Thursday 9 March 2023

DIO BULDANA NEWS 09.03.2023

 उमेद अभियानातील महिला समूहांना 16 कोटींचे वाटप

बुलडाणा, दि. 9 : महिला दिनानिमित्त जिल्ह्यातील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा परिषद यांच्यातर्फे महिला स्वयंसहाय्यता समूहांना 15.95 कोटी रूपयांचे वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नरेश हेडाऊ, स्टेट बँक ऑफ इंडियाचे विभागीय अधिकारी भरत शेळके, जिल्हा अभियान व्यवस्थापक नितीन मेश्राम, गटविकास अधिकारी श्रीमती पवार, समाधान वाघ, चंदनसिंग राजपूत, सतीश देशमुख, उद्धव होळकर, उमेश देशमुख, गजेंद्र दांदडे उपस्थित होते.

यात 600 महिला स्वयंसहाय्यता समूहांना 9 कोटी रुपये बँक कर्ज आणि उमेद अभियानातील निधी 2 हजार समूहांना प्रत्येकी 15 हजार रुपयांप्रमाणे 3 कोटी रुपये, तर 500 समूहांना प्रत्येकी 60 हजार रुपयांप्रमाणे 3 कोटी रुपये, ग्रामसंघाना 70 लाख व्यवस्थापन निधी, पीएमएफएमई योजनेंतर्गत 25 लाख रुपये असे एकूण 15.95 कोटी रुपयांचे वाटप खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

श्री. जाधव यांनी उमेद अभियानातील महिलांना महिला स्वयंसहाय्यता समूहाचे महत्व सांगितले. महिलांना व्यवसाय उभारणीस प्रोत्साहन देऊन त्यांनी उद्योजगतेचा हेतू आणि महत्व स्पष्ट केले. स्वयंसहाय्यता समूह म्हणजे महिलांचा मानसन्मान वाढविणे अशा भावना व्यक्त केली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश इंगळे यांनी प्रास्ताविकातून अभियानाची माहिती दिली. तसेच उद्योजक महिलांनी व्यवसाय करून उत्पन्नात भर पडण्याबाबत माहिती दिली.

यावेळी पाच उत्कृष्ट उद्योजक महिलांच्या यशोगाथा सादर करण्यात आल्या. तसेच निधी वाटपावेळी बँकेचे कर्ज, अभियानातून मिळणारा फिरता निधी, व्यवस्थापन निधी, समुदाय गुंतवणूक निधीचे वाटप करण्यात आले. सुषमा मुंगळे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा व्यवस्थापक विक्रांत जाधव यांनी आभार मानले.

000000



प्रशासकीय इमारतीत जागतिक महिला दिन साजरा

बुलडाणा, दि. 9 : जागतिक महिला दिनानिमित्त प्रशासकीय इमारतीतील महिला अधिकारी, कर्मचारी यांनी महिला दिन साजरा केला. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर अध्यक्षस्थानी होत्या.

सुरवातीला उपस्थितीत सर्व महिलांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर महिला कर्मचाऱ्यांनी मत, कविता, महिलांचे सशक्तीकरणास वाव मिळावा म्हणून करावयाच्या उपयोजनांची माहिती दिली. महिलांमध्ये त्यांच्या अधिकाराबाबत जागृती करण्यात आली.

कार्यक्रमात सोनाली गावंडे, अश्विनी देशपांडे, उज्ज्वला गव्हाळे, सुलक्षणा चवरे, संगीता कातखेडे, विभा खंडारे, सविता खंडारे, दिपाश्री मेश्राम, अंजली शेजुळ, दिपाली घोगरे, सविता वाकोडे, श्रेया दाभाडकर, अश्विनी ढेके, वृषाली राजपूत, दिपाली अडावकर, पुष्पा मोरे, शिवानी तावडे, ज्योत्स्ना देवगावकर, अश्विनी वैराळकर, समिती बोके, सुशिला पवार, माया जुंबड यांनी सहभाग घेतला,

00000





जागतिक महिला दिनी अंगणवाडी सेविकांचा सत्कार

बुलडाणा, दि. 9 : जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग आणि जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने जागतिक महिला दिन जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात साजरा करण्यात आला. यात अंगणवाडी सेविकांचा जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी सत्कार केला.

कार्यक्रमाला जिल्हाधिकारी ह. पि. तुम्मोड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए. पी. पवार, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी पी. डी. राठोड, जिल्हा महिला बालविकास अधिकारी अशोक मारवाडीउपमुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद मरामे, बालविकास प्रकल्प अधिकारी एम. एम पांचाळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार विजेत्या डॉ. गायत्री सावजी, डॉ. शिल्पा दंदाले, डॉ. संध्या इंगळे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कोणत्याही क्षेत्रात कार्य करीत आहेत. महिलांचा विकास आणि उत्थानासाठी होत असलेल्या प्रयत्नाबाबत त्यांनी महिला व बालकल्याण विभागाचे कौतुक केले. श्रीमती विसपुते यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन सेविकांनी अंगणवाडीच्या कामकाजात अग्रेसर असण्याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात अंगणवाडी पर्यवेक्षिका स्मिता भोलने प्रथम, तारामती मुंडे द्वितीय, तर तृतीय क्रमांक सुनिता चित्ते यांना स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. अश्विनी ठाकरे यांना आदर्श बालविकास प्रकल्प अधिकारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  बालविकास प्रकल्प अधिकारी अश्विनी ठाकरे यांनी सूत्रसंचाचलन केले. बालविकास प्रकल्प अधिकारी एन. जी. घनतोडे यांनी आभार मानले.

0000000

छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्रदान

बुलडाणा, दि. 9 : जिल्ह्यातील तीन व्यक्तींची सन 2018 आणि 2019च्या छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या पुरस्कारप्राप्त व्यक्ती आणि शैक्षणिक संस्थांना शुक्रवार, दि. 3 मार्च 2023 रोजी जागतिक वन्यजीव दिनी जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांच्या पुरस्कार प्रदान करण्यात आले.

राज्यातील सामाजिक वनीकरणाच्या वनेत्तर क्षेत्रातील वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि शैक्षणिक संस्थांना महाराष्ट्र राज्य वनश्री पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

या  पुरस्कारांमध्ये सन 2018मध्ये विभागस्तरावर व्यक्ती संवर्गात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अनिरुद्ध माकोने, रा. जुनागाव बुलडाणा यांना प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांना स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि 50 हजार रुपयांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. सन 2018मध्ये संस्थेमध्ये जी. एस. विज्ञान  कला आणि वाणिज्य महाविद्यालय, खामगाव यांना पुरस्कार स्वरुपात स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि 30 हजार रुपयांचे  राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. सन 2019 मधील विभागस्तरावर व्यक्ती संवर्गात अरुण भगत, रा. खामगाव यांना स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि 50 हजार रुपयांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आणि विभागीय वन अधिकारी बी. एन. पायघन यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.

सामाजिक वनीकरणाच्या विविध शालेय स्पर्धांमध्ये चित्रकला स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक कोमल शिंगणे, द्वितीय यश गायकवाड यांना स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी वनक्षेत्रपाल व्ही. आर. थोरात, एस. आर. घेवंदे, वनपाल ए. ए. गिते, एस. डी. गावंडे, श्री. भोंबे उपस्थित होते.

000000



जन औषधी दिवशी जनेरीक औषधी विक्रेता, डॉक्टरांचा सन्मान

बुलडाणा, दि. 9 : जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार, दि. 6 मार्च 2023 रोजी जन औषधी दिवस साजरा करण्यात आला. आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांच्या हस्ते प्रधानमंत्री जन औषधी विक्रेता तसेच जनेरीक औषधी लिहिणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. जिल्ह्यातील जनतेला स्वस्त आणि दर्जेदार स्वरुपातील औषध उपलब्ध करुन दिल्याबाबत कौतुक करण्यात आले.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत पाटील, स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सचिन वासेकर, जिल्हा नेत्र चिकित्सक डॉ. रवि शिंदे, मुख्य औषध निर्माण अधिकारी गणेश डोके, विनोद तुपकर, अविनाश पाटील, गजानन घिरके, के. ए. म्हस्के, प्रधानमंत्री जनऔषधी केंद्राचे संचालक मिनल भट्टड, तुषार भट्टड आदी उपस्थित होते.

प्रधानमंत्री जनऔषधी केंद्राद्वारे पुरविण्यात येणाऱ्या औषधी 50 ते 90 टक्क्यांपर्यंत स्वस्त स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा कल हा जनेरीक औषधाकडे वाढत आहे. या औषध केंद्रामुळे देशभरात जवळपास 3600 कोटी रुपयाची बचत झाली आहे. तसेच या केंद्रावर 75 प्रकारची आयुष औषधे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. जिल्ह्यामध्ये 30 प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र आहेत. त्याचा फायदा जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना होत आहे.

0000000

No comments:

Post a Comment