Wednesday 30 December 2020

DIO BULDANA NEWS 30.12.2020

 कोरोना अलर्ट : प्राप्त 728 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 45 पॉझिटिव्ह

•       40 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि.30 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 773 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 728 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 45 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 32 रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 13 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 556 तर रॅपिड टेस्टमधील 172 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 728 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  मोताळा तालुका : पिं. देवी 10, बुलडाणा शहर : 3, बुलडाणा तालुका : मासरूळ 1,  दे. राजा शहर : 5, दे. राजा तालुका : दे. मही 1, सरंबा 1,  चिखली तालुका : मेरा 1, उंद्री 1, सातगांव भुसारी 1, मेहकर तालुका : हिवरा आश्रम 1, बाभुळखेड 1, मेहकर शहर : 1, मलकापूर शहर : 2,  खामगांव शहर : 8, खामगांव तालुका : आंबेटाकळी 1, गारडगांव 1,  शेगांव शहर : 4, शेगांव तालुका : पहुरजिरा 1, गव्हाण 1,  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 45 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान रामनगर, बुलडाणा येथील 82 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 40  रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  दे. राजा : 1, खामगांव : 3, नांदुरा : 5, जळगांव जामोद : 3, बुलडाणा : 1, अपंग विद्यालय 2, आयुर्वेद महाविद्यालय 1, सिद्धीविनायक कोविड हॉस्पीटल 8,  मलकापूर : 9, चिखली : चुनावाला हॉस्पीटल 7,  

  तसेच आजपर्यंत 88746 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 12109 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 12109 आहे. 

  तसेच 1686 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 88746 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 12486 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 12109  कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 226 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 151 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी दिली आहे.

                                                            ******


जिल्हा सामान्य रूग्णालयात पीसीपीएनडीटी कार्यशाळा उत्साहात

  बुलडाणा,(जिमाका) दि.30 : पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी  व मुलींचा जन्मदर वाढविण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या नर्सिंग स्कूल हॉलमध्ये पीसीपीएनडीटी कार्यशाळा आज 30 डिसेंबर 2020 रोजी उत्साहात पार पडली. दिप प्रज्वलनाने कार्यशाळेला सुरूवात करण्यात आली. कार्यशाळेमध्ये मुलींच्या जन्मदर वाढविणे, सोनोग्राफी सेंटरची तपासणी करताना काय काय करावे, मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्ता यांची भूमिका याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेला प्र. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ घोलप, मुख्य प्रशासकीय अधिकारी अनिल बागर, जिल्हा सल्लागार समितीच्या  डॉ वैशाली पडघान,  विधी समुपदेशक ॲड वंदना काकडे, शासकीय अभियोक्ता ॲड संतोष खत्री, शाहीना पठाण, अधिसेविका श्रीमती राठोड आदी उपस्थित होते.

    कार्यशाळेला मार्गदर्शन करताना डॉ. घोलप म्हणाले, पीसीपीएनडीटी कायदा हा लिंग चाचणी करणाऱ्यांसाठी  कर्दनकाळ आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. स्त्री जन्मासाठी समाजमन बदलले पाहिजे. मुलापेक्षा मुलगी बरी हा संस्कार झाला पाहिजे.  ॲड वंदना काकडे यांनी यावेळी समुचित प्राधिकारी यांचे कर्तव्य सांगितली. तसेच सोनोग्राफी सेंटरची तपासणी करताना कुठ कुठल्या गोष्टींची तपासणी करावी,  तपासणीमध्ये काय काय बघावे याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच डॉ वैशाली पडघान म्हणाल्या,  जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढविणे गरजेचे आहे.  मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी गावागावातील अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ता, मदतनीस यांनी मोलाची भूमिका अदा केली पाहिजे. ह्या तीनही घटक समाजात मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी समाजमन बदलवू शकतात.

  शाहीना पठाण यांनी मुलीचे समाजातील, वैयक्तिक आयुष्यातील, देशासाठी असलेले महत्व पटवून दिले. त्यांनी समाजाने मुलींच्या जन्माचे स्वागत करण्याचे आवाहनही केले. तसेच याप्रसंगी ॲड संतोष खत्री यांनी पीसीपीएनडीटी कायद्यातील बारकावे कथन केले. त्यांनी कायद्याविषयी सखोल मार्गदर्शन केले.   संचलन सचिन सोळंकी यांनी तर आभार प्रदर्शन के. पी भोंडे यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी  आहारतज्ज्ञ सचिन सोळंकी, के. पी भोंडे, विवेक जोशी आदींनी प्रयत्न केले. कार्यशाळेला वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

                                                            *****

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा तालुका शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर

  • जानेवारी ते जुन 2020 दरम्यानचा कार्यक्रम
  • नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन

     बुलडाणा,(जिमाका) दि.30 :  - माहे जानेवारी ते जुन 2021 दरम्यान राबविण्यात येणारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तालुका शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. शिबिराच्या ठिकाणी मोटार वाहन निरीक्षक व सहायक रोखपाल हजर राहणार आहेत. तसेच ज्या दिवशी शासकीय सुट्टी असेल त्याच्या दुसऱ्या दिवशी सदर शिबीर कार्यालय घेण्यात येणार आहे.

    शिबिर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे  जानेवारी 2021 मध्ये : जळगाव जामोद 4 जानेवारी, शेगाव 6 व 25, मेहकर 8 व 27, लोणार 18, खामगांव 11 व 29,  चिखली 13 , दे.राजा 15, नांदुरा 20, मलकापूर 12 व 21, सिंदखेड राजा 22 जानेवारी 2020 रोजी होणार आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये : जळगाव जामोद 3 फेब्रुवारी, शेगाव 4 व 22, मेहकर 5 व 24,  लोणार 12, खामगांव 8 व 26,  चिखली 9 , दे.राजा 11, नांदुरा 19, मलकापूर 10 व 17, सिंदखेड राजा 18 फेब्रुवारी 2020 रोजी होणार आहे. मार्च 2021 मध्ये :  जळगाव जामोद 3 मार्च, शेगाव 5 व 25, मेहकर 8 व 26,  लोणार 17, खामगांव 10 व 30,  चिखली 12 , दे.राजा 15, नांदुरा 19, मलकापूर 9 व 22, सिंदखेड राजा 23 मार्च 2020 रोजी होणार आहे. एप्रिल 2021 : जळगाव जामोद 5 एप्रिल, शेगाव 6 व 26, मेहकर 8 व 28,  लोणार  16, खामगांव 9 व 30,  चिखली 12 , दे.राजा 15, नांदुरा 19, मलकापूर 7 व 20, सिंदखेड राजा 22 एप्रिल रोजी होणार आहे. मे 2021 : जळगाव जामोद 3 मे, शेगाव 5 व 25, मेहकर 7 व 27,  लोणार 17, खामगांव 10 व 28,  चिखली 11 , दे.राजा 12, नांदुरा 19, मलकापूर 6 व 21, सिंदखेड राजा 24 मे रोजी होणार आहे. जुन 2021 : जळगाव जामोद 4 जुन, शेगाव 7 व 25,  मेहकर 8 व 28, लोणार 16, खामगांव 10 व 30,  चिखली 11 , दे.राजा 14, नांदुरा 18, मलकापूर 9 व 21  सिंदखेड राजा 23 जुन रोजी होणार आहे. याबाबत नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच या शिबिरांचा इच्छूकांचा लाभ घ्यावा असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

                                                            *****

बुलडाणा उपविभागात ग्रामपंचायत निवडणूकीची आदर्श आचारसंहीता लागू

  • उमेदवारांना प्रचारवेळी वाहन ताफ्यात एकाच वाहनाची परवानगी
  • मतदान केंद्रांपासून आत कोणताही मंडप, कार्यालय उभारण्यास बंदी
  • जागा मालकाच्या लेखी संमतीशिवाय पोस्टर्स, बॅनर लावू नये

  बुलडाणा,(जिमाका) दि.30 : बुलडाणा उपविभागात बुलडाणा व चिखली तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने 18 जानेवारी 2021 पर्यंत आदर्श आचार संहीता लागू करण्यात आली आहे. आचार संहीतेचा भंग होवू नये या दृष्टीकोनातून फौजदारी प्रक्रिया संहीता 1973 चे कलम 144 उपविभागात लागू करण्यात आले आहे.  त्यानुसार बुलडाणा उपविभागात निवडणूक असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीचे कालावधीत उमेदवारांना प्रचाराचेवेळी त्यांचे वाहन ताफ्यात एकापेक्षा जास्त वाहन वापरता येणार नाही. तसेच निवडणूकीचे प्रचारासाठी वापरायचे वाहनांची परवानगी संपूर्ण ग्राम पंचायत क्षेत्रासाठी संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून घेणे आवश्यक आहे.

    प्रचार कार्यासाठी संबंधीत निवडणूक अधिकारी यांच्याकडे नोंदणी न करण्यात आलेले कोणतेही वाहन प्रचार कार्यासाठी वापरता येणार नाही. तसेच उपविभागात ग्रामपंचायत मतदान केंद्र, धार्मिक स्थळे, दवाखाने आणि शैक्षणिक संस्था यापासून 200 मीटरच्या आत कोणताही मंडप तथा कार्यालय उभारण्यास बंदी असणार आहे. तसेच जेथे एकाच मतदान केंद्राच्या ठिकाणी किंवा त्याच्या जागेत एकापेक्षा जास्त मतदान केंद्र असतील तेथे अशा मतदान केंद्रांच्या गटासाठी त्या जागेच्या 100 मीटरचे अंतरापलीकडे उमेदवाराचा केवळ एकच मंडपाला परवानगी आहे.  उमेदवाराला ज्या ठिकाणी मंडप उभारावयाचा आहे त्या ठिकाणी 3 x 4.5 फुटाचा एक बॅनर वापरता येणार आहे. ज्या उमेदवाराला असे मंडप उभारावयाचे असतील अशा प्रत्येक उमेदवाराने ज्या मतदान केंद्रावर मंडप उभारावयाचे आहेत, त्या मतदान केंद्राचे नाव, अनुक्रमांक याबाबतची लेखी माहिती संबंधीत निवडणूक अधिकऱ्यांना आगाऊ कळवावी. असे मंडप उभारताना स्थानिक प्राधिकरणाकडून लेखी परवानगी घेतली पाहिजे. मतदारांना मतदान यादीतील अनुक्रमांक देण्याच्या एकमेव प्रयोजनाकरीताच केवळ या मंडपाचा वापर करण्यात आला पाहिजे. अशा मंडपामध्ये कोणत्याही परिस्थितीत गर्दी करण्यास मुभा असणार नाही. मतदान केंद्रातून मत देऊन बाहेर पडलेल्या व्यक्तीस मंडपात येण्याची मुभा असणार नाही. मंडप सांभाळणाऱ्या व्यक्तींनी मतदान केंद्राकडे जाणाऱ्या मतदारांच्या मार्गात कोणताही अडथळा निर्माण करण्यास किंवा त्यांना दुसऱ्या उमेदवारांच्या मंडपात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

    उपविभागात निवडणूकीत सर्व राजकीय पक्ष, संघ, संस्थाने उमेदवार, प्रतिनिधी यांनी सार्वजनिक जागा, शासकीय व निमशासकीय कार्यालयाचे इमारत व जागेवरील लावलेली  भिंतीपत्रके, फलक, पोस्टर्स, बॅनर्स कट आऊट त्वरित काढून टाकावीत. तसेच खाजगी जागा, इमारतीवरील संबंधीत जागा मालकाचे लेखी संमतीशिवाय लावलेली भिंतीपत्रके, फलक, पोस्टर्स, बॅनर्स, कट आऊट त्वरित काढून टाकावीत. उपविभागात मतदानाचे दिवशी मतदान केंद्र व परीसरात जमाव करण्यास, मतदारांना घाबरविण्यास, बळजबरीने मतदान करण्यास किंवा मतदान न करण्यास प्रवृत्त करणे, उमेदवाराच्या निवडणूक चिन्हाचे प्रदर्शन करणे, मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर करणे, वाहनांचा प्रवेश, मतदान केंद्रामध्ये अनधिकृत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

    उपविभागात ग्रामपंचायत निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी, तहसिल कार्यालय येथून होणार असल्याने व तहसिल कार्यालयात मतमोजणी केंद्र व सुरक्षा कक्ष प्रस्तावित असल्याने तहसिल कार्यालयाच्या आवारात केवळ 4 व्यक्तींना परवानगी असणार आहे. तसेच मिरवणूकीने येत असल्यास निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयापासून 100 मीटरचे आत मिरवणूक थांबविणे बंधनकारक असणार आहे.  तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कक्षात कोविड 19 च्या मार्गदर्शक सुचनेनुसार 4 पेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेशास बंदी असणार आहे. तथापी हा आदेश मतदानाशी संबंधीत अधिकारी, सर्व पोलीस अधिकारी, सुरक्षा पथकातील कर्मचारी, निवडणूक निरीक्षक यांना लागू असणार नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात येणार आहे, असे बुलडाणाचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी रूपेश खंडारे यांनी कळविले आहे.   

******

 

No comments:

Post a Comment