Tuesday 9 November 2021

DIO BULDANA NEWS 9.11.2021

 परमिट प्राप्त शेतकऱ्यांनी अनुदानावरील हरभरा व ज्वारी बियाण्याची उचल करावी

·         कृषि विभागाचे आवाहन

   बुलडाणा,(जिमाका) दि.9 : शासनाच्या बियाणे वितरणाकरिता महाडीबीटी पोर्टल वर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अतंर्गत तसेच ग्राम बिजोत्पादन अंतर्गत हरभरा व गहू १० वर्षाआतील प्रमाणित बियाणे वितरण व ज्वारी १० वर्षा आतील व १० वर्षावरील प्रमाणित बियाणे वितरणसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानावरील बियाणे उचल करणेसाठी तालुका कृषि अधिकारी यांनी ऑनलाईन निवड झालेल्या शेतकऱ्यांना परमिट दिलेले आहेत.

  सदर परमिट व्दारे शेतकऱ्यांनी 10 नोव्हेंबर पर्यंत अनुदानावरील हरभरा व ज्वारी उचल करावी. तरी 10 नोव्हेंबर नंतर सदरचे परमिट बाद होणार आहे. त्यानंतर परमिट धारक ऑनलाईन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानित प्रमाणित बियाणे वितरणाचे बियाणे मिळाले नाही, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी शेतकऱ्यांची राहील. तसेच त्याबाबत कुठलीही तक्रार ग्राह्य धरण्यात येणार नाही.  गुरूवार 11 नोव्हेंबर पासून हरभरा 10 वर्षाआतील प्रमाणित बियाणे वितरण व ज्वारी 10 वर्षाआतील व 10 वर्षावरील अनुदानावरील सर्व प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाईन शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतर शेतकऱ्यांसाठी खुले होणार आहे. शेतकऱ्यांच्या 7/12 वरील क्षेत्रानुसार 0.40 आर पासून ते जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंत क्षेत्रासाठी प्रमाणित बियाणे वितरणाअंतर्गत अनुदानावर मिळणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी, महाबीज वितरक , एन.एस.सी वितरक,  कृभको वितरक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बुलडाणा यांनी केले आहे.

अनुदानीत दर प्रति किलो

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य – हरभरा पिकासाठी 10 वर्षाआतील वाण 61 रूपये प्रति किलो, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान तृणधान्य –ज्वारी पिकासाठी 10 वर्षाआतील वाण 30 रू प्रति किलो व 10 वर्षावरील वाण 38 रू प्रति किलो, मालदांडी, फुले, वसुधा 10 वर्षावरील वाण 31 रूपये किलो, ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम— हरभरा बियाणे 10 वर्षावरील वाण 55 रूपये प्रति किलो व गूह 10 वर्षाआतील वाण 23 रूपये प्रति किलो व 10 वर्षावरील वाण 21 रूपये प्रति किलो.

*****


केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीतून शेवटच्या घटकाचा विकास साधा

- खासदार प्रतापराव जाधव

* दिशा समिती बैठक

* ओटीएस, कर्जासाठी जमानत घेतलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावे

* बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी

* राहेरी पुलाचे काम गतीने पूर्ण करा

बुलडाणा,(जिमाका) दि.9 : केंद्र व राज्य शासन समाजातील शेवटच्या घटकाचा विकास करण्यासाठी, नागरिकांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबविते. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून समाजातील आर्थिक दारिद्र्य दूर करता येते. तरी कार्यान्वयीन यंत्रणांनी येजनांच्या अंमलबजावणीतून  समाजातील शेवटच्या घटकाचा विकास साधावा, अशा सूचना केंद्रीय ग्राम विकास समिती अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव यांनी आज दिल्या.

  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात दिशा (जिल्हा विकास समन्वयन व सनियंत्रण समिती) समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेताना खासदार श्री. जाधव बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार संजय गायकवाड, बुलडाणा कृउबास सभापती जालींधर बुधवत, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सवळे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते. तसेच सभागृहात समितीचे अशासकीय सदस्य, लोक प्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.

   एकात्मिक पाणलोट योजनेतून वैयक्तिक स्तरावर लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांच्या याद्या सादर करण्याच्या सूचना करीत खासदार श्री. जाधव म्हणाले, योजनांमुळे होत असलेल्या लाभाची तपासणी करावी. योजनांमुळे खरच किती लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाला, याबाबतच चाचपणी करावी. जिल्ह्यात विविध बँकांच्या ओटीएस योजनांचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात यावे. तसेच 30 जूनच्या आत पीक कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना व्याजमाफीचा लाभ देण्यात यावा. व्याजमाफी दिलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या सादर कराव्यात. पीक कर्जाबाबत शेतकऱ्यांशी बँक व्यवस्थापक, कर्मचाऱ्यांनी  वागणूकीबाबत कार्यशाळा घेवून प्रबोधन करावे. शेतकऱ्यांच्या बचत खात्याला होल्ड लावू नये. असे होल्ड लावलेले असल्यास तातडीने ते काढून टाकावे.

   ते पुढे म्हणाले, एकात्मिक गृह निर्माण योजनांची अनेक कामे अर्धवट आहेत. ही कामे प्राधान्याने पूर्ण करावी. अत्यंत गंभीरतेने व जबाबदारीने यंत्रणेने काम करावी. कामे पूर्ण झाल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या कामांची तपासणी करावी. राहेरी पूलाचे काम गतीने पूर्ण करावे. पुलावरून जड वाहतूक बंद असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. जुना डाक लाईन रस्ता पुर्ण करावा.  जिगांव प्रकल्पामध्ये पहिल्या टप्प्यातील गावांचे पुनर्वसन गतीने पूर्ण करा. या गावांमध्ये पुनर्वसनाची कामे दर्जेदार व्हावीत. अंदाजपत्रकानुसार कामे करावीत, कामे करताना ग्रामस्थांना विश्वासात घेतले जावे. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून लागणा-या निधीसाठी प्रस्ताव सादर करावा. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातंर्गत होत असलेल्या कामांचा दर्जा तपासावा. जिल्ह्यात बचत गटांचे जाळे मोठे आहे. यापैकी अनेक बचत गट चांगल्या प्रकारे उत्पादन घेतात. या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून दिली पाहिजे. तसेच बचत गटांचे उत्पादन विक्रीसाठी कायमस्वरूपी जागा तालुका स्तरावर उपलब्ध करून दिली पाहिजे. तालुक्यातील उत्पादन क्षम बचत गटांचा समूह तयार करावा त्यांच्या उत्पादन विक्रीसाठी विपणनची साखळी तयार करावी. अशाप्रकारे जिल्हास्तरावर उत्पादन क्षम बचत गटांसा समूह तयार करावा. जिल्ह्यातील लसीकरण वाढविण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. त्यासाठी लोकप्रतिनिधीची मदत घ्यावी. ज्या गावात कमी लसीकरण आहे, तिथे लसीकरण शिबिरे आयोजित करावी. याबाबत आधी गावकऱ्यांना पूर्वकल्पना द्यावी.

  याप्रसंगी आमदार संजय गायकवाड, जालींधर बुधवत यांनीही सूचना केल्या. बैठकीला लोकप्रतिनिधी, विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री. इंगळे यांनी बैठकीचे सादरीकरण केले.

*****


जिल्ह्यातील अपघात प्रवण स्थळे दुरूस्त करावी

- खासदार प्रतापराव जाधव

* रस्ता सुरक्षा समिती बैठक

बुलडाणा (जिमाका), दि. 9 : सध्या जिल्ह्यात बऱ्याच रस्त्यांची कामे सुरू आहे. अनेक रस्त्यांची कामे पुर्ण झाली आहेत. राष्ट्रीय, राज्य, प्रमुख जिल्हा मार्ग आदी मोठ्या रस्त्यांना ग्रामीण भागातील गाव रस्ते जोडलेले असतात. जिल्ह्यात मात्र ग्रामीण रस्ते मोठ्या रस्त्यांना जोडणाऱ्या जंक्शनच्या ठिकाणी अपघात प्रवण स्थळ निर्माण झालेले आहे. कंत्राटदारांच्या चुकांमुळे अशा ठिकाणी अपघात घडत आहेत. त्यामुळे मोठ्या रस्त्यांना जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यांचे जंक्शन अपघात प्रवण नसावे. तसेच जिल्ह्यातील सर्व अपघात प्रवण स्थळे दुरूस्त करावी, असे निर्देश खासदार तथा केंद्रीय ग्रामविकास समिती अध्यक्ष प्रतापराव जाधव यांनी दिले आहेत.

  रस्ता सुरक्षा समितीच्या आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले. त्यावेळी आढावा घेताना खासदार बोलत होते. यावेळी बुलडाणा कृउबास सभापती जालींधर बुधवत, जिल्हाधिकारी एस राममूर्ती, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसार गाजरे, अप्पर पोलीस अधिक्षक बजरंग बनसोड, कार्यकारी अभियंता श्री. काळवाघे आदी उपस्थित होते.

  ते पुढे म्हणाले, सध्या जिल्ह्यात काही रस्त्यांची कामे सुरू असून अशा निर्माणाधीन रस्त्यांवर सुरक्षेचे सर्व नियम पाळल्या गेले पाहिजे. रस्ता काम सुरू असताना रस्ता सुरक्षेचे नियम व उपययोजना न केल्यामुळे अपघात होतात. त्यामध्ये नाहक जीव जातो. अशा परिस्थितीत संबंधीत कंत्राटदारांनी रस्ता सुरक्षेच्या उपाययोजना करण्यासाठी यंत्रणांनी लक्ष द्यावे. शाळांजवळ रस्त्यांवर गतीरोधक लावावे. जेणेकरून अपघात होणार नाही. मेहकर ते खामगांव रस्त्यावरील अपघात प्रवण वळणे दुरूस्त करावी. गावांमधून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गांवरील अतिक्रमणे काढून टाकावी. रस्त्यांवर पार्किंग न करण्यासाठी पोलीसांनी कारवाई करावी. यावेळी संबंधीत यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

                                                                        **********

शासकीय योजनांचे लाभ हवाय ; लसीकरण प्रमाणपत्र दाखवा

·         लसीकरण करण्याचे प्रशासनाचे आवाहन

बुलडाणा (जिमाका), दि. 9 : केंद्र शासनाने हर घर दस्तक मोहिम सुरु केली असुन त्याअनुषंगाने 18 वषावरील सर्व नागरीकांचे कोविड लसीकरण पुर्ण करावयाचे आहे.  कोरोनाचा प्रादुर्भाव पसरु नये म्हणुन कोविड-19 लसीकरण मोहीम व्यापक स्वरुपात राबवयाची आहे. त्याअनुषंगाने 18 वर्षावरील सर्वांनी लवकरात लवकर कोविड लसीकरण करुन घेण्यात यावे. शासकीय कार्यालयामार्फत पुरविण्यात येणा-या सेवा व लाभ विविध प्रकारचे प्रमाणपत्र,दाखले, रेशनचे धान्य, बँकीग सुविधा, संजय गांधी निराधार/श्रावणबाळ सेवा योजनांचे अनुदान, अनुदानीत गॅस सिलेडर इत्यादी सुविधा प्राप्त करुन घेण्यापुर्वी लसीकरण करुन घेण्यात यावे. ज्या नागरीकांनी कोविड-19 लसीकरण केलेले नाही, त्यांनी लसीकरण करुन घेतल्यानंतर त्यांना वर नमुद सेवा/लाभ देण्यात येतील. तसेच कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये प्रवेश करण्यापुर्वी सुध्दा सर्वांनी लसीकरण पुर्ण करुन घ्यावे, असे तालुका कोविड नियंत्रण समिती बुलडाणा व खामगांव यांनी कळविले आहे.

                                                                        ********

कोविड लसीकरण जनजागृतीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने मार्गदर्शन

बुलडाणा (जिमाका), दि. 9 : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री डॉ राजेद्र शिंगणे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व फार्मासिस्ट, केमिस्ट यांनी कोवीड लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा. या दृष्टीने 8 नोव्हेंबर रोजी बुलडाणा येथे झालेल्या बैठकीमधे सूचना  देण्यात आल्या होत्या. त्या सूचनांच्या अनुषंगाने आज दिनांक 9 नोव्हेंबर रोजी रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक गजानन घिरके यांच्या मार्गदर्शनात केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट एसोसिएशन मलकापुर ची बैठक पार पडली.

   या बैठकीदरम्यान सर्व केमिस्ट बांधवांनी स्वत:चे तसेच आपल्या कुटूंबियांचे व नातेवाईक यांचे लसिकरण तातडीने पूर्ण करुण घ्यावे. तसेच आपल्या पेढ़ीमध्ये औषध खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना लसिकरण करून घेण्यास प्रेरित करावे. त्यांना लसिकरणाचे फायदे व सुरक्षितते विषयी माहिती द्यावी. केमिस्ट व फार्मासिस्ट यांनी लसिकरण मोहिममध्ये सक्रिय सहभाग घेऊन ही मोहिम जनमोहिम बनवावी, असे आवाहन यावेळी श्री. घिरके यांनी केले. बैठकीला मलकापुर  केमिस्ट चे अध्यक्ष गोपाल मालपाणी व मलकापुर केमिस्ट चे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment