Thursday 23 March 2023

DIO BULDANA NEWS 22.03.2023

 गुरुवारी डाक अदालतीचे आयोजन

बुलडाणा, दि. 22 : पोस्ट विभागाच्या तक्रारी सोडविण्यासाठी बुलडाणा डाकघर विभागातर्फे शुक्रवारी, दि. 23 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. पोस्टाच्या कार्याविषयी किंवा कामकाजाबद्दल सहा आठवड्यात तक्रारींचे निवारण झालेले नसल्यास अशा तक्रारींची दखल डाक अदालतीमध्ये घेतल्या जाणार आहे.
देशातील पोस्टाची सेवा ही सामाजिक आणि आर्थिक जीवनाचा एक अभिन्न भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये पोस्टाच्या सेवेने वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण केले आहे. पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा व ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचा प्रयत्न करते. ही सेवा देताना संभाषण, पत्रव्यवहार किंवा सेवेमध्यील काही त्रृटीमुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रारी होतात. तक्रारींचा योग्य प्रकारे न्याय निवडा करण्यासाठी पोस्ट खात्यातर्फे डाक अदालती घेण्यात येते.
000000000
पशुपालकांनी शिर्डी येथील महापशूधन प्रदर्शनाचा लाभ घ्यावा
*जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आवाहन
बुलडाणा, दि. 22 : पशुसंवर्धन विभागातर्फे पशूपालक आणि शेतकऱ्यांना पाळीव पशूबाबत शास्त्रोक्त ज्ञान मिळावे, यासाठी 24 ते 26 मार्च दरम्यान शिर्डी, जि. अहमदनगर येथे महापशुधन प्रदर्शन 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा जिल्ह्यातील पशुपालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले आहे.
शिर्डी येथे आयोजित अखिल भारतीय पशू पक्षी प्रदर्शनात राज्यासह विविध बारा राज्यातील सर्व प्रजातीचे दिड हजारावर जातीवंत पशुधन राहणार आहे. भारतातील सर्व पशुधनाच्या विविध जाती एकाच छताखाली पाहण्याची संधी पशुसंवर्धन विभागाने महापशुधन प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतून गायी, म्हशी, शेळी मेंढी, वराह, कुक्कुट यांच्या विविध प्रजातींचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. हे प्रदर्शन अंदाजे 50 एकर जागेत आयोजित केले आहे. पशूसंवर्धनाशी निगडीत व्यवसायाचे 240 स्टॉल राहणार आहे.
या स्टॉलमध्ये राज्यातील पशुसंवर्धनविषयक विविध कार्यक्रम पाहण्याची संधी उपलब्ध राहणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये शेतकरी, पशुपालकांसाठी पशुसंवर्धनविषयक विविध चर्चासत्रे, वैरण प्रात्याक्षिके आणि दुग्ध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुकांनी पशु प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
000000000
गुरुवारी दक्षता समितीची सभा
बुलडाणा, दि. 22 : जिल्हा दक्षता समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये गुरुवार, दि. 23 मार्च रोजी दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
तसेच भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा मंगळवार, दि. 28 मार्च रोजी दुपारी 12.30 वाजता घेण्यात येणार आहे.
जिल्हा दक्षता समिती सभा तसेच जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा यात ज्या व्यक्तींना तक्रारी दाखल करावयाच्या असतील त्यांनी प्रतिज्ञालेखासह तक्रारी स्पष्ट शब्दात सबळ पुराव्यानिशी समिती समोर दाखल करावे, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाच्या तहसिलदार यांनी केले आहे. 
0000
शनिवारपासून बचतगट उत्पादित वस्तूंची जिल्हास्तरीय प्रदर्शनी
बुलडाणा, दि. 22 : महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्पांतर्गत बचत गटातर्फे उत्पादित वस्तूंची जिल्हास्तरीय प्रदर्शनी शनिवार, दि. २५ मार्च ते २७ मार्च २०२३ या कालावधीत सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत बुलडाणा येथील जिजामाता प्रेक्षागार येथे आयोजित करण्यात आली आहे. 
प्रदर्शनीमध्ये विविध मसाले, डाळी, पापड, लोणचे व शोभेच्या वस्तू आदी उत्पादनाची विक्री करण्यात येणार आहे. यासाठी सर्व जिल्ह्यातून सुमारे १०० बचतगट यात सहभागी होणार आहे. प्रदर्शनीत माविमसह नागरी जिवनोन्नती अभियान, ग्रामीण जिवनोन्नती अभियान आणि आत्मा विभागाची बचतगटही सहभागी होणार आहेत. तीन दिवसीय प्रदर्शनीमध्ये शेतीविषयक तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. 
नागरिकांनी प्रदर्शनीला भेट देऊन बचत गटांचा उत्साह वाढवावा तसेच त्यांच्या जीवनास हातभार लावण्यास मदत करावी, असे आवाहन जिल्हा समन्वय अधिकारी सुमेध तायडे यांनी केले आहे.
000000
युवकांना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी
बुलडाणा, दि. 22 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत किमान कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेंतर्गत 15 ते 45 वयोगटातील उमेदवारांना विविध जॉब रोलचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याचा इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 
प्रशिक्षणात अधिक मागणी असलेल्या क्षेत्राच्या आवश्यकतेनुसार व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच उमेदवारांना रोजगारक्षम करून त्यापैकी किमान 75 टक्के उमेदवारांना प्रत्यक्ष नोकरी किंवा स्वयंरोजगार मिळवून देण्यात येणार आहे. प्रशिक्षणात अनुसूचित जाती-जमाती, महिला, अपंग, अल्पसंख्याक यांच्या सहभागावर भर देण्यात येणार आहे.
यात प्लंबर, शिवणकाम, शिवणयंत्र चालक, दुचाकी दुरुस्ती, जरा एन्ट्री ऑपरेटर, सौदर्य चिकित्सा, वेल्डर, बांधकाम, मेक अप आर्टिस्ट, गेस्ट सर्विस, घरगुती वस्तू दुरुस्ती, मशरूम उत्पादन, माहिती तंत्रज्ञान समन्वयक, सौर ऊर्जा पॅनल तंत्रज्ञ आदी विषयाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
प्रशिक्षणाचा गरजू आणि इच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यावा,
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्र येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा किंवा कार्यालयाचा दुरध्वनी 07262-242342 किंवा नंदू मेहेत्रे यांच्या मोबाईल क्रमांक 9975704117 यावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.
000000


कृषि विभाग, राष्ट्रीय बीज निगम, शेतकरी उत्पादक कंपनीची कार्यशाळा
बुलडाणा, दि. 22 : आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त कृषि विभाग, राष्ट्रीय बीज निगम आणि शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींची एकदिवसीय कार्यशाळा बुलडाणा येथे रविवार, दि. १९ मार्च रोजी पार पडली. 
या कार्यशाळेत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य जागतिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले संबोधन थेट प्रक्षेपणाद्वारे उपलब्ध करून देण्यात आले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संतोष डाबरे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय बीज निगमचे क्षेत्रीय प्रबंधक हेमंत चिरमूरकर उपस्थित होते. कार्यशाळेचे आयोजन जळगाव येथील राष्ट्रीय बीज निगम प्रक्षेत्राचे प्रबंधक मोहित पुरवार यांनी केले. कार्यशाळेमध्ये शेतकरी उत्पादक कंपनीना राष्ट्रीय बीज निगममार्फत डीलरशिपची  माहिती देण्यात आली. 
सदर कार्यशाळेमध्ये शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. राष्ट्रीय बीज निगम मार्फत मार्केटिंगमध्ये शेतकरी उत्पादक कंपनीना संधी मिळणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सं. गं. डाबरे यांनी सांगितले. 
00000





जलजागृती सप्ताहात रांगोळी स्पर्धा 
*महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
बुलडाणा, दि. 22 : जलसंपदा विभागातर्फे आंतरराष्ट्रीय जल दिनानिमित्त आयोजित जलजागृती सप्ताहात कार्यकारी अभियंता, बुलडाणा पाटबंधारे विभाग, बुलडाणा यांच्या वतीने बुलडाणा मंडळ कार्यालयाच्या सभागृहामध्ये मंगळवारी, दि. २१ मार्च रोजी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम विदिशा अघमे, दुसरा रेणुका विधाते, तिसरा क्रमांक जान्हवी सोनोने यांनी पटकाविला. विजेत्यांना उपकार्यकारी अभियंता क्षितिजा गायकवाड, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी मोनिका रोकडे, सुनिता राजपुत यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. श्रीमती गायकवाड यांनी येत्या वर्षात उपलब्ध पाण्यातून किमान 10 टक्के सिंचन क्षेत्र वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवावे. तसेच आगामी काळातील पाणीटंचाई लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन केले.  
सुरेखा जाधव यांनी सूत्रसंचालन केले. रांगोळी स्पर्धेसाठी जलसंपदा विभागाच्या श्वेता झावरे, मनिषा कांडलकर, श्रीमती दिक्षीत, श्रीमती कापरे,श्रीमती तोमर, श्रीमती दांडगे, मिनाक्षी इंगळे, रेणुका वाघ, गौरी खाडे, श्रीमती सोनुने, श्रीमती सावळे, श्रीमती लाटे, स्मिता इंगळे यांनी पुढाकार घेतला.  
0000

No comments:

Post a Comment