Thursday 4 August 2022

DIO BULDANA NEWS 04.08.2022

                                                     शेतकऱ्यांनी कपाशीवरील रसशोषक किडी,

गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन करावे

*कृषि विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 4 : खरीप हंगामातील कापूस पिकावर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात प्रामुख्याने रसशोषक किडी, गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येतो. याच प्रभावी व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

कापूसावर सुरवातीच्या काळात प्रामुख्याने मावा, तुडतुडे आणि फुलकिडे अशा रसशोषक किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. कोरडवाहू कापूस पिकावर मावा या किडीचा प्रादुर्भाव जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून आढळून येतो. तुडतुड्यांचा प्रादुर्भाव जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून आणि फुलकिड्याचा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून प्रादुर्भाव आढळून येतो. गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भाव डोमकळ्यांचा स्वरुपात ऑगस्ट महिन्यात दिसून येतो.

यावर उपाययोजना करुन या किडींचे व्यवस्थापन केल्यास पिकाचे नुकसान कमी करता येते. शेतकऱ्यांनी बीटी कपाशीच्या बियाण्याला ईमीडाक्लोप्रीड किंवा थायोमेथॉक्झाम किटकनाशकांची बीज प्रक्रिया केली असते. त्यामुळे रसशोषक किडीपासून सर्वसाधारण 2 ते 3 आठवड्यापर्यंत संरक्षण मिळते. या काळात किटकनाशकांची फवारणी करु नये. वेळोवेळी प्रादुर्भावग्रस्त फांद्या, पाने, इतर पालापाचोळा जमा करुन किडीसह नष्ट कराव्यात.

पिकामध्ये उगवणीनंतर आठ ते दहा दिवसानंतर पिवळे चिकट सापळे लावून नियमित पांढरी माशीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवावे. कपाशीत चवळीचे आंतरपीक घ्यावे. चवळीवर कपाशीवरील किडीच्या नैसर्गिक शत्रू कीटकांचे पोषण होईल. वेळेवर आंतर मशागत करुन पिक तणविरहीत ठेवावे. त्यामुळे किडीच्या पर्यायी खाद्य तणाचा नाश होईल. तसेच बांधावरील किडीच्या पर्यायी खाद्य तणे, अंबाडी, रानभेडी  नष्ट करावीत.

मृदा आधारावर खतमात्रा अवलंब करुन जास्तीचा नत्र खताचा वापर टाळावा. तसेच दोन ओळी आणि दोन झाडातील अंतर योग्य ठेवावे. जेणेकरुन कपाशीची अनावश्यक कायिक वाढ होणार नाही आणि पिक दाटणार नाही. पर्यायाने अशा पिकावर किडही कमी प्रमाणात राहील. रसशोषक किडीवर उपजीविका करणारे सिरफीड  माशी, कातीन, ढालकिडे, क्रायसोपा आदींची संख्या पुरेशी आढळून आल्यास रासायनिक किटकनाशकांचा वापर टाळावा.

रसशोषक किडीसाठी कपाशी पिकाचे प्रादुर्भावाबाबत सर्वेक्षण करावे. सरासरी 10 मावा प्रति पान किंवा 2 ते 3 तुडतुडे प्रति पान किंवा 10 फुले किडे प्रति पान किंवा मावा तुडतुडे आणि फुलकिडे याची एकत्रित सरासरी संख्या 10 प्रति पान किंवा त्यापेक्षा जास्त आढळून आल्यास नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशकाचा वापर करावा. त्यासाठी बुप्रोफेजीन 25 टक्के प्रवाही 20 मिली किंवा डॉयफेथ्युरॉन 50 टक्के पा. मि. भुकटी 12 ग्रॅम किंवा फ्रिप्रोनील 5 टक्के प्रवाही 30 मिली किंवा इमिडक्लोप्रीड 17.8 टक्के 2.5 मिली यापैकी कोणतेही एका किटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पिक उगवणीनंतर 40 ते 45 दिवसानंतर फेरोमोन सापळ्याचा वापर वातावरणात पसरण्यात मदत होईल. यासाठी एकरी दोन किंवा हेक्टरी पाच फेरोमोन सापळे लावावे. सतत तीन दिवस या सापळ्यामध्ये आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनाच्या उपाययोजना, तसेच मास ट्रॅपिंगकरीता हेक्टरी 15 ते 20 कामगंध सापळे लावून दर आठवड्याने पतंगाचा नायनाट करावा. पिकातील डोमकळ्या नियमित शोधून त्या अळीसहित नष्ट कराव्यात. यामुळे पुढील पिढ्याचा जीवनक्रमास वेळीच आळा घालता येईल.

पिक उगवणीनंतर 35 ते 40 दिवसापासून दर पंधरा दिवसानी 5 टक्के निबोळी अर्काची किंवा ॲझॅडीरेक्टीन 3 हजार पीपीएम 40 मिली प्रति 10 मिली पाणी याप्रमाणे फवारणी करावी. पिक उगवणीनंतर 75 ते 80 दिवसांनी 12 ते 15 दिवसांच्या अंतराने ट्रायकोग्राम बॅक्ट्री किंवा ट्रायकोग्रामा चीलोनिस या परोपजीवी मित्रकिटकाची 1.5 लक्ष अंडी प्रति हेक्टरी चार वेळा शेतात सोडावे.

गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक आठवड्याला एकरी शेतीचे प्रतिनिधित्व करातील अशी 20 झाडे‍ निवडून निवडलेल्या प्रत्येक झाडावरील फुले, पात्या व बोंडे संख्या मोजावी. त्यात गुलाबी बोंड अळीग्रस्त फुले, पात्या आणि बोंडे यांची टक्केवारी काढावी आणि प्रादुर्भावग्रस्ताची टक्केवारी 5 टक्क्यांपेक्षा जास्त आढळल्यास खाली सांगितल्याप्रमाणे रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी. प्रोफेनोफॉस 50 टक्के प्रवाही 30 टक्के मिली किंवा क्लोरेट्रानिलीप्रोल 18.5 टक्के एससी 3 मिली किंवा थयोडीकार्ब 75 टक्के भुकटी 20 ग्रॅम किंवा फिप्रोनील 5 टक्के एससी 30 मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 5 टक्के ईसी 12 मिली या पैकी कोणतेही एक किटकनाशक प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सं. गं. डाबरे यांनी केले आहे.

0000000000

 

सोयाबीन बिजोत्पादकांना पिक व्यवस्थापन करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 4 : सोयाबीन पिक 25 ते 30 दिवसांचे आहे. सध्यास्थितीत किडी आणि रोगाचा फारसा प्रादुर्भाव आढळून येत नसला तरी सोयाबीन बिजोत्पादकांना सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

सोयाबीन पिक 25 ते 30 दिवसांचे झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दोन कोळपण्या, निंदणी आणि खुरपणी करुन शेत तणविरहित ठेवावी. सतत पाऊस, ढगाळ वातावरण या स्थितीत प्राधान्याने शेतीतील पाण्याचा निचरा करावा. पाने पिवळी पडली असल्यास सूक्ष्म अन्नद्रवण्याची मायक्रोला ग्रेड 2 ची 50 मिली प्रती 10 लिटर पाणी आणि 19:19:19 या विद्राव्य खताची 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी करावी.

या महिन्यात किडी आणि रोगांचा फारसा प्रादुर्भाव आढळून आलेला नाही. पुढील दिवसात विविध किडी विविध पाने खाणाऱ्या अळ्या, खोडमाशी आणि चक्रीभुंगाचा प्रादुर्भाव आढळल्यास प्रोफेनोफॉस 50 टक्के ईसी 20 मिली किंवा लॅबडा सायहँलोर्थीन 4.90 टक्के सीएस 6 मिली किंवा इडोक्झाकार्ब 15.80 टक्के 6.66 मिली प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी. तसेच पिवळा मोझँका या विषाणूज्यन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास 3-4 झाडे प्रादुर्भावग्रस्त झाडे काढून टाकावीत किंवा नष्ट करावीत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सं. गं. डाबरे यांनी केले आहे.

00000000000000

सैनिकी मुले, मुलींचे वसतीगृह भाड्याने देण्यासाठी प्रस्ताव आमंत्रित

बुलडाणा, दि. 4 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखालील सैनिकी मुलांचे वसतिगृह भाडेतत्वावर देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सैनिकी वसतीगृहामध्ये शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता किमान 25 टक्के माजी सैनिकांचे पाल्य मिळाले नसल्यामुळे वसतीगृह कार्यान्वित करणे शक्य नाही. त्यामुळे ही वसतीगृहे भाडे तत्वावर देण्यात येणार आहे. यात सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिखली रोड, बुलडाणा, सैनिकी मुलींचे वसतिगृह, गायरान परीसर, सागवन, बुलडाणा, सैनिकी सभामंडप, बुलडाणा ही तीन वसतिगृह भाड्याने देण्यात येणार आहे. ईच्छुकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, एसटी बस स्टॅण्ड शेजारी, बुलडाणा, दूरध्वनी क्र. 07262-242208 या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

00000

 

 

हर घर तिरंगा मोहीम-२०२२

पोस्टामध्ये भारतीय तिरंगा ध्वज उपलब्ध

बुलडाणा, दि. 4 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. नागरिकांसाठी तिरंगा ध्वज बुलडाणा येथील पोस्ट कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आला आहे. 25 रूपये प्रती ध्वज याप्रमाणे यासाठी दर आकारण्यात आले आहे.

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत भारत सरकार तर्फे हर घर तिरंगा मोहीम २०२२ राबविण्यात येत आहे. देशप्रेम, त्याग, बलिदान ही मुल्ये रुजविण्यासाठी प्रत्येक घरावर भारतीय तिरंगा ध्वज फडकविण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. याकरिता बुलडाणा पोस्ट विभागामार्फत केवळ 25 रूपये प्रती ध्वज याप्रमाणे ध्वज जिल्ह्यातील ग्रामीण भागासह सर्व पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय डाक विभागाच्या वेबसाईट मार्फत ऑनलाईन बुकिंग सुविधा उपलब्ध आहे.

नागरिकांनी हर घर तिरंगा मोहीम २०२२ यशस्वी करण्यासाठी विभागातील सर्व पोस्ट ऑफिसमधील तिरंगा ध्वज विक्रीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाक अधिक्षक गणेश अंभोरे यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment