Friday 6 January 2023

DIO BULDANA NEWS 06.01.2023

 

पदवीधर मतदारसंघाच्या मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा

बुलडाणा, दि. 6 : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दि. 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार आहे. यासाठी मतदारांना विशेष नैमित्तिक रजा देण्यात येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने दि. २९ डिसेंबर २०२२ च्या प्रसिध्दी पत्रकानुसार विधानपरिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. सदर निवडणुकीसाठी सोमवार, दि. ३० जानेवारी २०२३ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तसेच गुरुवार, दि. २ फेब्रुवारी २०२३ रोजी मतमोजणी होणार आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर मतदारांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मतदानाच्या दिवसाची विशेष नैमित्तीक रजा देणे आवश्यक आहे. सदरची रजा ही कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असणार आहे, त्यानुसार सामान्य प्रशासन विभाग विभागाच्या शासन निर्णयानुसार मतदारांना मतदानाच्या दिवसाची विशेष नैमित्तिक रजा मंजूर करावी. असे  आवाहन जिल्हाधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी केले आहे.

000000

व्यवसाय सुलभीकरणाबाबत बुधवारी कार्यशाळा

बुलडाणा, दि. 6 : उद्योग संचालनालयामार्फत महाराष्ट्र राज्यात गुंतवणुक वृद्धी व्यवसाय सुलभीकरण व उद्योग व्यवसायासाठी अनुकुल वातावरण निर्मिती व्हावी, यासाठी उद्योग विभागातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बुधवार, दि. ११ जानेवारी २०२३ सकाळी ११ वाजता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यशाळेत व्यापारी समुदायामध्ये जागरुकता निर्माण करण्यात येणार आहे. राज्याच्या लागू करण्यात आलेल्या विविध सुधारणा, तसेच आयटीस्तर आणि नियामक स्तरावर करता येणाऱ्या विविध सुधारणाबाबत वापरकर्त्यांकडून अभिप्राय घ्यावयाचे आहेत. यासाठी मुंबई येथील सल्लागारांची टीम ईओडीबी आणि मैत्री कक्षातर्फे व्यवसाय सुलभीकरण सुधारणाबाबत सादरीकरण करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात येणार आहे.

या कार्यशाळेस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनिल पाटील यांनी केले आहे.

00000



तंबाखू मुक्तीसाठी कायद्याच्या अंमलबजावणी सोबत जनजागृती महत्वाची

-जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड

बुलडाणा, दि. 6 : तंबाखू मुक्तीसाठी कायद्याच्या अंमलबजावणी सोबत जनजागृती महत्वाची आहे. यासाठी जिल्हास्तरीय अंबलबजावणी पथकांनी कार्यवाही करावी, तंबाखूमुक्त जिल्हा होण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा, वार्षिक स्नेहसंमेलनात तंबाखू सेवन व तंबाखूमुक्तीवर विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती करावी, तसेच परिवहन मंडळाच्या बसेसवर तंबाखूसंबंधित घोषणा सुरु कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची त्रैमासिक बैठक जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांच्या अध्यक्षतेत पार पडली. जिल्हा स्तरीय समन्वय समिती व जिल्हास्तरीय अमंलबजावणी पथकाच्या आढावा बैठकीला

डॉ. यास्मीन चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राठोड, गुन्हे शाखेचे श्री. वानखेडे, अन्न व सुरक्षा अधिकारी श्री. सोळंके, शिक्षण विभागाचे श्री. अकाळ, श्रीमती राठोड,  जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री. टाले, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. खिरोडकर, सलाम मुंबई फाउंडेशन महेंद्र सौभागे, ब्रम्हकुमारी संचालक उर्मिला दीदी, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा सल्लागार डॉ. लता भोसले, समुपदेशक लक्ष्मण सरकटे, सामाजिक कार्यकर्ता अर्चना आराख, तनवीर पठाण उपस्थित होते.

जिल्हा अंबलबजावणी पथकाने गेल्या तीन महिन्याच्या काळात तंबाखू प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत पानटपरीधारक व नागरिकांवर कारवाई करून १४ हजार ९७० रुपये वसुली केली आहे. तसेच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत संपूर्ण जिल्हाभरात दंतरोग तपासणी, क्षयरोग तपासणी, एड्स रुग्ण, रक्तदाब, मधुमेह रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक यांना तंबाखू सेवन व धुम्रपान याबाबत समुपदेशन करण्यात येत आहे. माता सुरक्षित तर घर सुरक्षित या मोहिमेंतर्गत गर्भवती माता व इतर रुग्ण यांची मुखतपासणी करून तंबाखू सेवनाबाबतचे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन करण्यात आले. यात दोन हजार ७८२ रुग्णांची तपासणी करून समुपदेशन करण्यात आले. प्रभावी जाणीव जागृतीसाठी विविध ठिकाणी आरोग्य कॅम्प, व्यसन मुक्तीदूत, आयर्नमॅन नितीन घोरपडे यांनी उपस्थित धावपटू विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ दिली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

000000



जिल्हा माहिती कार्यालयात

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

      बुलडाणा, दि. 6 : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना आज जिल्हा माहिती कार्यालयात अभिवादन करण्यात आले. जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

          आचार्य जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी मराठी भाषेतील पहिले दर्पण नावाचे नियतकालीक सुरू केले. त्यानिमित्ताने दर्पण दिन दरवर्षी साजरा करण्यात येतो. यावेळी रविकिरण टाकळकर, निनाजी भगत, प्रेमनाथ जाधव, प्रमोद राठोड, राम पाटील यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

00000

No comments:

Post a Comment