Friday 31 March 2023

DIO BULDANA NEWS 31.03.2023

 सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन

बुलडाणा, दि. 31 : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. मार्च महिन्याचा लोकशाही दिन सोमवार, दि. 3 फेब्रुवारी  2023 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आला आहे.

लोकशाही दिनानंतर शासकीय योजनांची जत्रा, समन्वय समितीच्या अनुषंगाने विभागप्रमुखांशी चर्चा, आपले सरकार पोर्टलवरील तक्रारींचा निपटारा, लोकसेवा हक्क प्रकरणांचा आढावा, मुख्यमंत्री सचिवालय कक्ष तक्रारींचा आढावा घेण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी कळविले आहे.

00000

ढासाळवाडी, वरवंडसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजूर

बुलडाणा, दि. 31 : बुलडाणा तालुक्यातील ढासाळवाडी आणि वरवंड या दोन गावांसाठी पिण्याचे पाणी पर्याप्‍त प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने प्रत्येकी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे.

ढासाळवाडी येथील लोकसंख्या 1 हजार 173 असून पशूधन 850 आहे. गावाला एका टँकरद्वारे दररोज 18 हजार 460 लिटर पाणी पुरवठा केला जाणार आहे. तसेच वरवंड येथील लोकसंख्या 6 हजार असून पशूधन 325 आहे. गावाला एका टँकरद्वारे दररोज 1 लाख लिटर पाणी पुरवठा केला जाणार आहे.

पाणीटंचाई निवारणाच्या निकषानुसार सदर दोन गावास पशूधनासह लागणारा पाणी पुरवठा हा अस्तित्वात असलेली पाणी पुरवठ्याची साधने, स्त्रोतांद्वारे मिळणारे पाणी या बाबी लक्षात घेऊन टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे उपविभागीय अधिकारी, बुलडाणा यांनी कळविले आहे.

00000

अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या

कर्जासाठी 12 एप्रिल रोजी सोडत

बुलडाणा, दि. 31 : साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची सोडत पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात बुधवार, दि. 12 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता चिठ्ठीद्वारे लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.

महामंडळाच्या प्रकल्प मर्यादा एक लाख रूपयांपर्यंत थेट कर्ज योजनेंत दि. 26 डिसेंबर ते 24 जानेवारी दरम्यान कर्ज मागणी अर्ज स्विकारण्यात आले. यात एकूण 190 अर्ज प्राप्त झाले. अपर जिल्हाधिकारी यांच्या बैठकीमध्ये यातील 158 अर्ज पात्र, तर 32 अर्ज अपात्र ठरले आहेत. कर्ज मागणी अर्जापैकी शहरी पुरूष 20, ग्रामीण पुरूष 97 तर शहरी महिला 11 आणि 30 ग्रामीण महिला आहेत.

पात्र अर्जदारांची यादी महामंडळाच्या कार्यालयात सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्जदारांनी सोडतीच्या वेळी उपस्थित राहावे, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक जे. एम. गाभणे यांनी केले आहे.

00000

शिक्षक अभियोग्यता परीक्षेचा निकाल जाहिर

बुलडाणा, दि. 31 : पवित्र संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरीता घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धीमत्ता चाचणीचा निकाल जाहिर करण्यात आला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये शिक्षक भरती करण्यासाठी दि. 22 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल दि. 24 मार्च रोजी mscepune.in या संकेतस्थळावर जाहिर करण्यात आला आहे. ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांची गुणपत्रिका ibpsonline.ibps.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या मुदतीनंतर सदर वेबलिंक बंद करण्यात येणार असल्याने उमेदवारांनी दि. 20 एप्रिल 2023 पर्यंत गुणपत्रक डाऊनलोड करून घ्यावे. गुणपत्रिकेची प्रत संपूर्ण प्रक्रियेदरम्यान जपून ठेवावी, असे आवाहन राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment