Tuesday 24 January 2023

DIO BULDANA NEWS 24.1.2023

 







पदवीधर मतदारसंघाच्या मतदान केंद्रावर सुविधा पुरवाव्यात

-निवडणूक निरीक्षक पंकज कुमार

*निवडणूक निरिक्षकांकडून केंद्राची पाहणी

*मतदान केंद्रावर प्रकाशाची व्यवस्था करावी

*आदर्श आचारसंहितेचे काटेकार पालन करावे

बुलडाणा, दि. 24 : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी 30 जानेवारी रोजी मतदान होत आहे. जिल्ह्यातील सर्व 52 मतदान केंद्रावर मतदारांसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा पुरविण्यात याव्यात, तसेच मतदान केंद्राच्या ठिकाणी पुरेशा प्रकाशाची व्यवस्था करावी, अशा सूचना निवडणूक निरीक्षक पंकज कुमार यांनी केल्या.

निवडणूक निरीक्षक पंकज कुमार यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात पदवीधर मतदारसंघासाठी होणाऱ्या मतदानाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गौरी सावंगत आदी उपस्थित होते.

निवडणूक निरीक्षक पंकज कुमार यांनी पदवीधर मतदारसंघासाठी घेण्यात आलेल्या नोंदणीचा आढावा घेतला. गेल्या वेळच्या तुलनेत यावेळी मतदारसंख्या वाढल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी मतदान केंद्र, मतदानासाठी आवश्यक साहित्य, वाहतुकीची व्यवस्था, मतदानानंतर मतपेट्या वाहून नेण्याची व्यवस्था आदींबाबत माहिती घेतली. मतपेट्या अमरावती येथे नेताना वाटेत त्या कोणत्याही ठिकाणी थांबू नये, तसेच याकामी पोलिस बंदोबस्त पुरविण्यात यावा, तसेच मतपेट्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस बसविण्यात याव्यात, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

पदवीधर मतदारसंघासाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्याचे काटेकोरपणे पालन व्हावे. मतदानाची प्रक्रिया मतपत्रिकेवर होणार असल्यामुळे सदोष मतपत्रिकांबाबत उमेदवारांना कळविण्यात यावे. वेबकास्टिंग साठी मतदान केंद्रावर वेब कॅमेरे बसविण्यात यावे. त्यांची जागा ही समोरून प्रकाश येणार नाही, तसेच मतदानाची माहिती दिसणार नाही, अशा पद्धतीने बसविण्यात यावे. या मतदान प्रक्रियेमध्ये युवा मतदार असल्यामुळे ज्या ठिकाणी शासकीय कार्यालयात मतदानाची प्रक्रिया होणार आहे,
त्याठिकाणी कार्यालये सुस्थितीत ठेवण्यात यावेत.

निवडणूक निरीक्षक पंकजकुमार यांनी आज शिवाजी विद्यालय आणि एडेड हायस्कूल येथील मतदान केंद्राला भेटी दिल्या. यावेळी त्यांनी मतदारांना पसंतीक्रम लिहिणे सोयीस्कर होईल यासाठी मतदानाच्या ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी, तसेच मतदान केंद्रावर नागरिकांना आवश्यक असणाऱ्या मुलभूत सुविधा पुरविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

निवडणूक निरीक्षक पंकजकुमार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मतदान केंद्र अधिकारी यांच्या प्रशिक्षणाला भेट दिली. यावेळी त्यांनी निवडणूक कामाचे प्रशिक्षण उत्तम झाल्यास अडचणी येत नाहीत. अडचणी आल्या तरी आपली पूर्वतयारी झालेली असल्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरळीतरित्या पार पाडण्यास मदत होते. मायक्रो निरीक्षक यांच्यावर निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या दरम्यान येणाऱ्या अडचणींची त्यांनी वस्तुस्थिती मांडावी. मतदान प्रतिनिधींची संख्या आणि त्यांच्या वावराबाबत योग्य कार्यवाही करावी.

मतदान प्रक्रियेबाबत तक्रारी येणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे. तक्रारी आल्यास त्याची दखल घेतली जाईल. जिल्ह्याच्या बाबतीत सीव्हीजीलच्या डॅशबोर्डवरील तक्रारीबाबत सजग रहावे. यावर येणाऱ्या तक्रारी सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे. मतदान मतपत्रिकेद्वारे होणार असल्यामुळे मतदारांना कोणत्याही परिस्थितीत दोन मतपत्रिका जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. मतदारांना मतदान जागृतीसाठी मोबाईल संदेश पाठविण्यात येणार आहे. केवळ दिव्यांग आणि वृद्ध मतदारांना अपवादात्मक स्थितीत मतदानासाठी मतदान केंद्राधिकारी यांनी मदत करावी. मात्र मतदान करण्याच्यासाठीच्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत जावू नये, याची काळी घेण्याचे आवाहन केले.

00000



नेताजी सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त वकृत्व स्पर्धा

बुलडाणा, दि. 24 : नेहरू युवा केंद्रातर्फे न्यू दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे जयंती सोमवार, दि. 23 जानेवारी 2023 रोजी साजरी करण्यात आली. नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती पराक्रम दिवसानिमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार रुपेश खंदारे, नायब तहसिलदार प्रकाश डब्बे, मंडळ अधिकारी अशोक शेळके उपस्थित होते. तहसिलदार श्री. खंदारे यांनी नेहरु युवा केंद्राच्या माध्यमातून युवकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याबरोबरच दिशा देण्याचे कार्य होत आहे. आज युवकांसमोर मोठी आव्हाने असून युवकांनी नैराश्य, भिती आणि न्यूनगंडाची भावना झुगारुन यशाचे उंच शिखर गाठण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करण्याचे आवाहन केले.

वक्तृत्व स्पर्धेतील विजयी स्पर्धकाना तहसिलदार रुपेश खंदारे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. स्पर्धेतील प्रथम अंजली औतकार, द्वितीय राजनंदनी राजपूत, तर तृतीय क्रमांक मयुरी बुडुकले यांनी पटकविला.

प्रा. गणेश बोचरे, प्रा. निशिकांत ढवळे, प्रा. श्री. बावणे यांनी स्पर्धेसंदर्भात युवकांना मार्गदर्शन केले. नेहरू युवा केंद्राचे लेखा व कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत यांनी प्रास्ताविक केले. नितिन शेळके यांनी सूत्रसंचलन केले. उमेश बावस्कर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी नेहरू युवा केंद्राचे धनंजय चाफेकर, विलास सोनोने यांनी पुढाकार घेतला.

00000

 

प्रधानमंत्री आवास योजनेची घरे

31 मार्च पूर्वी पूर्ण करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 24 : प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य आवास योजनेतील लाभर्थ्यांची अपूर्ण राहिलेली घरकुल पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपली घेरे दि. 31 मार्च 2023 पूर्वी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रधान मंत्री आवास योजनेच्या ग्रामीण योजनेंतर्गत जिल्ह्यात 44 हजार 705 घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी 22 हजार 125 घरकुले पुर्ण झाली आहेत. यातील 22 हजार 523 घरकुले अपूर्ण आहेत. या अपुर्ण घरकुलांपैकी 7 हजार 346 लाभार्थी भूमिहीन लाभार्थी वगळता अपूर्ण घरकुलांची संख्या 15 हजार 224 एवढी आहे. यात बुलढाणा 1 हजार 310, चिखली 1 हजार 612,‍ देऊळगावराजा 511, जळगाव जामोद 873, खामगाव 1 हजार 441, लोणार 1 हजार 507,मलाकापूर 671, मेहकर 1 हजार 594, मोताळा 808, नांदुरा 860, संग्रामपूर 2 हजार 532, शेगाव 447, सिंदखेडराजा 1 हजार 58 घरकुले अपूर्ण आहेत.

रमाई आवास योजनेच्या ग्रामीण अंतर्गत जिल्ह्यात 18 हजार 302 घरकुले मंजूर आहेत. यापैकी 10 हजार 581 घरकुले पुर्ण आहेत. यातील 7 हजार 721 घरकुले अपूर्ण आहेत. अपूर्ण घरकुलांची संख्या 7 हजार 721 आहे. यात बुलढाणा 313, चिखली 661, देऊळगावराजा 245, जळगाव जामोद 456, खामगाव 1 हजार 37, लोणार 475, मलकापूर 301, मेहकर 481, मोताळा 1 हजार 686 नांदुरा 737, संग्रामपूर 290, शेगाव 448, सिंदखेडराजा 591 घरकुल अपुर्ण आहेत. ही घरकुले 31 मार्च 2023 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याबाबत आदेश देण्यात आले आहे.

पहिला हप्ता देऊनही काम सुरु केले नसलेल्या लाभार्थ्यांबाबत पीडब्ल्यूएलमधील पहिला हप्ता देऊनही काम सुरु केलेला नसलेल्या लाभार्थ्यांची एकूण संख्या 1 हजार 770 आहेञ यात बुलढाणा 133, चिखली 47, देऊळगावराजा 56, जळगाव जामोद 169, खामगाव 102, लोणार 45, मलकापूर 5, मेहकर 59, मोताळा 48, नांदुरा 361, संग्रामपूर 556, शेगाव 92, सिंदखेडराजा 97, तर रमाई आवास योजनेमधील पहिला हप्ता देऊनही काम सुरु न केलेल्या लाभार्थ्यांची एकूण संख्या 2 हजार 560 आहे. यात बुलडाणा 178, चिखली 42, देऊळगावराजा 130, जळगाव जामोद 45, खामगाव 329, लोणार 193, मलकापूर 17, मेहकर 53, मोताळा 747, नांदुरा 408, संग्रामपूर 58, शेगाव 260 आहे.

लाभार्थ्यांना पहिला हप्ता दिलेला असूनही काम सुरु केले नाही, अशा लाभार्थ्यांना काम सुरु करण्यासाठी तात्काळ अंतिम नोटीस देण्यात यावी. त्यानंतर 31 जानेवारी 2023 रोजी ज्या लाभार्थ्यांनी नोटीस देवूनही काम सुरु केले नाही, अशा लाभार्थ्यांचे जागेच्या नमुना आठ वर बोझा चढवून दिलेल्या अनुदानाची रक्कम वसूल करण्यात यावी. याबाबत गटविकास अधिकारी यांनी नियोजन करुन 31 मार्च 2023 पर्यंत मंजूर घरकुले पुर्ण करण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहे. 

000000

माझी कन्या भाग्यश्रीचा 58 मुलींना लाभ

बुलडाणा, दि. 24 : मुलगा आणि मुलगी हा भेद समाजात राहू नये, कोणत्याही जाती व्यवस्थेत विषमता राहू नये, यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना राज्यात राबविण्यात येते. या योजनेत आतापर्यंत 58 मुलींना लाभ देण्यात आला आहे. चालू वर्षात 90 अर्ज प्राप्त झाले आहेत. 

भारतातील सन 1991 मधील जनगणनेत मुलींचे प्रमाण हे प्रति हजार मुलांमागे 945 होते. सन 2001 मध्ये हे प्रमाण 927 होते आणि सन 2011 मध्ये 919 होते. दर जनगणनेत मुलींचे लिंग गुणोत्तराचे प्रमाण कमी होत होत असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर 22 जानेवारी 2015 पासून ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या कार्यक्रमाची सुरुवात व प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्याने 2021 मध्ये मुलींचे प्रमाण दर हजार मुलांमागे 933 आढळून आले आहे. जिल्ह्यात मुलींचे प्रमाण वाढलेले आहे. सन 2011 चे मुलींचे प्रमाण 934 होते. तर 2021 मध्ये मिळालेल्या माहितीनुसार सदरचे प्रमाण हे 957 पर्यंत वाढल्याचे दिसून येते.

मुलींचे लिंग गुणोत्तर वाढविणेसाठी स्थानिक लोकल चॅनेलवर प्रसिध्दी देण्यात आली. तसेच ज्या गावामध्ये मुलींचे प्रमाण कमी आहे. त्या निवडक गावामध्ये कलापथकाद्वारे जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. बेटी बचाओ बेटी पढाओचे स्टिकर व बॅनर्स  चिकटविण्यात आले. प्रकल्प, अंगणवाडीस्तरावर व शासकीय कार्यालयांच्या भिंतीवर बोलक्या भिंतीद्वारे चित्रकारिता करण्यात आली. माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या प्रचारासाठी अंगणवाडीमार्फत प्रत्येक गावात प्रसिध्दीपत्रके वितरीत करण्यात आली.

गेल्या काळात मुलींच्या साक्षरतेचे प्रमाण 79.9 इतके वाढल्याचे दिसून येते. मुलींमध्ये शिक्षण घेण्याचे प्रमाण सुध्दा वाढल्याचे दिसून येते. मुलगा व मुलगी हा भेद समाजात व देशात राहू नये. कोणत्याही जाती व्यवस्थेत ही विषमता राहू नये, यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना लागू करण्यात आली आहे. या माध्यमातून जिल्हास्तरावर 58 इतक्या मुलींना प्रति लाभार्थी 25 हजार रूपये या प्रमाणात लाभ देण्यात आला आहे. सन 2022-23 या वर्षाकरिता 90 नवीन अर्ज या कार्यालयास प्राप्त झाले आहे. त्यानुसार त्यांना सदर योजनेचा लाभ देण्यासाठी प्रक्रिया सुरु आहे.

0000

No comments:

Post a Comment