Tuesday 23 March 2021

DIO BULDANA NEWS 23.3.2021

 27 व 28 मार्च सुट्टीच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार

बुलडाणा, (जिमाका) दि.23 : सन 2020-21 या आर्थिक वर्षात जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट दि. 31 मार्च 2021 पर्यत साध्य करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने मुद्रांक शुल्कातील अधिभारामध्ये दिलेली सुट 31 मार्च 2021 रोजी संपुष्टात येत असल्याने नोंदणी कार्यालयामध्ये दस्त नोंदणी करीता पक्षकारांची जास्त प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच कार्यालयामध्ये कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कार्यालयामध्ये पक्षकारांची गर्दी होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये शासकीय सुट्टीच्या दिवशी शनिवार दि. 27 व रविवार दि. 28 मार्च 2021 रोजी दस्त नोंदणी करीता सुरु ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहजिल्हा निबंधक वर्ग – 1 उमेश के. शिंदे तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

00000000

पात्र असलेल्या सामायिक खातेदारांनी एका बँक खात्याचे संमतीपत्र द्यावे

  • ऑक्टोंबर – नोव्हेंबर 2019 मध्ये क्यार, महा चक्रीवादळामुळे झालेली नुकसान भरपाई
  • सामायिक खात्यांमुळे काही शेतकऱ्यांचे अनुदान प्रलंबित

बुलडाणा, (जिमाका) दि.23 : बुलडाणा तालुक्यामध्ये माहे ऑक्टोंबर, नोव्हेबर 2019 मध्ये क्यार व महा चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान वाटप करण्यात आले होते. त्यामधील काही सामायिक क्षेत्राचे खातेक्रमांक अप्राप्त आहे. त्यामुळे अनुदानाची रक्कम तहसिल कार्यालयात प्रलंबित आहे.

     सामायिक खातेदारांनी एकाच बँक खात्याचे लेखी संमतीपत्र देण्यासंदर्भात दि. 15 नोव्हेंबर 2020 रोजी वृत्तपत्रांच्या माध्यमातून जाहीर आवाहनही करण्यात आले होते. तसेच यापुर्वी अनुदानही वितरित करण्यात आलेले आहे. मात्र अजुनही काही खोतेदारांचे खातेक्रमांक प्राप्त न झाल्यामुळे त्यांना अनुदान वितरित करता आलेले नाही. तसेच सामायिक खातेदारांमधील आपसी वादामुळेसुध्दा बरेच अनुदान वितरित करावयाचे बाकी आहे. यापुर्वी वृत्तपत्रामध्ये जाहिरनाम्याद्वारे प्रसिध्दी करण्यात आलेली होती. ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही आपले खाते क्रमांक संबंधित तलाठी यांच्याकडे जमा केलेले नाही.  त्यांनी दि. 30 मार्च 2021 पर्यत खाते जमा करावे, तसेच सामायिक खाते असलेल्या पात्र शेतकऱ्यांनी आपले अनुदान कोणत्या एका खातेदाराच्या नावे जमा करावयाचे आहे. त्याचे लेखी स्वरुपात समतीपत्र संबंधित तलाठी यांच्याकडे दि. 30 मार्च 2021 पुर्वी देण्यात यावे. त्यानंतर दि. 30 मार्च 2021 पर्यत प्राप्त खातेदारांना अनुदान वितरित करण्यात येईल. तदनंतर शिल्लक अनुदान शासनास परत करण्यात येईल, याची दखल घ्यावी, असे तहसिलदार बुलडाणा यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

000000000

                         



बुलडाणा पाटबंधारे विभागात जलजागृती सप्ताहाचा समारोप

बुलडाणा, (जिमाका) दि.23 : राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्यावतीने आंतरराष्ट्रीय जल दिनानिमित्ताने 22 मार्च रोजी जिल्ह्यात 16 मार्चपासून सुरू असलेल्या जलजागृती सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या सप्ताहाचा समारोप बुलडाणा पाटबंधारे विभागाचे सहा. अभियंता तुषार मेतकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून बुलडाणा पाटबंधारे मंडळ कार्यालयात पार पडला. यावर्षी कोविड साथरोगामुळे सप्ताहात कार्यक्रमांचे आयोजन संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन करून करण्यात आले. समारोपीय कार्यक्रमाला जिल्ह्यातील कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता, अधिकारी आदी उपस्थित होते.  

     सन 2021-2022 मध्ये 10 टक्के सिंचनात वाढ होण्याचे दृष्टीने राजयातील आगामी काळातील भीषण पाणी टंचाई लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर नागरिक तसेच औद्योगिक संस्थांनी करावा, असे आवाहन सहा. अधिक्षक अभियंता तुषार मेतकर यांनी केले. याप्रसंगी जिल्ह्यात विविध विभागाच्यावतीने जलजागृती सप्ताहात राबविण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. देशात कोरोना विषाणूचा होत असलेला वाढता प्रसार लक्षात घेता, कोरोना विषाणू बाबत शासनाने जास्त लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम न घेण्याच्या दिलेल्या सुचनेनुसार 16 ते 22 मार्च 2021 या कालावधीत जलजागृती सप्ताहाचे आयोजन मर्यादीत स्वरूपात करण्यात आले. समारोपीय कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल खानझोडे, अंकुश गावीत, एस.एस पाचघरे, भरत राऊत, करण उमाळे, शत्रुघ्न धोरण, प्रदीप पवार आदींनी प्रयत्न केले. संचलन व आभार प्रदर्शन अनिल खानझोडे यांनी केले. कार्यक्रमासाठी जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी आदींनी प्रयत्न केले.

********

जिल्हाधिकारी कार्यालयात

शहिद दिनानिमित्त अभिवादन

बुलडाणा, (जिमाका) दि. 23 : शहिद दिनानिमित्त क्रांतीकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नायब तहसिलदार संजय बंगाळे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी यांनीही प्रतिमेला पुष्पार्पण करून अभिवादन केले.

**********

चिंचखेडनाथ व इसालवाडी  गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजूर

बुलडाणा, (जिमाका) दि. 23 : मोताळा तालुक्यातील चिंचखेडनाथ व इसालवाडी गावाला पिण्याच्या पाण्यासाठी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. चिंचखेडनाथ येथील लोकसंख्या 868 असून इसालवाडी येथील 692 आहे. टँकरद्वारे दररोज 24 हजार 990 लीटर्स पाण्याच्या पुरवठा केल्या जाणार आहे. पाणी टंचाई निकषानुसार सदर गावास पशुधनासह लागणारे पाणी, अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठ्याची साधने / स्त्रोतांद्वारे मिळणारे पाणी या बाबी लक्षात घेवून टँकर पाण्याच्या खेपा टाकणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीने घ्यावी, असे उपविभागीय अधिकारी, मलकापूर यांनी कळविले आहे.

********

अवैध शिधापत्रिका तपासणी शोध मोहिम; शिधापत्रिकांची तपासणी सुरू

बुलडाणा, (जिमाका) दि. 23 : अपात्र शिधापत्रिका शोधून रद्द करण्याकरीता खास शोध मोहिम राबविणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्ह्यात कार्यरत बीपीएल, अंत्योदय, अन्नपुर्णा, केशरी, शुभ्र व आस्थापना कार्ड या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी शोध मोहिम 30 एप्रिल 2021 पर्यंत राबविण्यात येत आहे. या मोहिमेत शिधापत्रिका धारकांच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यात येत आहे.  त्याचप्रमाणे संबंधीत रास्त भाव दुकानास जोडलेल्या शिधापत्रिकाधारकांकडून माहिती भरून दिलेले अर्ज स्वीकृत करून अर्जदारास स्वाक्षरी व दिनांकासह तलाठी अथवा संबंधीत शासकीय कर्मचाऱ्यांनी पोच द्यावी. शिधापत्रिकाधारकांनी राहत असलेल्या भागातील रहिवासी पुरावा द्यावा, त्यामध्ये भाडेपावती, निवास स्थानाच्या मालकीबद्दलचा पुरवा, एलपीजी जोडणी क्रमांक, बँक पासबुक, वीजेचे देयक, दूरध्वनी देयक, चालक परवाना, अन्य कार्यालयीन ओळखपत्र, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड आदीपैकी एका पुराव्याचा समावेश असावा.

         दिलेला पुरावा हा एका वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा जुना नसावा. शिधापत्रिकेची तपासणी करताना यंत्रणेने एका कुटूंबात व एका पत्त्यावर दोन शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.  अपवादात्मक परिस्थितीत दोन वेगवेगळ्या शिधापत्रिका देणे आवश्यक असल्यास तसा निर्णय आवश्यक ती खातरजमा करून संबधित तहसिलदार अथवा तहसिलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावा. एकाच पत्त्यावर दोन शिधापत्रिका विभक्त कुटूंबामध्ये देताना, दोन्हीही शिधापत्रिका बीपीएल अथवा अंत्योदय अन्न योजनेच्या असणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. दुबार, अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती,  स्थलांतरीत व्यक्ती, मयत व्यक्ती या लाभार्थ्यांना वगळण्यात यावे. तरी लाभार्थ्यांनी अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेला प्रतिसाद देवून आपली शिधापत्रिकेची खात्री करून घ्यावी.  या मोहिमेतंर्गत अपात्र आढळून येणाऱ्या शिधापत्रिका रद्द करण्यात याव्यात व त्याप्रमाणात रास्तभाव दुकानांकडील कोटा कमी करण्यात यावा, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने कळविले आहे.

*********

तांबुळवाडी व सैलानी नगर  गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजूर

बुलडाणा, (जिमाका) दि. 23 :  चिखली तालुक्यातील तांबुळवाडी व सैलानी नगर गावाला पिण्याच्या पाण्यासाठी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. तांबुळवाडी येथील लोकसंख्या 3500 असून सैलानी नगर येथील 200 आहे. टँकरद्वारे दररोज 75 हजार 700 लीटर्स पाण्याच्या पुरवठा केल्या जाणार आहे. पाणी टंचाई निकषानुसार सदर गावास पशुधनासह लागणारे पाणी, अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठ्याची साधने / स्त्रोतांद्वारे मिळणारे पाणी या बाबी लक्षात घेवून टँकर पाण्याच्या खेपा टाकणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीने घ्यावी, असे उपविभागीय अधिकारी,  बुलडाणा यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment