वतंत्र पाणी पुरवठा योजनांवर भर द्यावा. जल जीवन मिशनच्या सुधारीत आराखड्याला मान्यता मिळण्यासाठी पाठपुरावा करावा.

  पालकमंत्री पुढे म्हणाले, नळ योजनांसाठी वीजपुरवठा महत्वाचा असतो. अनेक योजना पुर्ण होतात. मात्र वीज पुरवठ्या अभावी त्या सुरू होऊ शकत नाही. त्यामुळे नवीन योजनांसाठी वीजेचे रोहीत्र आराखड्यात समाविष्ट करावे. तसेच एक्सप्रेस फिडर आवश्यक असल्यास ते घ्यावे. जेणेकरून भविष्यात रोहीत्रावरील अति दाबमुळे नळ येाजना बंद पडणार नाही. तसेच अनेक योजनांचे वीज मीटर बंद आहे, मात्र देयक सुरूच आहे. अशा योजनांवरील बंद मीटरचा वीज पुरवठा कायमस्वरूपी बंद करावा. जेणेकरून त्या योजनेवरील देयकाची थकीत रक्कम वाढणार नाही. यासाठी महावितरणने ड्राईव्ह राबवावा. आतापर्यंत नळ जोडणी नसलेल्या अंगणवाडी व शाळांना या मिशनमधून नळ जोडणी उपलब्ध करून द्यावी.

  यावेळी डॉ. संजय रायमूलकर म्हणाले, सौर उर्जा कृषी पंपासाठी मोठी पेंडन्सी आहे.  तरी पात्र अर्जदारांनी सौर कृषी पंप उपलब्ध करून द्यावे. सौर उर्जेवर आधारीत पंपाबाबत तक्रारी असल्यास त्यांचे तातडीने निरसन करावे.  बैठकीला संबंधीत विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.   

                                                         *********

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 442 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 17 पॉझिटिव्ह

•       33 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि.11 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 459 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 442 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 17 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 17  अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 371 तर रॅपिड टेस्टमधील 71 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 442 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 7, बुलडाणा तालुका : जांब 1, नांदुरा शहर 3,  चिखली तालुका : भोकरवडी 1, पाटोदा 1, मलगी 1, नांदुरा तालुका : तांदूळवाडी 2, लोणार शहर: 1   संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 20 रूग्ण आढळले आहे.  त्याचप्रमाणे तानाजी नगर, बुलडाणा येथील 72 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 33 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :   चिखली : 3, जळगांव जामोद : 8, सिं. राजा : 3, दे. राजा : 14, बुलडाणा : आयुर्वेद  महाविद्यालय 13, खामगांव : 3.

तसेच आजपर्यंत 80739 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 11305 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 11305 आहे. 

  तसेच 1457 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 80739 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 11735 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 11305 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 288 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 142 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी दिली आहे.

***

 

No comments:

Post a Comment