Wednesday 15 March 2023

DIO BULDANA NEWS 15.03.2023

 चणा खरेदीसाठी 11 केंद्रांना मान्यता

बुलडाणादि. 15 : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत नाफेडतर्फे हमीदराने चणा खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात 11 केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे.

चणा खरेदीसाठी दि. २७ फेब्रुवारी ते दि. १५ मार्च २०२३ पर्यंत नोंदणी सुरु करण्यात आली आहे. चणा खरेदी दि. १४ मार्च ते दि. ११ जून २०२३ पर्यंत सुरु राहणार आहे. जिल्ह्यात ११ खरेदी केंद्राना मान्यता देण्यात आले आहे. यात तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादित बुलडाणा, लोणार, मेहकर, शेगाव, संग्रामपूर, कृषि उत्पन्न बाजार समिती संग्रामपूर केंद्र - वरवंड बकाल, सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी, अंजनी खुर्द केंद्र- साखरखेर्डा, संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी, मोताळा, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था, चिखली, बिबी फार्मर प्रोड्युसर कंपनी, किनगाव जट्टू, माँ जिजाऊ फार्मर प्रोड्युसर कंपनी, सिंदखेडराजा या केंद्राना मान्यता देण्यात आली आहे.

जिल्हा पणन अधिकारी यांनी चणा नोंदणी सुरु करण्याचे आदेश दिले आहे. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांनी एसएमएस प्राप्त होताच आपला चणा शेतमाल खरेदी केंद्रावर घेऊन जावे. असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी एम. जी. काकडे यांनी केले आहे.

00000

आजपासून जलजागृती सप्ताहास सुरवात

बुलडाणा, दि. 15 : जागतिक जल दिनानिमित्त दि. 16 ते 22 मार्च या कालावधीत जिल्ह्यात जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहांतर्गत गुरूवार, दि. 16 मार्च रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी खडकपुर्णा, पैनगंगा, वान, मन, नळगंगा, पुर्णा, ज्ञानगंगा, विश्वगंगा या नद्यांचे जलपूजन करून यावेळी जलप्रतिज्ञेचे सामुदायिक वाचन करण्यात येणार आहे.

जलजागृती सप्ताहात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा जलसंपदा विभागातर्फे नुकताच घेण्यात आला. यात गतवर्षीच्या तुलनेत सिंचनात 10 टक्के वाढ करणे, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी जनप्रबोधन करणे हा कार्यक्रमाचा उद्देश असून यासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. या उपक्रमात सहभाग घ्यावे, असे आवाहन बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता सुनिल चौधरी यांनी केले आहे.

जलजागृती सप्ताहात प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील प्रत्येक गावात कार्यशाळा किंवा चर्चासत्र आयोजित घेण्यात येणार आहे. चर्चासत्रात गावाचे लाभक्षेत्र पाणी उपलब्धता, सिंचनाच्या पद्धती, पिकाना लागणारे पाणी बचत आदी विषयावर माहिती देण्यात येणार आहे.  या कार्यशाळेत सिंचनाचे कायदे, नियम, पाणी वापर संस्थाची माहिती, फायदे, तालुक्यातील सिंचनाचे प्रश्न, अपूर्ण प्रकल्पाच्या बांधकामाचे नियोजन, उपसा सिंचन परवान्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जलजागृती सप्ताह कार्यक्रमाचा समारोप दि. 22 मार्च रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.

या उपक्रमात सोमवार, दि. 20 मार्च रोजी सकाळी 7.30 वाजता वॉटर रन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात 2 ते 3 किलोमीटर लांब धावणे, तसेच चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. प्राथमिक, माध्यमिक तसेच तंत्रशिक्षण विभागाच्या सहकार्याने चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. वॉटर रन, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत पहिल्या तीन स्पर्धकांना रोख बक्षिस आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. उपलब्ध पाण्याचे नियोजन, पाण्याचे महत्व, काटकसर आणि जनमानसात जागृती निर्माण करुन त्याला लोकचळवळीचे स्वरुप देण्यासाठी नागरिकांनी वॉटर रन स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000



कोलवड येथे स्वच्छ भारत अभियान, श्रमदान

बुलडाणा, दि. 15 : नेहरु युवा केंद्र आणि जिजामाता महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने कोलवड येथे दि. 13 ते 15 मार्चपर्यंत स्वच्छ भारत अभियान आणि श्रमदान करण्यात आले.

श्रमदानातून कोलवड गावातील आकोली भागात शाळा परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी कोलवडच्या सरपंच मिरा पवार, नेहरु युवा केंद्राचे कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर कांदे, राष्ट्रीय सेवा योजना महिला अधिकारी डॉ. राजश्री येवले, युथवेल असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक राजेश शेळके, साहेबराव पाटील, अंकुश जाधव, धनंजय ताठे उपस्थित होते. 

राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी या भागातील रस्ते आणि नाल्यांची सफाई केली. ग्रामसेवक श्री. पायघन यांनी टॅक्टरची व्यवस्था करून कचऱ्याची विल्हेवाट लावली. यासाठी विलास सोनोने यांनी पुढाकार घेतला.

000000

युवा संवाद भारत स्वयंसेवी संस्था निवडीसाठी अर्ज आमंत्रित

बुलडाणा, दि. 15 : नेहरू युवा केंद्रातर्फे 1 एप्रिल ते 31 मे 2023 या कालावधीत जिल्ह्यांमध्ये समुदाय आधारित संस्थांमार्फत ‘अमृत कालच्या काळातील भारत @ 2047 ची झलक’ संदर्भात  ‘युवा संवाद - भारत @ 2047’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी स्वयंसेवी संस्थांची निवड करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील विविध समुदाय आधारीत संस्थांच्या मदतीने आणि सहाय्याने जिल्हास्तरावर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम टाऊन हॉल स्वरूपात आयोजित केला जाणार आहे. ज्यामध्ये तज्‍ज्ञ, जाणकार व्यक्ती पंचप्रणवर चर्चा करतील. यात किमान ५०० तरुणांच्या सहभागासह प्रश्नोत्तरे होईल. आयोजक संस्थांना कार्यक्रमाच्या आयोजनासाठी 20 हजार रूपयांपर्यंत निधी दिला जाईल. ज्या संस्था या कार्यक्रमासाठी अर्ज करू इच्छितात त्यांचा गैरराजकीय, पक्षपाती नसलेला इतिहास असणे आवश्यक आहे. युवा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पुरेसे संघटनात्मक बळ असणे आवश्यक आहे. संस्थेविरुद्ध फौजदारी खटला प्रलंबित नसावा. कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जिल्ह्यातील तीन समुदाय आधारित संस्था निवडल्या जातील.

निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुक संस्थांनी नेहरू युवा केंद्र, दुसरा मजला, फ्लॅट नं. 202, डीएसडी सिटी मॉल, बुलडाणा येथे विहित नमुन्यात अर्ज दि. 20 मार्च 2023 पूर्वी सादर करावेत. अधिक माहितीसाठी नेहरु युवा केंद्राशी संपर्क साधावा किंवा ईमेल qnykbuldana@gmail.com किंवा 07262-295332 वर संपर्क साधावा. अर्ज डाउनलोड करण्यासाठी लिंक https://drive.google.com/file/d/1T9Wb3IGF0Vfa2AO795kwTYLakIcP2MX4/view?usp=sharing या लिंकवर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000








नेहरू युवा केंद्राच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात

बुलडाणा, दि. 15 : नेहरु युवा केंद्राच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा दि. 11 मार्च रोजी जिल्हा क्रीडा संकुलात उत्साहात पार पडल्या.

यात कबड्डी, व्‍हॉलीबॉल, 100 मीटर धावणे, गोळा फेक स्पर्धा घेण्यात आल्या. कबड्डीमध्ये प्रथम महर्षि वाल्मीकी मंडळ, भानखेड, ता. चिखली, द्वितीय मातृभूमी मंडळ बुलडाणा, तृतीय क्रमांक उमरा, खामगाव मंडळाने पटकावला. मुलींमध्ये प्रथम जिजामाता क्लब बुलडाणा, द्वितीय दत्त क्रीडा मंडळ, जळगांव जामोद, तृतीय क्रमांक नेहरु युवती मंडळ बोरजवळा, ता. खामगाव संघाने पटकावला. 

व्‍हॉलीबॉलमध्ये प्रथम धर्मवीर क्लब बुलडाणा, द्वितीय हनुमान क्रीडा मंडळ, नांदुरा खुर्द, तृतीय क्रमांक स्वामी विवेकानंद विद्यालय, शेगाव यांनी पटकविला. 100 मीटर धावणे स्पर्धेत मुलींमधून प्रथम जान्हवी खरात, द्वितीय सानिका बनकर, तृतीय क्रमांक प्रियंका मालठाणे यांनी पटकविला. मुलांमधून प्रथम तिलक तोंडीलायता, द्वितीय सचिन पुंडे, तृतीय क्रमांक परमेश्वर राठोड यांनी पटकविला. गोळाफेक स्पर्धेत मुलींमधून प्रथम राधा चिंचोळकर, द्वितीय प्रियंका मालठाणे, तृतीय क्रमांक आरती ठेंग यांनी पटकविला. मुलांमधून प्रथम सागर बोर्डे, द्वितीय प्रफुल गोरे, तृतीय क्रमांक दिपक तायडे यांनी पटकविला.

ॲथेलेटीक्सचे ज्येष्ठ प्रशिक्षक विजय वानखेडे यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. व्‍हॉलीबॉलमध्ये पुरूष गटात प्रथम धर्मवीर संघ, बुलडाणा, द्वितीय लॉयन्स क्लब, सुंदरखेड, तृतीय क्रमांक प्रबोधन विद्यालय, बुलडाणा यांनी पटकावला. कबड्डीमध्ये प्रथम मातृभूमी मंडळ, द्वितीय धर्मवीर मंडळ, तृतीय क्रमांक शिवाजी मंडळ यांनी पटकविला.

विजेत्या संघाना नायब तहसिलदार प्रकाश डब्बे, मंडळ अधिकारी ए. एन. शेळके आणि नेहरु युवा केंद्राचे लेखा व कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत, युथवेलचे संचालक राजेश शेळके यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून दिलीप लांडकर, रविंद्र गणेशे, मनोज श्रीवास, विजय वानखेडे, राजेश डिडोळकर, शेख इद्रीस, निलेश पवार, देवानंद नेमाने,  गणेश पेरे, मारोती पठाडे, यश तोटे, हर्षल काळवाघे उपस्थित होते. स्पर्धेसाठी धनंजय चाफेकर, विलास सोनोने, उमेश बावस्कर, सुरज बोरसे, कृष्णा नरोटे, गोपाल गोरे यांनी पुढाकार घेतला.

00000



युवा नेतृत्व, समुदाय विकास प्रशिक्षण

बुलडाणादि. 15 : नेहरू युवा केंद्रातर्फे दि. 9 ते 11 मार्च दरम्यान युवा नेतृत्व आणि समुदाय विकास प्रशिक्षण जिल्हा क्रीडा संकुलात पार पडले.

प्रशिक्षणाच्या सत्रामध्ये दिव्या फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशोक काकडे, प्रा. डॉ. हरीष साखरे, प्रतिभा भुतेकर, सावित्रीबाई फुले बहुउद्देशिय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश लहासे यांनी मार्गदर्शन केले.

सुरुवातीला नेहरू युवा केंद्राचे लेखा व कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत यांनी नेहरु युवा केंद्र संगठनेच्या कार्यक्रमाची माहिती दिली. धनंजय चाफेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी स्वयंसेवक शुभम वाठोरे, विलास सोनोने, कृष्णा नरोटे, गोपाल गोरे यांनी पुढाकार घेतला.

000000

No comments:

Post a Comment