Tuesday 23 August 2022

DIO BULDANA NEWS 23.08.2022

 

पीएम किसानच्या लाभासाठी केवायसी करावी

*कृषि विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 23 : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेचा बारावा हप्ता सप्टेंबर महिन्यात देय आहे. यासाठी शेतकऱ्यांनी दि. 31 ऑगस्ट 2022 पर्यंत बँक खात्याची केवायसी करावी, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

शेतकरी कुटुंबाला प्रतीवर्षी सहा हजार रुपये आर्थिक सहाय्य तीन टप्प्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या योजनेचे आतापर्यंत अकरा हप्ते शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले आहे. तसेच बारावा हप्ता सप्टेबर २०२२ मध्ये वितरीत करण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये ३ लाख ९१ हजार ५१० आधार प्रमाणिकरण झालेले पात्र लाभार्थी असुन यातील २ लाख  ४९ हजार १६ लाभार्थ्यांच ई-केवायसी झाले आहे. उर्वरित १ लाख ४२ हजार ४९४ केवायसी बाकी आहे. पात्र लाभार्थ्यांनी दि. ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत केवायसी पुर्ण करावी. केवायसी पुर्ण केले नसलेल्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा पुढील हप्ता देय होणार नाही.

केवायसी ही आधार प्रमाणिकरण झालेल्या रजिस्टर मोबाईल नंबर वरुन करता येईल. तसेच सीएससी सेंटर, ई-महासेवा केंद्र येथूनही आधार प्रमाणिकरण करण्यात येईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सं. ग. डाबरे यांनी कळविले आहे.

000000

महारेन प्रणालीवर दैनंदिन पावसाचा अहवाल

*पावसाची आकडेवारी सर्वांसाठी उपलब्ध

बुलडाणा, दि. 23 : राज्यात महावेध प्रकल्पाची सार्वजनिक खाजगी भागीदारीतून बांधा-मालक व्हा-चालवा तत्वावर महारेन प्रणाली अंमलात आणली गेली आहे. या प्रणालीवर पावसाचा दैनंदिन आणि प्रागतिक अहवाल पहावयास मिळणार आहे. या प्रकल्पाच्‍या अंमलबजावणीसाठी स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेट यांची सेवा पुरवठादार संस्था म्हणून नियुक्ती केली आहे.  प्रकल्पातंर्गत प्रत्येक महसूल मंडळस्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.

पर्जन्यमानाच्या आकडेवारीसाठी महारेन आणि महावेध या दोन स्वतंत्र प्रणाली कार्यान्वित ठेवण्याऐवजी महावेध प्रणालीमधील पर्जन्यविषयक आकडेवारी महारेन संकेतस्थळावर प्रकाशित केली जाते. महावेध प्रकल्पातील पर्जन्यमानाची आकडेवारी दररोज लिंकद्वारे महारेन संकेतस्थळावर प्रकाशित होते.

महावेध ही प्रणाली स्कायमेट वेदर सर्व्हिसेसने विकसित केली आहे. त्यामधील एक वर्षापूर्वीची हवामानविषयक आकडेवारी सर्वांसाठी उपलब्ध आहे. तर महारेन ही प्रणाली सार्वजनिक संकेतस्थळावर maharain.maharashtra.gov.in असून त्यावर दैनंदिन व प्रागतिक  पर्जन्यमानाची आकडेवारी सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात येते.

महारेन प्रणालीच्या अत्यावश्यक तांत्रिक देखभालीसाठी दि. ६ जुलै २०२२ पासून सदरचे संकेतस्थळ दुरूस्तीसाठी बंद ठेवण्यात आले. शेतकऱ्यांना दैनंदिन पर्जन्यमान पाहण्याकरीता थेट महावेध संकेतस्थळाच्या लिंकद्वारे महारेन संकेतस्थळावर दैंनदिन आणि प्रागतिक पर्जन्यमानाची आकडेवारी प्रकाशित करून उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे संकेतस्थळ दुरूस्तीसाठी बंद असतानाही दैनंदिन पर्जन्यमानाची आकडेवारी उपलब्ध करून देण्यात आली.

सद्यस्थितीत महारेन प्रणालीमध्ये तांत्रिक सुधारणा पूर्ण करण्यात येवून पर्जन्यमानाचे महसूल मंडळनिहाय दैनंदिन आणि प्रागतिक अद्यावत अहवाल दि.२२ ऑगस्ट २०२२ पासून  प्रकाशित करण्यात येत आहे.

00000

औरंगाबाद मनपा स्मार्ट सिटी योजनेत माजी सैनिकांसाठी पद भरती

बुलडाणा, दि. 23 : औरंगाबाद मनपा स्मार्ट सिटी योजनेत माजी सैनिकांसाठी पद भरती करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

औरंगाबाद स्मार्ट सिटीमध्ये जड वाहन वाहतूक परवानाधारक अनुभवी २० माजी सैनिक कंत्राटी ड्रायव्हर कम कंडक्टरची प्राथमिक निवड चाचणी घेणार आहे. ही निवड प्रक्रिया दि. २५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नंदनवन कॉलनी, औरंगाबाद येथे राबविली जाणार आहे.

पात्रताधारक माजी सैनिक उमेदवारांनी सदर वेळेस डिस्चार्ज बुकची कॉपी, आर्मी व सिविल हेवी व्हेईकल ड्रायव्हिंग लायसन्स, आर्मी गुंजूएशन सटीफीकेट या आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, लागणार आहे. तसेच पात्रता ट्रेड : सैन्य दलातील ट्रेड DSV(Spl Veh)/AM-50/Dvr/Dvr (MT)/DMT/Dvr, Gnr/Dvr(AFT) यापैकी असावा. शैक्षणिक अर्हता दहावी किंवा बारावी पास आणि आर्मी ग्रॅज्युएट, वैध प्रवासी बस वाहतूक परवाना PSV BUS (TRV- PSV-Bus) धारकास प्राधान्य देण्यात येणार आहे.

निवडक उमेदवारांनी MV Act नुसार कंडक्टर बॅच (बिल्ला) निवडी, नियुक्तीच्या तारखेपासून एका महिन्याच्या आत तयार करावा लागेल. सैन्य दलात हेवी व्हेईकल ड्रायव्हिंगचा किमान १५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. मेडीकल कॅटेगिरी SHAPE-1 तसेच वयोमर्यादा अधिकतम ४८ वर्षे आहे. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, 41, नंदनवन कॉलनी, औरंगाबाद दूरध्वनी : ०२४०-२३७०३१३ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

 

No comments:

Post a Comment