Tuesday 1 December 2020

DIO BULDANA NEWS 1.12.2020,1

 मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी विशेष मोहिम

  • 5 व 6, 12 व 13 डिसेंबर रोजी आयोजन

 बुलडाणा, (जिमाका) दि. 1 : भारत निवडणूक आयोगाने दि. 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुर्ननिरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या अंतर्गत मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही,  अशा मतदारांसाठी शनिवार 5 व रविवार 6, शनिवार 12 व रविवार 13 डिसेंबर 2020 रोजी विशेष मोहिमांचे आयोजन करण्यात आले आहे. नाव नसलेल्या मतदारांनी किंवा नवमतदारांनी या दिवशी आपल्या मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे आपले विहीत नमुन्यातील अर्ज सादर करून मतदार यादीत नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी केले आहे.   

********

उपविभागनिहाय सरपंच पदांचे महिला आरक्षण काढण्यात येणार

  • कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन होण्यासाठी निर्णय

  बुलडाणा,(जिमाका) दि.1 : ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील 870 ग्राम पंचायतींच्या सरपंच पदांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.  महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम चे कलम 30 अन्वये तसेच मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील तरतुदीनुसार सन 2020 ते 2025 दरम्यान जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूकीद्वारे गठीत होणाऱ्या सरपंच पदांचे आरक्षण 7 डिसेंबर 2020 रोजी तहसिल स्तरावर निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार हे निश्चित करणार आहे.  

  तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग अंतर्गत स्त्रीयांकरीता व खुल्या प्रवर्गाअंतर्गत स्त्रीयांकरीता आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली 10 डिसेंबर रोजी स. 11 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे आयोजित करण्यात आली आहे. मात्र कोरोना संसर्ग सुरक्षा नियम, सुचना व आदर्श कार्य प्रणालीचे पालन होण्यासाठी उपविभाग निहाय सरपंच पदांचे महिला अरक्षण काढण्यात येणार आहे.

    बुलडाणा उपविभाग बुलडाणा व चिखली तालुक्यांसाठी सकाळी 11 वाजता, सिं. राजा उपविभागातील सिं.राजा व दे. राजा तालुक्यांसाठी दु. 12 वाजता, मेहकर उपविभाग मेहकर व लोणार तालुक्यांसाठी दु. 12.30 वा, खामगांव उपविभागातील खामगांव व शेगांव तालुक्यांकरीता दु 1 वाजता, जळगांव जामोद उपविभागातील जळगांव जामोद व संग्रामपूर तालुक्यांसाठी दु 1.30 वाजता आणि मलकापूर उपविभागातील मलकापूर, मोताळा व नांदुरा तालुक्यांकरीता दु 2 वाजता वेळ नियोजित केलेली आहे.   तरी याबाबतची नोंद सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच नागरीकांनी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी कळविले आहे. 

*****




अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुक

शिक्षक मतदारसंघासाठी अंदाजे 82.91 टक्के मतदान

बुलडाणा, (जिमाका) दि. 1 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी आज दि. 1 डिसेंबर मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत अंदाजे 82.91 टक्के मतदान झाले. एकूण 35 हजार 622 मतदारांपैकी अंदाजे 29 हजार 534 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात 14 मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दिसून आला. कोरोना संसर्ग सुरक्षेचे सर्व नियम पाळून मतदारांनी मतदान केले. मतदान केंद्रावर आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. थर्मल गनने तापमान मोजणी, सॅनीटायझर आदींची व्यवस्था करण्यात आली होती.

अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात 77 मतदान केंद्रावर हे मतदान घेण्यात आले. सकाळी दहा वाजेपर्यंत 10.11 टक्के, दुपारी 12 वाजेपर्यंत 25.11 टक्के, दोन वाजेपर्यंत 46.71 टक्के, तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत अंदाजे 82.91 टक्के मतदान झाले. अमरावती विभागात एकूण 35 हजार 622 मतदार आहेत. यात 26 हजार 60 पुरूष तर 9 हजार 562 स्त्री उमेदवार आहेत. यातील अंदाजे 21 हजार 865  पुरूष, तर 7 हजार 669 स्त्री अशा एकूण 29 हजार 534 मतदारांनी मतदान केले.

अमरावती जिल्ह्यातील 10 हजार 386 मतदारापैकी 5 हजार 813 पुरूष आणि 2 हजार 601 स्त्री अशा 8 हजार 414 मतदारांनी मतदान केले. अकोला जिल्ह्यातील 6 हजार 480 मतदारापैकी 3 हजार 625 पुरूष आणि 1 हजार 751 स्त्री अशा 5 हजार 346 मतदारांनी मतदान केले. वाशिम जिल्ह्यातील 3 हजार 813 मतदारापैकी 2 हजार 755 पुरूष आणि 560 स्त्री अशा 3 हजार 315 मतदारांनी मतदान केले. बुलडाणा जिल्ह्यातील 7 हजार 484 मतदारापैकी 4 हजार 801 पुरूष आणि 1 हजार 286 स्त्री अशा 6 हजार 87 मतदारांनी मतदान केले. यवतमाळ जिल्ह्यातील 7 हजार 459 मतदारापैकी 4 हजार 871 पुरूष आणि 1 हजार 501 स्त्री अशा 6 हजार 372 मतदारांनी मतदान केले.

सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्हानिहाय अंदाजे झालेल्या मतदानाची टक्केवारी  पुढीलप्रमाणे आहे.    अमरावती – 81.01 टक्के, अकोला – 82.50 टक्के, वाशिम – 86.94 टक्के, बुलडाणा – 81.33 टक्के, यवतमाळ – 85.43 टक्के. एकूण 82.91 टक्के अंदाजे मतदान झाले आहे.

                                                                                                *********

No comments:

Post a Comment