Wednesday 11 January 2023

DIO BULDANA NEWS 11.01.2023

 





रस्ते अपघातात मृत्यू अधिक असल्याने जनजागृती करावी

-डॉ. एच. पी. तुम्मोड

बुलडाणा, दि. 11 : इतर कारणामुळे मृत्यूपेक्षा रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यातही दुचाकीस्वारांचा यात मृत्यू अधिक आहे. प्रामुख्याने हेल्मेट घातलेले नसल्यामुळे मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याने याबाबत व्यापक जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी केले.

आज रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रस्ता सुरक्षा कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक सारंग आवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष राऊत, जिल्हा कोषागार अधिकारी ऋषीकेश वाघमारे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे उपस्थित होते.

डॉ. तुम्मोड म्हणाले, देशाच्या संरक्षणासाठी असलेल्या सैनिकांपेक्षा रस्ते अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. प्रामुख्याने युवा वर्गात वेगाने वाहन चालविण्यासोबत विनाहेल्मेट आणि निष्काळजीपणे वाहन चालविल्यामुळे मृत्यू होत आहे. येत्या काळात आपल्या राज्यातील रस्ते चांगले होत असले तरी त्यावर कोणत्या वेगाने वाहन चालविले पाहिजे, याचे भान राखणे गरजेचे आहे. वाहन चालविताना अपघात झाल्यास स्वत:सोबत समोरच्या व्यक्तीचेही नुकसान होते. त्यामुळे वाहन चालविण्याचा परवाना देताना वाहनचालविण्यात निपून असणाऱ्यांनाच परवाना देण्यात यावा. वाहन चालविताना हेल्मेट सक्ती करावी. यामुळे अपघात झाला तरी मृत्यूचे प्रमाण कमी होईल.

श्री. आवाड यांनी, रस्ते सुरक्षा अभियानामुळे जनजागृती होण्यास मदत होणार आहे. अपघाताच्या प्रमाणात घट होत असली तरी यात मृत्यूमुखी पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रामुख्याने दुचाकीच्या अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या चिंताजनक आहे. अपघातानंतर वैद्यकीय सुविधा मिळाली नसल्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रामुख्याने हेल्मेटस्क्तीसोबत वाहन चालविताना घ्यावयाच्या काळजीबाबत जनजागृती करावी, असे आवाहन केले.

सुरवातील जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी रस्ते सुरक्षा अभियानाबाबत वाहनांवर स्टिकर लावलेत. त्यानंतर सिम्युलेटर कक्षाचे उद्घाटन केले. कार्यक्रमात परिचारिका, पत्रकार, वृत्तपत्र विक्रेता यांना हेल्मेटचे वितरण करण्यात आले. यावेळी मोटार वाहन निरीक्षक रितेश चौधरी यांनी रस्ते सुरक्षेची शपथ दिली. रस्ते सुरक्षेची जनजागृती रॅलीला जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी हिरवी झेंडी दाखविली.

श्री. गाजरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अनिल रिंढे यांनी सूत्रसंचालन केले. सुरज कोल्हे यांनी आभार मानले.

00000

राष्ट्रमाता मॉ जिजाऊसाहेब जयंतीनिमित्त आज स्थानिक सुट्टी

बुलडाणा, दि. 11 : जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी राष्ट्रमाता मॉ जिजाऊसाहेब जयंतीनिमित्त गुरूवार, दि. 12 जानेवारी 2023 रोजी स्थानिक सुट्टी जाहिर केली आहे.

जिल्हाधिकारी यांना असलेल्या अधिकारानुसार जिल्ह्यासाठी सन 2023 या वर्षासाठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहिर केल्या आहेत. यात राष्ट्रमाता मॉ जिजाऊसाहेब जयंती, तसेच बुधवार, दि. 30 ऑगस्ट 2023 रोजी नारळी पौर्णिमा, शुक्रवार, दि. 22 सप्टेंबर 2023 रोजी ज्येष्ठ गौरी पूजन निमित्त सुट्टी राहिल. सदर सुट्टीचा आदेश जिल्ह्यातील दिवाणी, फौजदारी न्यायालये व अधिकोष यांना लागू होणार नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

00000

एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलच्या

प्रवेश परिक्षेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

*30 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

बुलडाणा, दि. 11 : इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल पब्लिक स्कुलमध्ये प्रवेशासाठी दि. 26 फेब्रुवारी 2023 रोजी प्रवेश परिक्षा आयोजित करण्यात आली आहे. या प्रवेश परिक्षेसाठी दि. 30 जानेवारी, 2023 पर्यत अर्ज प्रकल्प कार्यालयाकडे मुख्याध्यापकांमार्फत सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

अकोला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील अकोला, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच सर्व शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये पाचवी, सहावी, सातवी आणि आठवीमध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जमातीचे विद्यार्थी सदर स्पर्धा परिक्षेसाठी पात्र आहेत.

सर्व मुख्याध्यापकांनी प्रवेश परीक्षेचे आवेदन पात्र विद्यार्थ्याकडुन भरुन घेऊन, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला कार्यालयाकडे सादर करावेत. विहित नमुन्यातील अर्ज शासकीय, अनुदानित आश्रम शाळेतील मुख्याध्यापक किंवा प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्याकडे विनामुल्य उपलब्ध आहेत.

आवेदन पत्रासोबत सक्षम अधिकाऱ्यांच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला, पालक, विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला आवेदन पत्रासोबत जोडावा. सदर परीक्षा दि. 26 फेब्रुवारी, 2023 रोजी सहावीकरिता सकाळी 11 ते 13 या वेळेत आणि सातवी ते नववी करिता सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत होणार आहे. ही परिक्षा शासकीय आश्रमशाळा, कोथळी, ता. बार्शिटाकळी, जि. अकोला, शासकीय आश्रमशाळा, घाटबोरी, ता. मेहकर, जि. बुलडाणा येथे होणार आहे असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी राजेद्रकुमार हिवाळे यांनी कळविले आहे.

                                     

000000

No comments:

Post a Comment