Thursday 18 November 2021

DIO BULDANA NEWS 18.11.2021

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 257 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 03 पॉझिटिव्ह

बुलडाणा, (जिमाका) दि. 18 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 260 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 257 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 03 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील चाचणी मधील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 77 तर रॅपिड टेस्टमधील 180 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 257 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                       

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : सुंदरखेड 1, आनंद नगर 1, शेगांव शहर : व्यंकटेश नगर 1  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 03 रूग्ण आढळले आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 734944 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86945 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86945 आहे.  आज रोजी 91 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 734944 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87636 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86945 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 17 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 674 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

                                                                                    *****

                                रेशीम कोषाच्या दराने घेतली स्वर्णीम भरारी…

  • 706 रूपये प्रति क्विंटलचा भाव

बुलडाणा, (जिमाका) दि. 18 : शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती उन्नत होण्यासाठी शेतीला पर्यायी जोडधंदा पाहिजे. जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून शेतकरी आर्थिक संपन्न होईल. यासाठी शासन स्तरावर विविध प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांनी रेशीम शेती करण्यासाठी शासन दरवर्षी महारेशीम अभियान राबविते. सध्या रेशीम कोषाचे दरही दरवर्षीपेक्षा जास्त असून सोन्यासारखे भाव रेशीम कोषाला मिळत आहे. रेशीम कोषाच्या दराने स्वर्णीम भरारी घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपारीक शेतीला फाटा देत रेशीम शेतीची कास धरावी.

     जिल्ह्यात सन 2022-23 या वर्षात तुती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची सभासद नोंदणी करण्यात येत आहे. नोंदणीसाठी महा रेशीम अभियान 2022 राबविण्यात येत आहे. हे रेशीम अभियान 25 नोव्हेंबर पर्यंत आहे.  त्यानुसार ज्या इच्छुक शेतकऱ्यांना जून 22 मध्ये तुती लागवड  करिता  स्थानीक ग्रामपंचायत स्तरावर मनरेगा अंतर्गत कृती आराखड्यात मध्ये नाव दिलेले आहेत. त्यांनी व जिल्ह्यातील अन्य शेतकऱ्यांनी महारेशीम अभियान 22 मध्ये सर्व आवश्यक कागद पत्रांसहित व प्रति एकर 500 रुपये शुल्क भरून नाव नोंदणी करावी. ही नाव नोंदणी जिल्हा रेशीम कार्यालय, बुलडाणा यांचेकडे  करणे सुरू झाले आहे. तरी शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा,  असे आवाहन रेशीम विकास अधिकारी एन बी बावगे यांनी केले आहे. सध्या शेतकऱ्यांना इतर पिकात अतिवृष्टी, दुष्काळाचे होणारे धोके लक्षात घेता जिल्ह्यात सन 2021-22 मध्ये मनरेगा अंतर्गत सर्व तालुक्यातील ग्राम पंचायत स्तरावर तुती लागवड करीता कृती आराखडा मध्ये 1327 शेतकऱ्यांचे नाव समाविष्ट आहे. मात्र प्रत्यक्षात जिल्हा रेशीम कार्यालयाकडे 235 शेतकऱ्यांनीच 500 रूपये प्रति एकर शुल्क भरून व सर्व कागदपत्रे सादर केले आहे.

  मनरेगातून तुती लागवड करून शेतकऱ्यांनी रेशीम कोषाला स्वर्णीम दर प्राप्त करून घ्यावा. मनरेगा अंतर्गत रेशीम शेतीसाठी अनुदान देण्यात येते. तरी शेतकऱ्यांनी 25 नोव्हेंबर पर्यंत सर्व कागदपत्रांसह जिल्हा रेशीम कार्यालय, बुलडाणा येथे नाव नोंदणी करावी.

                                                मनरेगा अंतर्गत रेशीम शेतीच्या अकुशल व कुशल मजुरीसाठी मिळणारी रक्कम

प्रथम वर्षासाठी 282 दिवसांकरीता 203 रूपये दरानुसार 57 हजार 246 रूपये, द्वितीय वर्षाला 200 दिवसांसाठी 203 रूपये मजुरी दराप्रमाणे 40 हजार 600 रूपये व तृतीय वर्षाला 200 दिवसांसाठी 203 रूपये दरानुसार 40 हजार 600 रूपये. अशा प्रकारे एकूण 682 दिवसांकरीता 1 लक्ष 38 हजार 446 रूपये अनुदान मिळते. तसेच कुशलसाठी प्रथम वर्षाला शेणखत, तुती रोपे, चंद्रीका-100 प्लास्टीक ट्रे 10, नायलॉन जाळी 4, गटूर स्प्रे पंप 1,औषध 4 लीटर करीता 41 हजार 160 रूपये, द्वितीय वर्षाला जैविक खते / पोषक औषधी निर्जंतुकीकरण पावडरसाठी 10 हजार 285 रूपये  व तृतीय वर्षाला जैविक खते, निर्जंतुकीकरण पावडर करीता 10 हजार 285 रूपये असे एकूण 61 हजार 730 रूपये अनुदान मिळते. तसेच मनरेगा अंतर्गत मजुरीचा खर्च संबंधित मजुराला पोस्ट / बँक खात्यामार्फत तहसिलदारांकडून देण्यात येईल. तसेच सामुग्रीचे प्रदान संबंधित लाभधारकांनी लागवड केल्यानंतर NEFT द्वारे तहसिलदारांमार्फत करण्यात येईल, असे जिल्हा रेशीम विकास कार्यालयाने कळविले आहे.

                                                                        ******

        बेरोजगारांच्या कार्यरत सेवा सहकारी सोसायट्यांसाठी सफाईगार पदांची कामे प्राप्त

· 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत प्रस्ताव सादर करावे

बुलडाणा, (जिमाका) दि. 18 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शेगांव येथे कंत्राटी पद्धतीचे 2 सफाईगार पद असून ते रिक्त आहे. या पदासाठी नोंदणीकृत सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना काम वाटपाकरीता कामे प्राप्त झाली आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने सफाईगार पदाची कामे करुन घेणे गरजेचे आहे. सफाईगार पदांची कामे बेरोजगार सोसायटयांकडून ठेका पध्दतीने करुन घ्यावयासाठी कौशल्य विकास कार्यालयाकडे प्राप्त झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयामार्फत सुशिक्षीत बेरोजगारांच्या कार्यरत सेवा सहकारी सोसायट्या आहेत. नोंदणीकृत सेवा सहकारी संस्था वरील काम करण्यास इच्छूक असल्यास 30 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, बस स्टॅंड समोर, बुलडाणा येथे प्रस्ताव सादर करावा.

   सदर संस्था ही ऑगस्ट 2000 नंतरची सहकार कायदा 1960 अन्वये नोंदणीकृत असावी, सदर कामासाठी सेवा सहकारी संस्था इच्छुक व पात्र असावी, तशी लेखी सहमती कळवावी. सेवा सहकारी संस्थेचे राष्ट्रीयकृत अथवा सहकारी बँकेत खाते असावे, मागील आर्थिक वर्षाचे लेखा परीक्षण केलेले असावे, समितीमार्फत काम मिळविण्यासाठी सहकारी सेवा सोसायटी अथवा लेाकसेवा केंद्र किमान 6 महिने कार्यरत असावे. त्यांनी यापूर्वी काम केलेले असणे आवश्यक आहे. सेवा सहकारी संस्थेमधील सदस्याबाबतचे प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे. अर्जासोबत अंकेक्षण अहवाल, नोंदणी प्रमाणपत्र प्रत, संस्थेच्या अनुभवाची कागदपत्रे, बँकेच्या पासबुकाची प्रत सोबत जोडावी. प्राप्त प्रस्तावांचा विचार काम वाटप समितीमार्फत काम वाटपासाठी करण्यात येणार नाही, याबाबत नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुलडाणा येथे संपर्क साधावा, असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

                                                                                                                ******

 

No comments:

Post a Comment