Tuesday 10 January 2023

DIO BULDANA NEWS 10.01.2023

 पैनगंगा नदी स्वच्छता मोहिमेला शनिवारपासून सुरूवात

*कोलवड येथे 300 जणांचे श्रमदान

बुलडाणा, दि. 10 : चला जाणूया नदीला या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात उगम झालेल्या पैनगंगा नदी स्वच्छता मोहिमेला शनिवार, दि. 14 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. यात पहिल्या फेरीत जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, मेहकर या तीन तालुक्यातील अधिकारी कर्मचारी यांच्या सहभागातून नदी स्वच्छ करण्याची मोहीम कोलवड येथून सुरू करण्यात येईल.

या उपक्रमाच्या नियोजनाबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, समन्वयक नंदकुमार देशमुख यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

चला जाणूया नदीला उपक्रमातून जिल्ह्यातील पैनगंगा नदीचे 84 किलोमीटरचे पात्र स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. नदीच्या प्रकृतीबद्दल जाणीव जागृती निर्माण करून लोकसहभागागतून नदी स्वच्छता करण्यात येणार आहे. या जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पैनगंगा ही नदी महत्वाची असून या उपक्रमांत जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य करण्यात येणार आहे.

नदीपात्रात घाण पाणी येऊ नये म्हणून पाणलोट क्षेत्रात शाश्वत कामे करण्यात येणार आहे. तसेच नदीचे पाणी दुषित करणाऱ्या घटकांचीही विल्हेवाट लावण्यात येणार आहे. नदीपात्रात असणारे निर्माल्य, जलपर्णी, झाडेझुडपे काढून स्वच्छ करण्यात येणार आहे. तसेच आवश्यकता असेल त्या ठिकाणी जेसीबीच्या सहायाने स्वच्छतेची कामे करण्यात येतील. कचऱ्याचे निर्मुलन करून स्थानिकांच्या मदतीने सुशोभिकरणाचे काम करण्यात येतील. पैनगंगा नदीची स्वच्छता ही नेहमीसाठी सुरू राहणार आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यात नोडल अधिकारी नेमण्यात येणार आहे. नदी स्वच्छ करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमात जिल्हा अव्वल यावा, यादृष्टीकोनातून कामे करण्यात येणार आहे.

नदी स्वच्छतेबरोबर याठिकाणी पर्यटनाची सुविधाही विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना याचा लाभ होईल. नदीचे महत्व पटवून देण्यासाठी आठवीपासूनच्या विद्यार्थ्यांना उपक्रमात सहभागी करून घेण्यात येणार आहे. श्रमदान करताना याठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी नियोजन करण्यात यावे. तसेच श्रमदानाच्या ठिकाणी प्राथमिक उपचार करण्यासाठी वैद्यकीय पथक नेमण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी केले.

000000

मकर  संक्रांती-भोगी सण पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा करणार

          बुलडाणा, दि. 10 : संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२३ वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. सर्वसामान्य नागरिकांना पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व आणि फायदे पटवून देण्यासाठी कृषि विभागामार्फत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. त्यानुसार मकरसंक्रांती भोगी सण दरवर्षी राज्यात पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

विविध कार्यक्रमांसोबतच तृणधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन आणि उत्पादकता वाढीसाठी कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. प्रत्येक कृषि सहाय्यक आपल्याकडील गावामध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर आधारित चर्चासत्राचे आयोजन, तृणधान्य पिकांच्या विविध जाती, त्यांचे लागवड तंत्रज्ञान, तृणधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा, मुलाखती, तृणधान्य पिकापासून बनवण्यात येणारे विविध उपपदार्थ यांची माहिती देण्यात येतील. प्रगतीशील शेतकरी, आहार तज्‍ज्ञ, विद्यापीठाचे शास्त्रज्ञांना निमंत्रित करण्यात येणार आहे.

मकर संक्रांती भोगी हा दिवस पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून उत्साहाने साजरा करावा, असे आवाहन कृषि विभागाचे विस्तार व प्रशिक्षण संचालक विकास पाटील यांनी केले आहे.

00000

गटई कामगारांनी स्टॉलसाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 10 : जिल्ह्यातील अनुसुचित जातीच्या गटई कामगारांनी पत्र्याचे स्टॉल मिळण्यासाठी सन 2022-23 या वर्षाकरीता अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पात्र लाभार्थ्यानी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता दि. 13 जानेवारी 2023 पर्यंत सादर करता येईल.

अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्जावर पासपोर्ट फोटो चिकटविलेला व परिपूर्ण अर्ज सादर करावा, अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आणि अनुसुचित जातीचा असावा, अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी 40 हजार रूपये आणि शहरी भागासाठी 50 हजार रूपयांपेक्षा अधिक नसावे. यासाठी तहसिलदाराने निर्गमित केलेला उत्पनाचा दाखला आवश्यक राहणार आहे. अर्जदार वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे.

अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत असेल, ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, छावनी बोर्ड (कॅटॉनर्मेन्ट बोर्ड) किंवा महानगरपालिका यांनी त्यास भाड्याने, करारनाम्याने, खरेदीने अगर मोफत परंतू अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असावी किंवा ती त्याच्या स्व:मालकीची असावी इत्यादीपैकी एक प्रकारचे कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

अर्जदाराचा स्वत:चा प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे. शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्डची प्रत, आधार कार्डची प्रत, रहिवाशी दाखला इत्यादी स्वसाक्षांकित प्रती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

या व्यवसाय योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या गरजू अर्जदारांनी विहित नमुना अर्ज विनामुल्य प्राप्त करुन घ्यावा. त्यासह आवश्यक कागदपत्रे, अर्जासोबत जोडून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलडाणा येथे दि. 13 जानेवारी 2023 पर्यंत सादर करावेत. उशीरा आलेल्या अर्जाचा विचार केल्या जाणार नाही. अर्जदारांनी आवश्यक त्या कागपत्रासह परिपूर्ण अर्ज सादर करावेत, तसेच अर्जदारास अर्जातील त्रृटी पुर्तताबाबत या कार्यालयातून व्यक्तिगतरित्या कळविल्या जाणार नाही. अपुर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्‍यावी, असे समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी कळविले आहे.

00000

मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत

*समाज कल्याण विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 10 : मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षात विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत अर्ज करण्याची गती कमी असल्याने योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नोंदणीकृत करावे, असे आवाहन समाज कल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात महाडीबीटी प्रणालीवर भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परीक्षा फी प्रदाने, राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यवसाय पाठ्यक्रमाचे संलग्न असलेल्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना राबविण्यात येत आहे.

योजनांच्या लाभासाठी अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणाली व सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्ष, नूतनीकरणाचे अर्ज नोंदणीकृत करण्यासाठी दि. 21 सप्टेंबर 2022 पासून महाडीबीटी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. मात्र अद्यापही अर्ज करण्याची गती समाधानकारक नाही. त्यामुळे जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्ष व नूतनीकरणास प्रवेशित असलेल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज नोंदणीकृत करावे.

सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाच्या महाडीबीटी पोर्टलवरील डॅशबोर्डवर अनुसूचित जाती प्रवर्गाचे एकूण 7 हजार 119, इतर मागास प्रवर्ग, विजाभज व विमाप्र प्रवर्गाचे 17 हजार 730 अर्ज भरण्यात आले आहे. संपूर्ण सत्रातील सरासरीच्या तुलनेत भरलेल्या अर्जांचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कनिष्ठ, वरिष्ठ आणि व्यावसायिक महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी महाविद्यालयात प्रवेशित, तसेच योजनेस पात्र असलेल्या अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज महाडीबीटी संकेतस्थळावर भरून घेण्याची कार्यवाही करावी. अर्ज भरण्याबाबत कार्यशाळा घेऊन याची सूचना सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात यावी. यात पात्र मागासवर्गीय विद्यार्थी महाडीबीटी प्रणालीवर आवेदनपत्र भरण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्राचार्यांनी घ्यावी. असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

00000

ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण

बुलडाणा, दि. 10 : जिल्ह्याला ध्वजदिन 2021च्या निधी संकलनासाठी दिलेले उद्दिष्ट 100 टक्के निधी संकलन करून पूर्ण करण्यात आले. जिल्ह्याला 53 लाख 38 हजार रूपयांच्या निधी संकलनाचे उद्दिष्ट देण्यात आले होते.

देशात 7 डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वजदिन म्हणून पाळला जातो. या दिवशी सशस्त्र सेनेचा ध्वज लावून सेनादलासाठी कार्य करणाऱ्यांच्या दृढ ऐक्याला नागरिक बळकटी लावतात. सशस्त्र सेना ध्वज निधीस समाज हातभार लावू आजी, माजी सैनिकांच्या प्रति ज्यांनी देशासाठी आपले जीवन अर्पिले त्यांच्या प्रति नागरिक कृतज्ञता व्यक्त करतात.

जिल्ह्याला ध्वजदिनाचे 53 लाख 38 हजार रूपयांच्या निधी संकलनाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांच्या नियोजन आणि प्रयत्नामुळे 100 टक्के निधी संकलित झाला आहे. निधी संकलन करून युद्धविधवा, माजी सैनिकांच्या कल्याणविषयक कार्यात मोलाचे सहकार्य केले आहे. दिलेल्या इष्टांकापेक्षा जास्त निधी गोळा केल्याबद्दल सैनिक कल्याण विभागाचे संचालक राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड,  तसेच जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.

सीमांच्या रक्षणासाठी आणि देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी ज्यांनी आपले जीवन अर्पिले आहेत, अशा कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी सशस्त्र सेना ध्वज दिन निधीस सढळ हाताने मदत करून या राष्ट्रकार्यास हातभार लावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी केले आहे.

000000

आस्थापनांनी त्रैमासिक विवरणपत्र सादर करावेत

*31 जानेवारी 2023 पर्यंत अंतिम मुदत

बुलडाणा, दि. 10 : शासकीय, निमशासकीय कार्यालये, खासगी, औद्योगिक आस्थापना, अनुदानित, विना अनुदानीत शाळा, महाविद्यालये यांना कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर त्रैमासिक विवरणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे दि. 31 जानेवारी 2023 पर्यंत ईआर 1 विवरणपत्र सादर करावे लागणार आहे.

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाने विकसित केलेल्या mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर रोजगारविषयक सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नोंदणीकृत सर्व उद्योजक, आस्थापना यांनी सेवायोजन कार्यालये यांना रिक्तपदे अधिसूचित करणे सक्तीचे कायदा 1959 नुसार सादर करावयाची आहे.

माहे डिसेंबर 2022 अखेरचे त्रैमासिक ईआर-1 विवरणपत्र संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करून त्याबाबतचे ऑनलाईन प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. सदर विवरणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत दि. 31 जानेवारी 2023 आहे.

सर्व आस्थापना, उद्योजकांनी विहित मुदतीत विवरणपत्र ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर सादर करावे, ऑनलाइन ईआर-1 विवरणपत्र सादर करण्यात अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

00000




पौष्टिक तृणधान्य पाककृती स्पर्धा, पथनाट्य उत्साहात

बुलडाणा, दि. 10 : कृषी विभागाच्या वार्षिक क्रीडा दि. 6 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान क्रीडा संकुलात पार पडल्या. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३बाबत जनजागृती करण्यात आली. यात महिलांसाठी पौष्टिक तृणधान्य पाककृती स्पर्धा, पौष्टिक तृणधान्य पथनाट्याद्वारे जनजागृती, पौष्टिक तृणधान्य सेल्फी पॉईंट व पौष्टिक तृणधान्य रांगोळी, हळदी कुंकू व फनी गेम आदी कार्यक्रम घेण्यात आले.

विभागीय कृषि सहसंचालक किसन मुळे आणि जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संतोष डाबरे यांच्या हस्ते पौष्टिक तृणधान्य पाककृती स्पर्धा, पौष्टिक तृणधान्य सेल्फी पॉईंटचे उद्घाटन करण्यात आले. पाककृती स्पर्धेत महिला अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग घेतला. स्पर्धेकरिता दिलीप जाधव, विवेक गिऱ्हे, विशाल बारोठे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. चिखली येथील कृषि सहाय्यक अर्चना खेडकर यांव्सर ज्वारीची पुरी, बाजरी खजुरासाठी प्रथम, मलकापूर येथील कृषि सहाय्यक शीतल तायडे यांच्या बाजरी भाकरी व भरीतसाठी द्वितीय आणि मोताळा येथील कृषि पर्यवेक्षक अर्चना जोशी यांच्या ज्वारी बिबड्या, उपवासाचे भगर पापडसाठी तृतीय क्रमांक देण्यात आला.

कार्यक्रमात आहारात पौष्टिक तृणधान्य उपयोगात आणण्याची शपथ दिली. यासाठी तंत्र अधिकारी अनंता झोडे, संजीवनी कणखर यांनी पुढाकार घेतला. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या जनजागृतीसाठी पथनाट्य सादर करून क्रीडा महोत्सवास सुरुवात करण्यात आली. यात कृषि सहाय्यक नितीन भंडारे, प्रियंका गवई, वरिष्ठ लिपिक गजानन पडोळ यांनी पथनाट्य सादर केले. पथनाट्यातून पौष्टिक तृनधान्याचे विविध पदार्थ, आहारातील महत्व विषद करण्यात आले.

00000

No comments:

Post a Comment