Thursday 2 March 2023

DIO BULDANA NEWS 02.03.2023

 आरटीईतील प्रवेश प्रक्रियेला सुरूवात

*17 मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत

बुलडाणा, दि. 2 : बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थ सहाय्यीत शाळांमध्ये प्रवेशस्तरावर 25 टक्के जागा वंचित आणि दुर्बल घटकातील मुलांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. यात ऑनलाईन पद्धतीने 17 मार्च 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

सन 2023-24 या वर्षातील 25 टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता अर्ज भरण्याची सुचना 28 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रक्रियेकरीता शाळांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे आता पालकांना ऑनलाईन पद्धतीने 17 मार्चपर्यंत अर्ज भरता येईल. अर्ज भरण्यापूर्वी आवश्यक असणारी कागदपत्रे, निवासी पुरावा, इतर अनुषंगिक माहिती student.maharashra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

प्रवेश प्रक्रियेबद्दल अधिक माहितीसाठी तालुकास्तरावरील शिक्षण विभागाच्या कार्यालयात चौकशी करावी. तसेच प्रवेश प्रक्रियेबाबत मुख्याध्यापक आणि संबंधित यंत्रणा कार्यालयांनी जास्तीत जास्त पालक सहभागी होण्यासाठी जागृती करावी. सन 2023-24 या वर्षात बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकारातील 25 टक्के प्रवेश प्रक्रियेमध्ये पालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी केले आहे.

000000

देऊळगाव राजा आयटीआयमधील

कालबाह्य अवजारांचा लिलाव

बुलडाणा, दि. 2 : देऊळगाव राजा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थ्यांनी प्रात्यक्षिकात उपयोगात आणलेली तूटफूट झालेली निरुपयोगी हत्यारे अवजारे इतर साहित्याच्या लिलाव करण्यात येणार आहे.

या लिलावासाठी भंगार खरेदीदाराकडून निविदा आमंत्रित करण्यात येत आहे. या साहित्याची यादी कार्यालयीन वेळेत आयटीआय येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व निविदेतील निर्लेखन साहित्याची संख्या कमी अथवा अधिक करण्याचे आणि कोणतेही कारण न देता निविदा नाकारण्याचे तसेच रद्द करण्याचे अधिकार, प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देऊळगावराजा यांनी राखून ठेवलेला आहे. निविदा दि. 13 मार्च 2023 रोजी दुपारी सकाळी 12 वाजता सर्वांसमोर उघडण्यात येईल. यावेळी स्वत: किंवा प्रतिनिधीने ओळखपत्रासह उपस्थित असणे आवश्यक आहे. निविदा अर्जाची किंमत 100 रूपये रोख भरून विहित निविदा कालावधीत उपलब्ध करून देण्यात येईल, असे  प्राचार्य जी. एस. भावले यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment