Monday 9 January 2023

DIO BULDANA NEWS 09.01.2023

 


पदवीधर मतदारसंघाची मतदान प्रक्रिया

सुरळीत होण्यासाठी निर्देशांचे पालन करावे

-जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड

बुलडाणा, दि. 9 : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी दि. 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यात 52 मतदान केंद्रांवर हे मतदान होणार आहे. मतदारांची संख्या सिमीत असली तरी मतदान प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी निवडणुकीसंदर्भात वेळोवेळी होणाऱ्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे, असे जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी सांगितले.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नियोजन सभागृहात नोडल ऑफीसर यांचे प्रशिक्षण पार पडले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, निवडणूक उपजिल्हाधिकारी गौरी सावंत, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

          डॉ. तुम्मोड म्हणाले, पदवीधर मतदारसंघासाठी मतपत्रिकेवर मतदान करण्यात येणार आहे. पसंतीक्रमानुसार हे मतदान होणार आहे. जिल्ह्यातील 52 मतदान केंद्रावर ही मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या मतपेट्या, मनुष्यबळ, वाहन व्यवस्था, मतदान केंद्राच्या ठिकाणी द्यावयाच्या सुविधा आदींबाबत निवडणूक विभागाने लक्ष पुरवावे. मतदान मतपत्रिकेद्वारे होणार असल्यामुळे मतपेटी हाताळण्याचे प्रशिक्षण प्रत्येकांना द्यावे.

          मतदानासाठी आवश्यक असणारे साहित्य मतदान केंद्रावर पोहोचविणे आणि त्यानंतर या मतपेट्या मतमोजणी केंद्रावर पोहोचविण्यासाठी लागणाऱ्या वाहनांची तातडीने मागणी नोंदवावी. मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी मदतीची सोय करण्यात यावी. तसेच कोरोनाच्या अनुषंगाने देण्यात येणाऱ्या निर्देशांचे पालन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.

000000


उद्योजकता विकास केंद्रातर्फे शेळी, कुक्कुट, पशूपालन प्रशिक्षण

बुलडाणा, दि. 9 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या जिल्हा उद्योग केंद्रातर्फे उद्योग व्यवसाय सुरु करु इच्छिणाऱ्या सुशिक्षीत बेरोजगार युवक, युवतींसाठी बुलडाणा येथे शेळीपालन, कुक्कुट आणि गाय, म्हैस पालन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हे प्रशिक्षण दि. 17 ते 21 जानेवारी 2023 या कालावधीत होणार आहे.

सदर प्रशिक्षण सुशिक्षित बेरोजगार युवकांनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वत:चा उद्योग, व्यवसाय सुरु करावा, यासाठी देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात शेळी, कुक्कुट आणि गाय, म्हैस पालनाचे तंत्र आणि प्रकार, त्यांच्या जाती, लसीकरण, संशोधन रोग आणि लक्षणे, निर्मिती व चाऱ्याचे प्रकार आणि उद्योग सुरु करण्यासाठी संपुर्ण सहकार्य करण्यात येणार आहे. त्यासोबतच उद्योजकता विकास, उद्योग संधी, मार्गदर्शन, शासकीय योजनांची माहिती प्रशिक्षणात तज्‍ज्ञ व्यक्ती करणार आहेत. प्रशिक्षणात प्रवेश घेऊ इच्छिणारा उमेदवार हा किमान पाचवी पास, वय 18 ते 50 वर्षे असावे. प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिल्या जाणार आहे. प्रशिक्षण नोंदणीसाठी दि. 17 जानेवारी 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रकल्प अधिकारी गणेश गुप्ता, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, दूरदर्शन केंद्रासमोर, मलकापूर रोड, बुलडाणा, मोबाईल नंबर 8275093201 / 9011578854 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय अधिकारी प्रदिप इंगळे यांनी केले आहे.

00000

अनुसूचित जातीच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टरचा पुरवठा

* प्रस्ताव सादर करण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

बुलडाणा, दि. 9 : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना 3 लाख 50 हजार रुपयांच्या मर्यादेत 9 ते 18 अश्‍वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची कल्टिवेटर, रोटॅव्हेटर, ट्रेलर ही उपसाधने पुरवठा करण्याची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी दि. 31 जानेवारी 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

सदर योजनेसाठी दि. 31 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. आता या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.  या योजनामध्ये वस्तू स्वरुपात मिळणाऱ्या लाभांचे हस्तांतरण रोख स्वरुपात लाभार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात जमा करण्याबाबत सुधारणा करण्यात आली आहे.

सदर योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना 3.50 लाख रूपयांच्या मर्यादेत 90 टक्के शासन अनुदान आणि 10 टक्के स्वयंसहाय्यता बचत गट हिस्सा याप्रमाणे 9 ते 18 अश्‍वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. लाभार्थी स्वयंसहाय्यता बचतगटांना अनुज्ञेय असणाऱ्या किमान 9 ते 18 अश्‍वशक्तीपेक्षा जास्त अश्‍वशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येतील. मात्र त्याची किंमत कमाल शासकीय अनुदानापेक्षा जास्त असल्यास कमाल अनुज्ञेय अनुदानाव्यतिरीक्त जादाची रक्कम बचत गटांनी स्वत: खर्च करावी लागणार आहे. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची कमाल किंमत 3.50 लाख रुपये राहिल. त्यामध्ये 90 टक्के म्हणजेच 3.15 लाख रुपये शासकीय अनुदान व स्वयंसहाय्यता बचतगटाचा हिस्सा 10 टक्के म्हणजे  35 हजार रूपये इतका असेल.

सदर योजनेंतर्गत लाभार्थी बचतगटाची निवड झाल्यानंतर बचतगटाने निर्धारीत केलेल्या प्रमाणकानुसार मान्यताप्राप्त उत्पादकांकडून मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने शासनाने निर्धारीत केलेल्या किंमतीपर्यंत खरेदी करावी लागणार आहे. स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी केल्याची पावती सादर केल्यानंतर व खातरजमा करुन लाभार्थी बचतगटाला शासकीय अनुदानाचा 50 टक्के हप्ता बचतगटाच्या आधार संलग्न खात्यावर जमा करण्यात येईल. उर्वरीत 50 टक्के अनुदान मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची आरटीओ कार्यालयाकडे नोंद झाल्यानंतर बचतगटांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल किंवा स्वयंसहाय्यता बचतगटाने मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची आरटीओ कार्यालयाकडे नोंद केल्याचे पुरावे सादर केल्यास 100 टक्के अनुदान स्वयंसहाय्यता बचतगटाच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

          शासनाच्या निर्णयानुसार 9 ते 18 अश्‍वशक्तीच्या मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची कमाल किंमत 3 लाख 50 हजार ठरविण्यात आली आहे. सदर रक्कमेपैकी अनुदानाची रक्कम कमाल किंमतीच्या 90 टक्के म्हणजेच 3 लाख 15 हजार रुपये राहि. भारत सरकारने निर्धारीत केल्यानुसार मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने ही फार्म मशिनरी, ट्रेनिंग आणि टेस्टींग इन्स्टिट्यट यांनी टेस्ट करुन जाहिर केलेल्या उत्पादकांच्या यादीतील परिमाणानुसार असाव.

या योजनेतील लाभार्थ्यांचे निकष ठरविण्यात आले आहे. यामध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सर्व सदस्य व अध्यक्ष हे राज्याचे रहिवासी असावेत. स्वयंसहाय्यता बचतगटातील किमान 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. स्वयंसहाय्यत बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा 3 लाख 50 हजार रुपये इतकी राहिल. स्वयंसहाय्यता बचतगटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनांच्या किंमतीच्या 10 टक्के स्व हिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किंमतीच्या 90 टक्के शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.

लाभार्थी स्वयंसहाय्यता बचतगटांनी या योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या किमान 9 ते 18 अश्‍वशक्तीपेक्षा जादा अश्‍वशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येईल. मात्र त्याची या योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अनुदानापेक्षा जास्तीची रक्कम संबंधित बचतगटाने स्वत: खर्च करावी लागणार आहे.

यासाठी इच्छुक अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयंसहाय्यता बचतगटांनी विहित नमुन्यातील अर्ज दि. 31 जानेवारी 2023 पर्यंत सादर करावे. अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, त्रिशरण चौक, बुलडाणा येथे सादर करावेत. सोबत बचतगट नोंदणीबाबत सक्षम अधिकाऱ्यांचे नोंदणी प्रमाणपत्राची साक्षांकीत प्रत, बचतगटामधील मुळ सदस्यांची यादी, घटना व नियमावली प्रत, बचतगटातील सर्व सदस्यांचे सक्षम अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, तसेच सक्षम अधिकारी यांनी दिलेले अधिवास प्रमाणपत्र जोडावी लागणार आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

00000

बांधकाम कामगारांनी खोट्या आमिषाला बळी पडू नये

*कामगार विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 9 : बांधकाम कामगारांनी इतर कोणत्याही खोट्या आमिषाला बळी न पडता नोंदणी आणि नुतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी यांनी केले आहे.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या असंघटीत कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व विविध योजना लाभ वाटपाचे काम सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातर्फे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे. यासाठी कोणत्याही खासगी प्रतिनिधी, एजंट, दलाल यांची नेमणूक करण्यात आलेली नाही. या संबंधित कामगारांना अर्ज नोंदणीसाठी वार्षिक एक रूपया शुल्क आकारण्यात येते. त्याची रीतसर पावती देण्यात येते. या व्यतिरिक्त या कार्यालयाकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. याबाबतीत आपली फसवणूक झाल्यास कामगार कार्यालयाची जबाबदारी राहणार नाही.  तसेच अतिरिक्त रक्कम मागणाऱ्या व्यक्तीविरूद्ध नजिकच्या पोलिस ठाण्यात परस्पर तक्रार नोंदवावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी आ. शि. राठोड यांनी केले आहे.

00000


No comments:

Post a Comment