Monday 20 March 2023

DIO BULDANA NEWS 20.03.2023

 






दोन दिवसात नुकसानीचे पंचनामे पूर्ण करावेत
* जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांचे निर्देश
* मलकापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी
बुलडाणा, दि. २० : जिल्ह्यात रविवार, दि. १९ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतपिकाचे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने कांदा, हरभरा आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे दोन दिवसांत पंचनामे करून अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी दिले. 
जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी आज मलकापूर तालुक्यातील घिर्नी, माकनेर, हरसुडा येथील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकाची पाहणी केली. जिल्ह्यात सुमारे दोन हजार ७०० हेक्टरवरील कांदा, हरभरा, गहू तसेत केळी या शेतपिकाचे नुकसान झाले आहे. यापैकी मलकापूर तालुक्यत एक हजार ४१६ हेक्टर पिकाचे नुकसान झाले आहे. उपलब्ध असलेले मनुष्यबळ उपलब्ध करून येत्या दोन दिवसांत नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले. 
जिल्हाधिकारी यांनी हरसुडा येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतपिकांचे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. अवकाळी पावसाबाबत आधीच इशारा देण्यात आला होता. अशा इशाऱ्यांची दखल शेतकऱ्यांनी गांभीर्यपूर्वक घ्यावी आणि वेळेत पिक कापणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. 
नांदुरा तालुक्यात ८१ हेक्टर आणि मोताळा तालुक्यात १० हेक्टरवर नुकसान झाले आहे. याचेही तातडीने पंचनामे करावेत. तात्काळ पंचनामे केल्याने नुकसानीचा खरा अहवाल समोर येत असल्याने तातडीने सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून जिल्हाधिकारी यांनी मलकापूर येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांची बैठक घेतली. दोन दिवसात नुकसानीचे पंचनामे पूर्ण व्हावे यासाठी महसूल यंत्रणेने कृषी विभागाची मदत घ्यावी. तसेच येत्या उन्हाळ्यात रोजगार हमी योजना आणि टंचाई निवारणाच्या कामांचे तातडीने नियोजन  करावे. त्यासोबतच राजस्व अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी दिले.
०००००


No comments:

Post a Comment