Sunday 14 August 2022

DIO BULDANA NEWS 14.08.2022

 समुह राष्ट्रगीत गायनाच्या उपक्रमात सहभागी व्हावे

-जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती

*मंगळवारी सकाळी 11 वाजता होणार गायन

बुलडाणा, दि. 14 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त समुह राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम मंगळवार, दि. 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. शालेय विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी यांनी जिजामाता प्रेक्षागार येथे उपस्थित राहावे, तर नागरिकांनी यावेळी ते ज्या ठिकाणी असतील तिथे उभे राहून राष्ट्रगीत गायनात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी केले आहे.

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यात हरघर तिरंगा आणि स्वराज्य महोत्सव हे उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात तालुका आणि ग्रामस्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, तसेच समुह राष्ट्रगीत गायनाच्या मंगळवारी सकाळी 11 वाजता रोजी नागरिकांनी आहे त्या ठिकाणी थांबून राष्ट्रगीत गायन करावे. जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, संस्था, शासकीय व निमशासकीय कार्यालये, केंद्र शासन आणि राज्य शासनाशी संबंधित कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, नगरपालिका, ग्रामपंचायत, सहकारी संस्था आदींनी या उपक्रमात सहभागी व्हावे, तसेच समुह राष्ट्रगीत गायनाच्या वेळी जाणते-अजाणतेपणे राष्ट्रगीताचा अवमान होणार नाही, याची दक्षता घेऊन समुह राष्ट्रगीत गायन उपक्रमास यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000

डाक विभागाची योजना हर घर मोहिम

बुलडाणा, दि. 14 : बुलडाणा डाक विभागातर्फे तिरंग हर घर, डाक विभाग की योजना हर घर मोहिम राबविण्यात येत आहे. ही योजना दि. 16 ते 31 ऑगस्ट 2022 दरम्यान राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व डाक कार्यालय, शाखा डाक यांच्यामार्फत डाक विभागाच्या सर्व योजना घरोघरी पोहोचविण्यासाठी मोहिम राबविण्यात येत आहे. डाक विभागामार्फत ग्राहकांना आता सर्व प्रकारच्या ऑनलाईन सुविधा, इंटरनेट बँकींग, मोबाईल बँकींग सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. यातून खातेदारांना इतर खात्यात रक्कम पाठवू शकतात. या मोहिमेतून नागरिक जवळच्या पोस्ट कार्यालयात बचत खाते, आवर्ती जमा खाते, बचत ठेव खाते, मासिक उत्पन्न योजना खाते, ज्येष्ठ नागरिकांसाठी खाते, आयकर सवलतीसाठी पीपीएफ खाते, मुलींच्या नावे सुकन्या समृद्धी खाते, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र उघडण्याचे आवाहन डाक अधिक्षक राकेश एल्लामेल्ली यांनी केले आहे.

00000









विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त मुक पदयात्रा

बुलडाणा, दि. 14 : विभाजन विभीषिका स्मृती दिन म्हणजेच फाळणी दु:खद स्मृती दिनानिमित्त जयस्तंभ चौक ते हुतात्मा स्मारक अशी मुक पदयात्रा काढण्यात आली.

बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौक ते हुतात्मा स्मारक दरम्यान मुक पदयात्रा काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे, तहसीलदार रुपेश खंडारे, तहसीलदार सारिका खोत, अश्विनी जाधव यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय, नगर परिषद, तहसिल कार्यालय येथील कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

जिल्हा प्रशासन आणि नगरपालिकेतर्फे हुतात्मा स्मारक आणि अग्रणी बॅंक व्यवस्थापक यांच्या प्रशिक्षण केंद्र, हिरोळे पेट्रोल पंप आणि डीएसडी मॉल येथे फाळणी दरम्यानची चित्र प्रदर्शनी लावण्यात आली आहे. ही प्रदर्शनी अत्यंत गांभीर्यपूर्वक आणि संयमित पद्धतीने लावण्यात आली आहे. या सर्व प्रदर्शनी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुली राहणार आहे. या प्रदर्शनीस नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

जिल्ह्यात आज विभाजन विभिषिका स्मृती दिन पाळण्यात आला. हा दिवस फाळणी दरम्यान हजारो लोकांना ज्या यातना, मनस्ताप आणि दु:ख भोगावे लागले याची कल्पना यावी यासाठी घोषित करण्यात आला आहे.

00000

No comments:

Post a Comment