Monday 23 January 2023

DIO BULDANA NEWS 23.1.2023

 


नेताजी सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांना

जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

बुलडाणा, दि. 23 : जिल्हाधिकारी कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी अधीक्षक शामला खोत, नाझर संजय बनगाळे, गजानन मोतेकर यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही नेताजी सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पूष्प वाहून अभिवादन केले.

00000

कुष्ठरोग निर्मुलनाच्या स्पर्श जनजागृती अभियानात सहभागी व्हावे

-जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड

बुलडाणा, दि. 23 : कुष्ठरोग निर्मुलनासाठी स्पर्श जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यात जाणिव जागृतीसाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी केले आहे.

स्पर्श जनजागृती अभियानातील विविध कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी होवून कुष्ठरोगाबाबतची शास्त्रीय माहिती समजावून घ्यावी, समाजात कुष्ठरोगाविषयी असणारे गैरसमज दूर होवून कुष्ठरोगासोबतचा भेदभाव मिटवून त्यांना सन्मानाने जगता येईल. कुष्ठरोग हा आजार अनुवंशिक नसून तो पुर्व जन्माचा पापाने होत नाही, तर मायकोबॅक्टेरियम लेप्रि या कुष्ठजंतूमुळे होणारा इतर आजाराप्रमाणे एक आजार आहे. यात त्वचा आणि नसावर परिणाम होत असतो. हा आजार लवकर निदान आणि उपचार केल्याने पुर्णत: बरा होतो.

औषधोपचार जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये मोफत उपलब्ध आहे. मात्र नियमित औषधोपचार घेतला नसल्याने किंवा उपचाराबद्दलच्या सुचनांचे पालन केले नसल्याने कुष्ठरुग्णांमध्ये विकृती  येवू शकते. ही विकृती दृष्य स्वरुपाची असली, तर मात्र त्या रुग्णांबाबत घृणा तयार होवून समाजात त्याच्याशी भेदभाव केला जावू शकतो. कुष्ठरोगाबाबत असलेले अज्ञान गैरसमज या गोष्टी जबाबदार असून समाजात त्याबद्दल जनजागृती आवश्यक आहे. केंद्र शासनाने स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान 2023 चे आयोजन केले आहे.

ही मोहिम जिल्ह्यात दि. 30 जानेवारी 2023 ते दि. 13 फेब्रुवारी 2023 पर्यंत राबविण्यात येणार आहे. दि. 26 जानेवारी 2023 रोजी जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये कुष्ठरोग विषयक शपथ देण्यात येणार आहे. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी रोजी दि. 30 जानेवारी 2023 रोजी कुष्ठरोग निवारण दिन साजरा करण्यात येणार आहे. या पंधरवाड्यात नुक्कड नाटक, शालेय प्रश्नमंजूषा, रोगमुक्त कुष्ठरुग्णांचे मनोगत, खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांची कार्यशाळा, कुष्ठरोगबाधीत व्यक्तींचे अनुभव आदी कार्यक्रमासोबत ग्रामसभेमध्ये जिल्हाधिकारी यांचे घोषणा पत्र, ग्रामसभा प्रमुख यांचे भाषण आणि कुष्ठरोगाविरोधी प्रतिज्ञा, तसेच कुष्ठरोगविषयक संदेश देण्यात येणार आहे.

000000

कोरोना पार्श्वभूमीवर प्रयोगात्मक क्षेत्रातील कलावंतांना अर्थसहाय्य

*31 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 23 : कोरोना पार्श्वभूमीवर प्रयोगात्मक कलेवर अवलंबून असलेल्या कलाकार किंवा संस्थांना अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. प्रयोगात्मक क्षेत्रातील एकल कलावंतांनी एकल कलाकारासाठी असलेले अर्ज दि. 31 जानेवारी 2023 पर्यंत संबंधित तालुक्यातील तहसिलदारामार्फत अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.

पात्र लाभार्थ्यांना हे अर्थसहाय्य एकरकमी एकदाच देण्यात येणार आहे. यासाठी अर्जदारानी लाभार्थी कलाकाराचे नाव, पत्ता, जन्म दिनांक, संपर्क क्रमांक, राज्यातील वास्तव्य, आधार कार्ड, लाभार्थी कलाकाराचा बँक खात्याचा तपशील आणि खाते क्रमांक, कलेच्या क्षेत्राचा अनुभव, लाभार्थी कलाकाराचे वार्षिक उत्पन्न ही माहिती देणे आवश्यक आहे. अर्जासोबत विहित नमुन्यात अर्ज, महाराष्ट्रात 15 वर्षे वास्तव्याचा रहिवासी दाखला, तहसिलदाराकडून प्राप्त उत्पन्नाचा दाखला, कलेच्या क्षेत्रात 15 वर्षे कार्यरत असल्याबाबतचे पुरावे, आधार कार्ड आणि बँक खात्याचा तपशिल, शिधापत्रिका सत्यप्रत पात्रता आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

योजनेच्या लाभासाठी महाराष्ट्र राज्यातील प्रयोगात्मक कलेतील केवळ गुजराण असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कलाकार, महाराष्ट्र राज्यात 15 वर्षे वास्तव्य, कलेच्या क्षेत्रात 15 वर्षे कार्यरत, वार्षिक उत्पन्न 50 हजार रुपयांच्या कमाल मर्यादेत असावे, केंद्र शासन, राज्य शासनाच्या वृद्ध कलाकार मानधन योजनेतून मानधन घेणारे लाभार्थी कलाकार, तसेच इतर वैयक्तिक शासकीय अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असणार नाही.

000000

No comments:

Post a Comment