Friday 18 September 2020

DIO BULDANA NEWS 18.9.2020

 ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम कालावधीत जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश लागू

  • मास्क न वापरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सोशल डिस्टसिंगचे पालन न केल्यास दंड
  • व्यापारी संघटना, नागरिक संघ, खाजगी संस्थांनी मोहीम कालावधीत बंद पाळावा

बुलडाणा, (जिमाका)दि. 18 : जिल्ह्यात ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहीमे’ची पहिली फेरी 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोंबर 2020 या कालावधीत होणार आहे. या मोहिमेमध्ये सर्व लोकसंख्येला दोन वेळा घर भेटी देऊन संशयीत कोविड रूग्ण शोधणे, मधुमेह, हृदयविकार, किडनी आजार व लठ्ठपणा यासारख्या कोमॉरबीड व्यक्ती शोधणे, त्यांची तपासणी करणे, उपचार करणे या बाबींचा अंतर्भाव असणार आहे. तरी सदर मोहीम सुरू असताना नागरिकांनी महत्वाच्या कामाव्यतीरिक्त घराबाहेर पडू नये. सर्वेक्षणाचे वेळी घरी नसल्यामुळे धोका ओळखता येत नसल्याने ही बाब सर्वेक्षणासाठी असहकार्य असल्याचे समजण्यात येवून नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचा आदेश जिल्हादंडाधिकारी एस. राममूर्ती यांनी मोहीम कालाधिसाठी लागू केला आहे.

   आदेशानुसार कोणत्याही कारणासाठी सार्वजनिक ठिकाणी वावरतांना  तीन पदरी मास्क किंवा साधा कापडी मास्क, रूमालाने नाक व तोंड झाकून वावरणे बंधनकारक आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे अत्यावश्यक  सेवा वगळता, दुकाने / आस्थापना/ प्रतिष्ठाने बंद व्यापारी संघटना, नागरीक संघ, खाजगी संस्था यांना 30 सप्टेंबर पर्यंत आपआपली दुकाने, आस्थापना बंद ठेवून मोहीमेस सहकार्य करावे.  

 दुकान चालक, मालक यांनी दुकाने उघडी ठेवल्यास सोशल डिस्टसिंगचे पालन करून एकावेळी 5 पेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश देवू नये. कामाचे, व्यवसायाचे ‍ ‍ठिकाणी थर्मल स्क्रिनींग करणे, हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणेआदी बंधनकारक राहणार आहे. तसेच नियमांचे पालन न केल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांनी दंडनिय कार्यवाही करावी. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क न वापरणे, सोशल डिस्टसिंगचे पालन न करणे याबाबत शहरी भागात मुख्याधिकारी, नगर परीषद व ग्रामीण भागात मुख्य कार्यकारी  अधिकारी, जि.प बुलडाणा यांनी दंडनिय कारवाई करावी. त्यासाठी जागोजागी चेकनाके उभारावे. थुंकणे व मास्क न वापरल्यास 500 रूपये दंड व सोशल डिस्टसिंगचे पालन न केल्यास ग्राहकांसाठी 500 आणी दुकान मालकासाठी 1500 रूपये दंड आकारण्यात येणार आहे.  आदेश कालावधीत जिल्हाधिकारी ,अप्पर जिल्हाधिकारी बाहेर फिरून आदेशाची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याची पाहणी करणार आहे. अकस्माक भेटी देवून परिस्थितीची चाचपणी करणार आहे. दोषी आढळल्यास दोषिंवर कारवाई करणार आहेत.

   शासनाचे निर्देशानुसार जिल्ह्यामध्ये कोविड 19 च्या अनुषंगाने ही तपासणी मोहिम राबविण्यात येत असून यामध्ये नागरीकांची घरोघरी तपासणी करण्यात येणार आहे. सदर तपासणीदरम्यान नागरीकांनी घरीच थांबावे व तपासणी करून पथकास योग्य ते सहकार्य करावे. तसेच 65 वर्षावरील व्यक्ती, कोमॉबीड व्यक्ती, गरोदर माता व 10 वर्षाखालील मुले यांनी वैद्यकीय तथा अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्तिंविरूद्ध दंडनिय तसेच फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. या आदेशाद्वारे विहित करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा सदर आदेशाची अवज्ञा करणारी कोण्‍तीही व्यक्ती, संस्था अथवा संघटना ही आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंड संहीता च्या कलम 188 नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील.  

                                                                        **********

कृषी  विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज आमंत्रित

  • 25 सप्टेंबर 2020 अंतिम मुदत

बुलडाणा, (जिमाका)दि. 18 : कृषि विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून 25 सप्टेंबर 2020 पर्यंत अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत आहे. या पुरस्कारांमध्ये वसंतराव नाईक शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषि भुषण पुरस्कार, जिजामाता कृषि भुषण पुरस्कार व उद्यान पंडीत पुरस्काराचा समोवश आहे.

   वसंतराव नाईक कृषी भुषण व जिजामाता कृषि भुषण पुरस्काराचे स्वरूप 50 हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह आहे. यासाठी कृषी क्षेत्रात संघटनात्मक कार्य करणारे शेतकरी, गट, संस्था त्यांचे कार्य संपूर्ण राज्याला दिशादर्शक असावे. प्रस्तावित शेतकरी हा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त असावा, शासनाकडून यापूर्वी दिलेल्या पुरस्कराचा ‍किमान 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी पूर्ण झालेला असावा.  जिजामाता कृषी भुषण पुरस्कारासाठी शेतीची अट नाही.  हा पुरस्कार महिला शेतकऱ्यांना देण्यात येतो. वसंतवराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराचे स्वरूप 11 हजार रूपये धनादेश व स्मृती चिन्ह आहे. या पुरस्कासाठी  स्वत:च्या नावावर शेती असावी व तो कुटूंबासह शेती करणारा असावा, शेतीपुरक व्यवसाया  व्यतीरीक्त इतर कोणताही व्यवसाय किंवा नोकरी करणारा नसावा,  आदिवासी शेतकऱ्याच्या बाबतीत जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.  शेतकऱ्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या स्वाक्षरीचा दाखला मूळ प्रतीत दाखल करणे आवश्यक असून प्रस्तावीत शेतकऱ्याकडे 5 किंवा त्यापेक्षा जास्त सालदार नसावेत.

  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्काराचे स्वरूप 75 हजार रूपये रोख व सन्मानपत्र आहे. हा पुरस्कार केवळ उल्लेखनिय कार्य करणाऱ्या  एकच व्यक्ती/ गट/ संस्थेस देण्यात येतो. यासाठी शेतकरी, गट किंवा संस्थेस मागील 20 ते 25 वर्षाचा शेतितील अनुभव असावा, कोरडवाहू शेतीकरिता कार्य व कोरडवाहू तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करणारा असावा, प्रस्तावित पुरस्कारार्थीच्या शेतितील नाविण्यपूर्ण उपक्रमाचा इतर शेतकऱ्यांना लाभ झालेला असावा, कृषी क्षेत्रातील कार्य संघटनात्मक व संपूर्ण राज्यास दिशादर्शक असावे, शासनाकडून यापूर्वी दिलेल्या पुरस्कारात किमान 5 वर्ष कालावधी पुर्ण झालेला असावा. पुरस्कारासाठी इच्छूकांनी कृषी उत्पादन, उत्पन्न, कृषि विस्तार, निर्यात कृषि प्रक्रिया , पिक फेरबदल, उत्पादन वाढीसाठी वापरलेले आधुनिक तंत्रज्ञानामधील कार्य तसेच समाजातील स्थान याबाबत सर्वंकष ‍ माहिती देण्यात यावी.

  वसंतराव नाईक शेतिनिष्ठ पुरस्काराचे स्वरूप 30 हजार रूपये रोख व स्मृतीचिन्ह आहे.  या पुरस्काराकरीता खेड्यामधून परसबाग वृद्धींगत करणाऱ्या  महिलांचाही विचार करण्यात येतो. तसेच सक्रीय कृषी विज्ञान मंडळ किंवा शेतकरी उत्पादक कंपन्याच्या  क्रियाशील सभासद प्रमुखांचा विचार करण्यात येतो. त्याचप्रमाणे सदर इच्छूक व्यक्ती  कृषी विषयक दैनिक, साप्ताहिक,  मासिकातून लिखाणाद्वारे  किंवा  विविध स्तरावरील शेतकरी मेळावे, चर्चासत्र व प्रदर्शन या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारी व्यक्ती, संस्था असावी. शासनाकडून यापूर्वी दिलेल्या पुरस्काराला किमान 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी पुर्ण झालेला नसावा. कृषी विभागामार्फत तसेच आत्मा अंतर्गत राबविण्यात आलेल्या सुलभकर्ता समन्वयक, शेतकरी यांचा विचार या पुरस्कारासाठी करण्यात येतो.

   या सर्व पुरस्कारांसाठी शासन किंवा शासन अंगीकृत सहकार संस्था यांच्या आस्थापनेवर काम करणारे किंवा सेवा निवृत्त अधीकारी, कर्मचारी तसेच केंद्र किंवा राज्य शासनाकडून  किंवा वरीलप्रमाणे संस्थेकडून कोणत्याही प्रकारचे  नियमित मानधन घेणारी व्यक्ती, संस्था पात्र ठरणार नाही. तसेच प्रस्तावीत शेतकरी, गट, संस्था ही शेतकरी मासिकाचे सभासद असावेत. उद्यान पंडीत पुरस्काराचे स्वरूप 25 हजार रूपये रोख व स्मृतीचीन्ह आहे. यासाठी फलोत्पादन क्षेत्रातील कार्य असावे, शेतकरी स्वत: शेती करणारा असावा, आधुनिक पद्धतीने फलोत्पादन पिकाचे उत्पादन घेणारा असावा, फलोत्पादन संबंधी विविध स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, संशोधन संस्थांना भेटी उपक्रमामध्ये सहभागी होणारा असावा. कृषी विभागामार्फत यापूर्वी हा पुरस्कार मिळालेला शेतकरी पुरस्कारासाठी पात्र नाहीत. तरी या पुरस्कारांसाठी शेतकरी बंधू, गट व संस्थांनी अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विकास अधिकारी यांनी केले आहे.      

 

No comments:

Post a Comment