Sunday 7 November 2021

DIO BULDANA NEWS 7.11.2021,1

 तंत्रज्ञानाची सांगड घालून तरूण पिढीच्या कल्याणासाठी काम करणार

- क्रीडा मंत्री सुनील केदार

  • 19 व्या सब ज्युनिअर राज्यस्तर धनुर्विद्या स्पर्धेचे उद्घाटन

बुलडाणा, (जिमाका) दि. 7 : क्रीडा विभागासोबतच युवक कल्याण हे महत्वाचे खाते आहे. सध्याचा तरूण हा तंत्रज्ञानस्नेही आहे. स्मार्ट फोनच्या माध्यमातून प्रत्येक तरूणाच्या हातात तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग करून तरूण आपले आयुष्य समृद्ध करू शकतो. मात्र या तंत्रज्ञानाचा सध्या दूरुपयोग होताना दिसत आहे. त्यामुळे विभागाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाची सांगड घालून तरूण पिढीच्या कल्याणासाठी काम करणार आहे, असे प्रतीपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी आज केले.

  सहकार विद्या मंदीराच्या प्रांगणावर 19 व्या सब ज्युनिअर राज्यस्तर धनुर्विद्या स्पर्धेचा उद्घाटन समारंभाचे आयोजन आज 7 नोव्हेंबर रोजी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, क्रीडा उपसंचालक विजय संतान, तीरंदाजी संघाचे सचिव प्रमोद चांदुरकर, बुलडाणा अर्बनचे राधेश्याम चांडक, बुलडाणा जिल्हा धनुर्विद्या संघाचे अध्यक्ष ॲड राजेश लहाने, सचिव डॉ मनोज व्यवहारे,  शिवबा आर्चरी ॲकडमीचे अध्यक्ष सुधाकर दळवी, कुणाल गायकवाड, जिल्हा क्री




डा अधिकारी गणेश जाधव आदी उपस्थित होते.

  खेळाचे व्यासपीठ विद्यार्थी जिवनात मिळणे महत्वाचे असल्याचे सांगत क्रीडामंत्री श्री. केदार म्हणाले, खेळामध्ये सामाजिक दृष्टीकोन व्यापक असतो, जाती पातीतील भेदभाव नसतो, लैंगिक समानता असते, अशा वैविध्यामुळे विद्यार्थी जिवनात खेळ असल्यास पुढील आयुष्य यशस्वी होते.

    पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यावेळी म्हणाले, बुलडाणा जिल्ह्यात खेळाडूंमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे. या गुणवत्तेमुळे अनेक प्रतीभावान खेळाडू जिल्ह्यात आहेत. अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. बुलडाण्याला क्रीडा क्षेत्राचे हब बनवावे. तसेच क्रीडा प्रबोधिनी बुलडाणा येथे देण्यात यावी. जेणेकरून क्रीडा सुविधा निर्माण होवून जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू आपला नावलौकिक करतील. जिल्ह्यात क्रीडा सुविधांसाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यात येत आहे. ओपन जिम निर्माण करण्यासाठी 4 कोटी रूपयांचा निधी नियोजन मंडळातून देण्यात आला आहे. तसेच जि.प शाळांमध्ये क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी निधी देण्यात येत आहे.  युवकांना गुटख्याच्या विळख्यातून सोडविण्याचे काम सातत्याने होत आहे. गुटखा मुक्तीसाठी सर्व स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत.

  प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले. त्यांनी स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका विषद केली.  यावेळी आमदार संजय गायकवाड, तिरंदाजी संघाचे प्रमोद चांदुरकर, बुलडाणा अर्बनचे राधेश्याम चांडक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. स्पर्धेचे उद्घाटन पक्षी सोडून करण्यात आले. आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या खेळाडू मिहीर अपार याने स्पधेची शपथ दिली. याप्रसंगी मिहीर अपार, पॅरा ऑलिम्पिक खेळाडू अभिषेक खावरे, सोनीपत येथे धनुर्विद्या खेळाचे प्रशिक्षण घेणारा खेळाडू प्रथमेश जवकार याचे आजी – आजोबा, धनुर्विद्या खेळाडू अंजीरी मराठे, कुश्ती खेळाडू निखील जवंजाळ, प्रशिक्षक सागर उबाळे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू स्वप्नील ढमढेरे, प्रशिक्षक अमर जाधव यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाला खेळाडू, प्रशिक्षक, नागरीक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment